‘आशापुरी मसाल्यां’चा डोंबिवलीकर 'ब्रँड'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2022   
Total Views |

tararam
 
डोळ्यांत स्वप्न, मनात जिद्द आणि मनगटात ताकद असली की माणूस अशक्यही शक्य करुन दाखवतो. डोंबिवलीचे सुप्रसिद्ध मसाला व्यावसायिक ताराराम चौहान हे त्यापैकीच एक... त्यांच्याविषयी...

 
 
 
‘कोविड’ महामारीचा काळ हा सामान्यांपासून ते अगदी व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठीच आव्हानात्मक होता. या काळात घराबाहेर पडून सामानखरेदी करण्यासाठीही बरेच नागरिक कचरत होते. खासकरुन ज्येष्ठ नागरिकांनी तर या काळात घरातच राहणे पसंत केले. याकाळात ज्येष्ठ नागरिकांसह समस्त डोंबिवलीकरांनाच उत्तमोत्तम सेवा देण्याचे काम डोंबिवलीतील सुप्रसिद्ध किराणामाल विक्रेते ताराराम चौहान यांनी केले. मसाला निर्मिती आणि विक्रीच्या क्षेत्रातील एक आघाडीचे नाव म्हणजे ताराराम चौहान. मसाले हे तर त्यांच्या दुकानाचे खास वैशिष्ट्य. त्यामुळे फक्त डोंबिवलीच नाही तर मसाला खरेदीसाठी दूरवरून ग्राहक त्यांच्या दुकानात दाखल होतात.
 
 
ताराराम चौहान हे मूळचे राजस्थान - जोधपूरमधील पाली जिल्ह्यातील कलाली गावचे. त्यांचे वडील चिमनाराम हे शिलाईचे काम करीत. ताराराम यांच्यासह चार भाऊ आणि चार बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब. गावात केवळ पाचवीपर्यंतच शाळा असल्याने त्यांनी पाचवीपर्यंतचेच शिक्षण घेतले. पण, घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. पण, तरीही आपले नशीब आजमविण्यासाठी ते मायानगरी मुंबईत दाखल झाले.
 
 
प्रत्येक माणसाचेच एक स्वप्न असते. पण, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक वर्षे मेहनतही घ्यावी लागते. कोणाचे स्वप्न गावात साकार होते, तर कोणाला स्वप्नपूर्तीसाठी शहराची वाट धरावी लागते. कारण, गावात प्रगतीच्या वाटा गवसल्या नाहीत की माणूस आपसूकच शहराकडे धाव घेतो. त्यातही शहरात आलो म्हणजे लगेच कोणाचे स्वप्न साकार झाले, असे होत नसते. त्या स्वप्नांच्या भरारीसाठी सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ताराराम यांनीही याच अविरत परिश्रमाचा मार्ग निवडला. सुरुवातीला त्यांनी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एका किराणा दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथे दोन वर्षे काम केल्यानंतर ते डोंबिवलीत दाखल झाले. डोंबिवलीतील ‘सर्वोदय स्टोअर्स’ येथे ताराराम यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘आशापुरी ट्रेडिंग’मध्येही काही काळ त्यांनी काम केले. पण, त्या मालकाने पुढे बांधकाम व्यवसायात पदार्पण केल्यामुळे त्यांचा व्यवसाय ताराराम यांनी चालविण्यास घेतला. मग ताराराम यांनी ‘आशापुरी ट्रेंडिग’ऐवजी ‘आशापुरी मसाला’ या नावाने दुकान सुरू केले. आशापुरी हे त्यांच्या कुलदेवीचे नाव असल्याने हेच नाव त्यांना दुकानासाठी योग्य वाटले. शिवाय ताराराम यांना मसाल्यांची विशेष आवड असल्याने त्यांनी मसाल्याचा व्यवसाय करण्याचे मनाशी पक्के केले होते.
 
आज ताराराम यांच्या या व्यवसायाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार मसाले मिळावे, यासाठी त्यांनी ताराराम यांनी मालवणी, घाटी, आगरी, खानदेशी, कोकणी, घाटी असे विविध प्रकारचे मसाले व त्यांचे पदार्थ दुकानात ठेवले. ग्राहकांना दर्जेदार मसाल्याचे पदार्थ उपलब्ध करुन देणे, हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यातही विविध पद्धतीच्या मसाल्यांचे साहित्यही एकाच छताखाली मिळत असल्याने व त्यांचा उत्तम दर्जा लक्षात घेता, ग्राहकही दूरवरुन याठिकाणी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी दाखल होतात. ताराराम यांना मसाला किती करायचा आणि मध्यम की तिखट नेमका कसा हवा, इतकीच केवळ माहिती दिली की, ते सर्व साहित्य ग्राहकांना अगदी अचूक प्रमाणात पुरवतात. त्यामुळे मसाल्यामध्ये इतर सामग्रीचे प्रमाण नेमके किती असावे, हे माहिती नसलेल्या गृहिणींनाही मसाला करणे सोपे जाते. त्यांनी दिलेल्या प्रमाणानुसार, मसाला तयार केल्यास चवीला तो उत्कृष्ट असतो. ग्राहक अगदी वर्षभरासाठी लागणारा मसाला त्यांच्याकडून तयार करून घेतात. याशिवाय तयार मसालाही ग्राहकांच्या मागणीनुसार ताराराम यांच्या दुकानात मिळतो. मसाला खरेदीसाठी वाशी, सरळगाव, दिवा, भिवंडी, पनवेल, कल्याण, मुरबाड इथूनही ग्राहक ताराराम यांच्या दुकानात मसाले खरेदीसाठी दाखल होतात
 
 
ताराराम यांचे दुकान विशेषत्वाने मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असले, तरी हळूहळू ग्राहकांकडून इतर किराणा मालाचीदेखील मागणी होऊ लागली. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पाहता, पाच ते सहा वर्षांनी किराणा मालाचीही विक्री सुरू केली. डिंकाचे लाडूदेखील त्यांच्या दुकानात मिळतात. एका छोट्याशा दुकानात सुरू झालेला हा व्यवसाय आज निरंतर वाढत आहे. ज्या दुकानात ते सध्या व्यवसाय करीत आहेत, ती दुकानाची जागा विकत घेण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, मालक जागा विकत नसल्याने सध्या ते भाडेतत्त्वावर जागा घेऊन व्यवसाय करीत आहे.
 
 
ताराराम १९९३ साली विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुली आणि दोन मुलगे आहेत. कौतुकास्पद बाब म्हणजे, त्यांच्यासोबत त्यांची मुलेदेखील आता हा व्यवसाय तितक्याच जिद्दीने सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत मुलगा, पत्नी, मुली अशा घरच्या पाच माणसांसोबत बाहेरचे तीन कामगार असे सगळेच या दुकानात एकत्र काम करीत आहेत. ताराराम यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपल्या व्यवसायात कधीही खंड पडू दिला नाही. आपल्या व्यवसायात नवनवीन बदल घडवित, ग्राहकांची आवड जोपासण्याचे काम ताराराम अगदी निष्ठेने करतात. ‘ग्राहक हेच आमचे दैवत’ असे मानणारे ताराराम हे ग्राहकहित जोपासण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.
 
 
ठाण्यापासून ते दिवा, डोंबिवली, बदलापूर, कर्जत-कसार्‍यापर्यंत अनेक ग्राहकांना ताराराम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दुकान्यांशी जोडले आहे. भविष्यातही ‘आशापुरी मसाला’ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तेव्हा, अशा या डोंबिवलीतील या यशस्वी उद्योजकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@