श्रीराम-हनुमंताचे आदर्श ऋणानुबंध

    09-Apr-2022
Total Views |
 
 
ram
 
 
रामायण म्हटले की, आम्हासमोर उभ्या राहतात, त्या अनेक दिव्योत्तम, तपस्वी, त्यागी व कर्तव्यनिष्ठ अशा अनेकविध आदर्श प्रतिमा. रामायण (राम + अयन) म्हणजेच श्रीरामाचा समुज्ज्वल जीवनप्रवास. एक प्रकारची ही कर्तव्यनिष्ठेची वाटचाल. पवित्र उद्देशाचे हे मार्गगमन म्हणजेच अयन (यात्रा)! याच अयनात श्रीरामांना अनेक प्रवासी भेटतात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण प्रतिमा आम्हा सर्वांसमोर उभी राहते, ती म्हणजे बालब्रह्मचारी व शक्तिशाली अशा वीर हनुमंताची! वानर जातीमध्ये जन्मलेले, पण विविध ज्ञानसंपदेने व शौर्यगुणांनी परिपूर्ण असलेले हनुमंताचे उदात्त चरित्र लाखो वर्षांनंतर आजही तितकेच प्रेरणादायी आहे. म्हणूनच तर प्रभू श्रीरामांच्या ‘रामनवमी’ जन्मोत्सवानंतर आम्ही तितक्याच उत्साहाने हनुमान जयंतीदेखील साजरी करतो.
 
वीर हनुमंताच्या सच्चारित्र्याने रामायण हे आर्ष महाकाव्य अतिशय शोभून दिसते. त्यांच्या समग्र जीवनावर प्रकाश टाकला तर आपणांस असे दिसून येते की, हनुमंताचे जीवनचरित्र हे जाज्ज्वल्य, सत्कर्मशील, सद्गुणसंपन्न आणि श्रीरामभक्तीने सुशोभित झाले आहे. हनुमंत किंवा इतर वानर मंडळींचा व्यवहार, त्यांचे सद्गुण, शौर्य आणि त्यांची बुद्धिमत्ता या सर्व बाबी सध्याच्या बंदर किंवा वानरांपासून दूर ठेवतात. आपणास अशी खात्री पटते की, रानावनात भटकणारे सध्याचे वानर हे हनुमंत, सुग्रीव किंवा अंगद इत्यादींचे वंशज अजिबात होऊ शकत नाहीत. ‘वा + नर’ म्हणजेच विशेष नर, ज्यांच्यात नेतृत्वाची क्षमता असते, ते वानर!
 
 
हनुमान हे सुग्रीवाचे मंत्री होते. आपला भाऊ वालीच्या अत्याचाराला कंटाळून सुग्रीव ऋष्यमूक पर्वतावर येऊन राहतात. त्यावेळी तिथे विचरण करणार्‍या श्रीराम-लक्ष्मणांना भेटण्यासाठी हनुमान वेश पालटून त्यांच्याकडे येतात आणि स्वतःचा परिचय करून देतात. किष्किंधा कांडातील तिसर्‍या सर्गात याचे वर्णन आढळते-
सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चिद् वानर पुंगव:।
वीरो विनिकृतो भ्रात्रा
जगद् भ्रमंती दुःखित:॥
म्हणजेच आपला परिचय देताना हनुमंत म्हणतात, “वानर जातीमध्ये श्रेष्ठ असलेले धर्मात्मा श्री सुग्रीव यांना त्यांचे भाऊ वाली यांनी तिरस्कृत केले आहे. मी त्यांचा मंत्री आहे. सुग्रीव हे आपणांशी मैत्री करू इच्छितात.” हनुमंतांची ही भाषा शैली व व्यवहार ऐकून राम प्रसन्न झाले आणि त्यांनी लक्ष्मणाला हनुमंताच्या विद्वत्तेचा परिचय करून देताना जे उद्गार काढले आहेत, ते खरोखरीच हनुमंताच्या अपार ज्ञान व विद्वत्तेला यथार्थपणे विशद करणारा आहे-
नानृग्वेद विनीतस्य नायजुर्वेदधारिण:,
नासामवेद विदुष: शक्यमेवं प्रभाषितुम् ।
नूनं व्याकरण कृत्स्नमनेन बहुधा श्रतम्, बहुव्याहरताऽनेन न किंचिदपशब्दतम्।
म्हणजेच हे लक्ष्मणा, ज्या व्यक्तीने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद शिकलेले नाहीत, तो अशाप्रकारे वैदिक संस्कृत भाषा बोलूच शकत नाही. निश्चितच याने संपूर्ण व्याकरणाचे अध्ययन केलेले आहे. कारण, यांच्या बोलण्यात व्याकरणाच्या दृष्टीने कोणतेही अशुद्धी दिसत नाही. आपणास बोलत असताना यांनी कोणतेही अपशब्द वापरले नाहीत. श्रीरामांच्या या उद्गारावरून हनुमंत हे फार मोठे ज्ञानी, वेद व संस्कृतचे अभ्यासक असल्याचे हे निदर्शनास येते.
 
 
वीरवर हनुमंतांचे प्रभू श्रीरामांशी ऋणानुबंध म्हणजे खर्‍या अर्थाने दोन दिव्य शक्तींचे संमिलन. या दोघांचे एकत्र येणे म्हणजे खूपच मोठ्या पुण्याईचा महायोग. या दोघांच्या पावन भेटीमुळे रामायणाचा इतिहास घडतो. रावणासारख्या दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि दाक्षिणात्य भागात स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ही भेट म्हणजेच सुवर्णयोग. यापुढील प्रवास सुरू होतो, तो केवळ ईश्वरीय सत्य व्यवस्थेच्या स्थापनेकरिताच!
 
 
जर का वीर हनुमंताची रामाशी भेट झाली नसती, तर कदाचित सीतेला शोधणेदेखील कठीण झाले असते. हनुमंताच्या भेटीनंतरच सुग्रीव आणि त्यांची शौर्यशाली वानरसेना हे रामाच्या मदतीला धावून येते. सेतुनिर्मितीचे कार्यदेखील नळ-नीळ यांसारख्या स्थापत्यविशारदांमुळेच शक्य होते. हनुमंताचे शौर्य आणि विश्वास किती मोठा पाहा! सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेला कोण जाईल? हा प्रश्न जेव्हा समोर आला, तेव्हा जांबुवंताने हनुमंताला लंकेला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. रामालाही विश्वास होता की, सीतेला शोधण्याचे कार्य हनुमंतच करू शकेल. म्हणूनच त्यांनी सीतेला ओळख पटण्यासाठी म्हणून रामाचे नाव कोरलेली दहा माशांची एक सोन्याची अंगठी हनुमंताकडे सुपूर्द केली. यावरून रामाचा हनुमंतावरील प्रगाढ विश्वास दिसून येतो. हनुमान मंद्राचल पर्वतावरून उड्डाण घेऊन लंकेकडे प्रस्थान करतात. लंकेला पोहोचतात, तेथे अशोकवाटिकेत निद्राधीन अस्ताव्यस्त स्त्रियांना पाहून “अरेरे, मी ब्रह्मचारी या डोळ्यांनी हे काय पाहत आहे?” हनुमंताला त्यांचे फार वाईट वाटते. पण, सीतामातेच्या शोधाचा पवित्र उद्देश असल्याने आपली सर्वांवरील मातृदृष्टी होती, असे हनुमंताला वाटते.शेवटी सीतेचा शोध घेऊन रामाने दिलेली मुद्रा सीतेला अर्पण करतात. तेव्हा सीतेच्या लक्षात येते की, हनुमान हे आपल्या पतीचे दूत व परमभक्त अनुयायी आहेत. तेव्हापासून सीता या मातृस्वरूपा आहेत, अशीच भावना हनुमंताच्या मनात राहते ती शेवटपर्यंत!
 
 
श्रीराम आणि हनुमान यांच्यातील ऋणानुबंध वाढीस लागण्याचे कारण म्हणजे, या दोघांत विद्यमान असलेले सर्वश्रेष्ठ गुण. श्रीराम हे दिव्यत्वाचे मूर्तिमंत प्रतीक असल्यामुळेच हनुमंतांची गुणग्राही वृत्ती त्यांच्याकडे वळण्यास व त्यांचा परमभक्त होण्यास प्रवृत्त करते. स्वतःचे प्राण गेले, तरी बेहत्तर, पण श्रीरामांसारखे दिव्य महापुरुष या धरणीवर विद्यमान असलेच पाहिजे. यासाठीच त्यांना सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर ठेवणे आणि सदैव त्यांच्या हिताचे रक्षण करणे यासाठी हनुमंताने आपले जीवन समर्पित केले. पुढे राम-रावण युद्धामध्ये रावणाच्या दिव्यास्त्रामुळे लक्ष्मण मूर्च्छित होतो. त्यावेळी वैद्य सुषेणच्या सांगण्यावरून हिमालय परिसरातील द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी औषधी वनस्पती आणण्याचे जोखमीचे कार्य हनुमंताने केले. दिव्यऔषधी वनस्पती घेऊन परतत असताना वाटेत भरताची भेट होते. त्यावेळी भरताची आतिथ्य स्वीकारण्याची विनंती हनुमंताने मान्य केली नाही. कारण, लक्ष्मणाच्या उपचारासाठी लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक असते. यावरून कार्याविषयीची तीव्रता व काळजी लक्षात येते.
 
 
असे एक नव्हे तर असंख्य प्रसंग आहेत की, आपणांस राम आणि हनुमंताचे पवित्र ऋणानुबंध दृढ होत गेल्याचे दृष्टीस पडतात. पुढे अयोध्येत पोहोचल्यानंतरही हनुमंताने रामाच्या आज्ञेत राहून आपले सारे आयुष्य श्रीरामसेवेतच खर्ची घातले आहे. हनुमंताच्या हृदयात श्रीरामाविषयी पिता, गुरू किंवा देवत्वाचा भाव दडलेला आहे. किती मोठी ही उदात्त नि:स्वार्थ भावना! प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्यातील हे उदात्त व पवित्र ऋणानुबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व समग्र विश्वामध्ये शाश्वत सुख व आनंद निर्माण करण्यासाठी आजही तितकेच लाखमोलाचे ठरतात. या देशाची ही ऋणानुबंधाची वैभवशाली परंपरा अगदी पूर्वीपासून ते आजतागायत सर्व प्रकारचे प्रेम, वात्सल्य, स्नेह, सहिष्णुता व संघटन वाढविण्यास समर्थ ठरणारी आहे. म्हणूनच अशा या मूल्य संस्कारांमुळे हा देश विश्वगुरू होण्यास समर्थ सदा सर्वदा ठरेल, यात शंकाच नाही. रामनवमीनिमित्त मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम व वीर हनुमंतांना शतकोटी अभिवादन...!
 
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य