प्रभू श्रीरामाचे ‘मर्यादापुरुषोत्तम’ हे व्यक्तिमत्त्व, त्याची कल्पना नेमकी काय आहे?
आपल्या हिंदू संस्कृतीचे दोन महत्त्वाचे अवतार आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम. त्यात प्रभू श्रीरामाची जी वैशिष्ट्येे आहेत, ती प्रत्येक नीतिमूल्यांची वैशिष्ट्ये आहेत. ज्यात प्रत्येक नीतिमूल्याच्या वैशिष्ट्यापर्यंत माणूस पोहोचला म्हणून त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हटलं गेलं. पुरुषोत्तम तर ते आहेतच आणि श्रीकृष्णाला ‘पूर्णावतार’ म्हणतात. हे दोघे खरंतर अवतारच आहेत. अवताराचे काम काय तर ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।’ तीन कामे या अवताराची असतात. ‘विनाशायाच दृष्कृताम’, ‘परित्राणाय साधूनां’ आणि ‘धर्मसंस्थापनार्थाय.’ यातील कोणतेही एक काम करणारा असेल, तर त्याला ‘विभुती’ म्हटले जाते; म्हणजे काय तर, आता आपल्या सीमेवरील जवान जे कार्य करत आहेत, ते ‘परित्राणाय साधूनां’ ‘विनाशायच दृष्कृताम’ म्हणून त्यांना आपण ‘विभुती’ म्हणू शकतो. अवताराकडे सहा गुण असतात. त्याला ‘षड्गुणेश्वर’ म्हणतात - यश, श्री, औदार्य, संपत्ती, विवेक आणि वैराग्य या सहा गुणांच्या ज्या काही मर्यादा असतात त्या श्रीरामात असतात आणि म्हणून त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.
श्रीराम आणि श्रीकृष्ण ही भारतीयांची दैवतं आहेत, त्यांना जनमानसाने पूर्णतः जाणून घेतले आहे, असे आपल्याला वाटते का?
भारतीय जनमानसाची मानसिकता थोडी भजन-पूजन-अर्चनाकडे जाते, त्याला ‘भक्ती’ असे म्हणतात. त्या चरित्रातले गुण माझ्यात घेणं, बिंबवणं, आत्मसात करणं या संदर्भात भारतीय माणूस तेव्हाही कमी पडत होता आणि आजही कमी पडतोय. म्हणून वारंवार अवतार जन्माला यावे लागले. जर प्रत्येकाने आपल्या भूमिका योग्य पद्धतीने बजावल्या, तर अवताराची गरजच पडणार नाही! पण, आपण तसे करत नाही. कारण काय तर, भारतीय माणसाची मानसिकता अशी आहे की, तो भक्तिभावाने सर्व काही करेल, पण आपल्या आचरणात बदल करायचाय, तो केला तरी ती भक्तीच आहे, हे समजण्यात तो अजूनही कुठेतरी अडखळतो आणि म्हणून त्याला सांगावे लागते की, ‘श्रवणमकीर्तनंविष्णुम’ इथेच थांबू नका, तर त्याच्या पुढे जा. ही सर्व नवविधाभक्ती समर्थ रामदासस्वामींच्या दासबोधातीलाच आहे आणि जे श्रीरामाला, श्रीकृष्णाला अपेक्षित आहे, जे समर्थांना अपेक्षित आहे ते आचरणात आणले की आपण ‘परिपूर्ण’ होतो.
समर्थ रामदासस्वामींच्या रामभक्तीविषयी आणि कोदंडधारी रामाला ते आदर्श का मानतात?
आत्ता साधारण ३० वर्षांपूर्वी भारतात काश्मीरमध्ये जी परिस्थिती उद्भवली, ती आपण आपण चित्रपटात पाहून किती अस्वस्थ झालो होतो, तर ४०० वर्षांपूर्वी संपूर्ण भारत हे ‘काश्मीर फाईल्स’ होते. तेव्हा हा फक्त १२ वर्षांचा मुलगा (रामदास स्वामी) १३ अक्षरी ‘श्रीरामजयराम जयजय राम’ हा जप करू लागला (जो त्यांना १२व्या वर्षी स्फुरला होता). त्याच्या २६ पिढ्या या रामनामाची उपासना करत आहेत. रामदास काही सहज तयार होत नाही. २६ पिढ्या म्हणजे जवळजवळ ५०० वर्षं ठोसरांच्या घरात रामाची उपासना झाली आणि त्यानंतर नारायणाचा जन्म झाला आणि त्यानंतर १३व्या वर्षी तो जेव्हा घराबाहेर पडतो आणि रामनामाचा जप त्याला स्फुरला आणि संपूर्ण प्रवास त्यांनी पायी केला. आज शहरातला १२ वर्षांचा मुलगा एकटा अंधारात जायला घाबरेल. पण, तेच ४५० वर्षांपूर्वी हा नारायण घनदाट जंगलात-दंडकारण्यात एकटा गुहेत राहतो आणि रामाची उपासना करतो. यात हळूहळू वाढवत असे रोज १२०० सूर्यनमस्कार घालतो, रोज १३ कोटी रामनामाचे पुरश्चरण केले- म्हणजे तो जपलेला आहे, ‘जपला’ इथे दोन्ही अर्थांनी आहे. त्याचबरोबर आपल्या गायत्रीमंत्राचेदेखील १३ कोटी पुरश्चरण केले आणि असे करून संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले. जे प्राप्त व्हायला आयुष्य लागतं, ते त्यांचे वयाच्या २४व्या वर्षी प्राप्त करून झाले होते आणि २४ ते ७२ ही पुढची पाच तपं त्यांनी समाजकार्य केले. राष्ट्रउभारणी, प्रपंचउभारणी, संसारउभारणी केली. कारण, तेव्हा संपूर्ण भारताचीच ‘काश्मीर फाईल्स’ झाली होती. तेव्हा १२ वर्षं भारतभ्रमण केले आणि भारताचे नेमके प्रश्न काय आहेत, हे समजून घेतले आणि १२ वर्षं त्यांनी हा अभ्यास केला आणि हे करताना कोणी आदर्श हवा समोर म्हणून हा ‘कोदंडधारी राम’ जो युवकांना समजावता येईल असे रूप आहे. ‘दंड’ म्हणजे नियम आणि कोदंड म्हणजे माप. ते स्वसंरक्षण करते आणि नेहमी धर्माने वागावे, नीतीने वागावे याचे भानदेखील ठेवते. म्हणून कोदंडधारीरामाचा आदर्श त्यांनी ठेवला.
समर्थ रामदासस्वामींनी, सूरदासांनी, संत कबीर यांसारख्या अनेकांनी श्रीरामाचे गुणगान गायले. परंतु, आजच्या काळात त्यांच्या दृष्टीतील श्रीराम आपल्याला कसे समजून घ्यायला हवेत?
समर्थांनी जी भक्ताची व्याख्या सांगितली आहे, तशी साधी-सोपी शास्त्रीय व्याख्या कोणीही सांगितली नाही. ते म्हणतात, ‘जो विभक्त नाही तो भक्त.’ मग विभक्त नाही तर कोणापासून? तर देवापासून, धर्मापासून. आणि खरचं भक्त असाल तर- देव आनंदी आहे, तुम्हीदेखील आनंदीच असले पाहिजे. देव निर्भय आहे, तर तुम्हीदेखील निर्भय असले पाहिजे. देव सत्कार्य करतो, तुम्हीदेखील सत्कार्यच केले पाहिजे. जे-जे देवाचे गुण आहेत, ते ते तुमचे असतील तरच भक्त! जर देवाचे नाव घेताना मनात वेगळे विचार असतील, तर तो भक्त नव्हे, तो ‘उपासक.’ साधारणतः ९० टक्के लोक हे उपसाकाच्या पायरीवरच असतात आणि जर आपल्याला उपसाकाच्या पायरीवरून भक्ताच्या पायरी वर जायचे असेल तर ‘मुमुक्षु’ आणि ‘साधक’ या दोन पायर्या चढाव्या लागतात. तिथपर्यंत जाण्यासाठी पहिले मान्य करा की, आज मी फक्त ‘उपासक’ आहे, हे जग चालवणारा हे नियंता आहे, याची जाणीव आहे. पण, माझे आणि त्याचे नाते काय आहे, हे मला कळत नाही, ही जाणीव असू द्या आणि आपण दुसर्याची सेवा केल्याशिवाय मुक्ती नाही. समर्थांनी हेच केले. ११०० मठ, ११०० मठपती तेदेखील उद्धावासारखे, कल्याणस्वामींसारखे त्यांनी घडविले. मग आज नेमके उपासनेत काय करावे तर ‘जीवनेयावदआदमनम्स्यातप्रदानंततोदिकम्’ म्हणजे काय तर मला जे मिळालंय त्याहून जास्त मी देणं लागतो. आम्ही आमच्या शिबिरात सांगतो - जर तुम्ही एक तास समाजासाठी दिलात, तर सातव्या नरकात जाल, दोन तास दिलेत सहाव्या नरकात जाल. असे करत २४ तास समाजाला दिलेत, तर तुम्ही इथेच स्वर्ग निर्माण कराल आणि असा स्वर्ग समर्थांनी आपल्याला निर्माण करून दाखवला आहे. समर्थांकडून शिकायचे असेल तर हेच आहे की ,‘अवघा उरलो उपकारापुरता’ आणि त्यासाठी आपली तब्येत, एकाग्रता उत्तम पाहिजे. स्वतः भारतभ्रमण करा, समस्या जाणून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे कार्य हीच राष्ट्रसेवा आहे, समाजसेवा आहे आणि हीच समर्थांची, श्रीरामाची सेवा आहे.
‘सुंदरमठ सेवा समिती’ शिवथरघळ येथील कार्याची थोडक्यात माहिती सांगाल.
शिवथरघळीत जिथे दासबोध लिहिला गेला, तेथे गेली ३५-३६ वर्षे आम्ही शिबिरे आयोजित करतो. त्यातील दोन मोठे प्रकल्प असे आहेत - एक आहे युवक, बाल आणि प्रापंचिक निवासी शिबीर आणि यंदाच्या वर्षापासून ज्येष्ठ नागरिक शिबीरदेखील आयोजित करतो आणि यात आपण समर्थांची टाकळीमधील दिनचर्या होती ती अनुसरायचा प्रयत्न करतो. सूर्यनमस्कार, योगासने, मनाचे श्लोक गोष्टीरूपात, अर्थान्तारात सांगितले जातात. दासबोधातील लक्षणे सांगितली जातात. सावरकरांच्या भाषेत - उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सर्व तिथे सांगितले जाते. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले आहे, त्या प्रत्येकाबद्दल येथे सांगितले जाते, चर्चा केली जाते. मुलांशी देशी खेळ खेळले जातात. कपडे धुताना दगड जेवढा स्वच्छ होतो, तेवढे जरी झाले तरी तो दगड या देशाचे देऊळ उभारण्यात मोठी मदत करेल, याची खात्री वाटते आणि त्या दृष्टीने आमचे हे कार्य सुरू असते.