नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी): केंद्र सरकार आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या प्रयत्नांमुळे आसाममधील बहुतांशी सशस्त्र गटांनी शांतता करार केले आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण आसाम राज्यातून ‘सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा’ (आफ्स्पा) संपुष्टात आणला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी आसामची राजधानी गुवाहाटी येथे दिली.
केंद्रीय गृहमंत्री सोमवार व मंगळवार असे दोन दिवस आसाम दौऱ्यावर होते. येथे त्यांनी आसाममधील हिमंता बिस्व सरमा सरकारच्या वर्षपूर्तीसह बीएसएफ आणि पोलिस दलाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी शाह म्हणाले, केंद्र सरकार आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या प्रयत्नांनी बहुतांश सशस्त्र संघटनांनी शांतता करार केला आहे. त्यामुळे राज्य आता हिंसाचारापासून मुक्त होणे फार दूर नाही. सध्या आसाममधील बहुतांश क्षेत्र ‘आफ्स्पा’मुक्त करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण राज्य ‘आफ्स्पा’मुक्त होणे सहजशक्य आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.
आसाम सरकार केंद्र सरकारला भक्कम पाठिंबा देत असल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या सहकार्यामुळे आसामच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यात यश आले आहे. अशीच घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्येही करत आहे. मात्र, बंगाल राज्य सरकार आसामप्रमाणे केंद्र सरकारला साथ देत नसल्याचे तेथे अद्यारही घुसखोरीची समस्या कायम असल्याचा टोलाही शाह यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांना लगावला.