वाल्मिकी रामायणातील राम

    08-Apr-2022
Total Views |
 
 
ram
 
 
भृगु वंशातील प्रचेताऋषींचे पुत्र वाल्मिकी वेदज्ञ होते. ‘सामान्य लोकांना वेदातील गहन अर्थ समजणे अशक्य असते’ या विचाराने धर्मतत्त्वांचे ज्याच्या जीवनात प्रगटीकरण झालेले आहे, ज्याचे अनुसरण समाजाने करावे, अशा आदर्श व्यक्तीच्या शोधात वाल्मिकी होते. नारदऋषींशी या विषयावर चर्चा करताना नारदांनी त्यांना ‘इक्ष्वाकु’ कुळातील रामाविषयी, रामकथा थोडक्यात सांगितली. वाल्मिकींनी आपल्या ‘ऋतंभरा प्रज्ञे’द्वारा रामाविषयीच्या सर्व गोष्टी जाणल्या. वाल्मिकींनी कथा लिहिली. हेच ते ‘वाल्मिकी रामायण.’ तेव्हा राम अयोध्येत राज्य करीत होते, रामायणातील जवळजवळ सर्व घटना घडून गेल्या होत्या. त्याविषयी...
 
 
वाल्मिकींनी महत्त्वाच्या घटनांविषयी सांगितलेल्या ग्रहतार्‍यांच्या स्थितीवरून, खगोल-पुरातनशास्त्राद्वारे दिनांक-वेळ काढण्याचे मौलिक संशोधनकार्य भटनागर, वर्तक, निलेश ओक इत्यादींनी करून कालानुक्रम सांगितलेला आहे. कलियुग १२०० वर्षे व दोन-तीन-चार पटीत द्वापार, त्रेता, कृतयुग हे वैज्ञानिक सत्य योगानंदांचे गुरु युक्तेश्वर स्वामींनी ‘होली सायन्स’ या पुस्तकाद्वारा स्पष्ट केले आहे. राम त्रेतायुगात म्हणजे लाखो वर्षांपूर्वीचा म्हणून काल्पनिक नाही. रामायण ११ हजार वर्षांपूर्वी घडलेला इतिहास आहे. राम हे ऐतिहासिक पुरुष आहे.
 
 
परिपूर्ण आदर्श राम
 
राम आज्ञाधारक, कमालीचा विनयशील, सहनशील, परस्त्रीकडे कधी दृष्टीही न टाकणारा, आत्मसंयमी, अनासक्त, वैराग्य व असंग्रही वृत्तीचा, साहसी, हिमालयासारखा धैर्यवान, कर्तव्यकठोर, खंबीर मनाचा, सेवाभावी वृत्तीचा, निरोगी सामाजिक संबंधांविषयी विश्वास व आदर असलेला, शूर, अमोघ पराक्रमी, बलवान, शस्त्रास्त्र प्रवीण, युद्धविद्येत निपुण, बुद्धिमान, स्थिरबुद्धीचा, सर्व विद्यांचे उत्तम अध्ययन असलेला, वेदज्ञानात श्रेष्ठ, शास्त्रविषयक नित्य चर्चा करणारा, गानविद्येत निपुण, सत्यसंध, अनसूयक, व्यापक दृष्टिकोन व राजकीय दूरदृष्टी असलेला, तत्काळ निर्णय घेणारा, उत्तम वक्ता, आचारसंहितेचा कर्ता तसेच करविता, असा सर्वगुणसंपन्न होता. राम म्हणजे मूर्तिमंत धर्म!
 
 
राम दुसर्‍यांच्या गुणांचे कौतुक करायचा व कोणाचेही दोष काढायचा नाही. एखाद्याने कधीकाळी त्याच्यावर एखादा लहानसा जरी उपकार केलेला असला, तरी तेवढ्याने तो त्याच्यावर संतुष्ट होत असे. कोणी टोचून बोलले, तरी त्याला कठोर उत्तर देत नसे. इतरांनी त्याच्यावर केलेले अपराधही तो विसरून जात असे. राम कधीही दुटप्पी बोलत नसे. राम मृदूभाषी व मधुर भाषी होता. राजघराण्यातील असूनही औपचारिकतेत बद्ध नव्हता. तो पूर्वभाषी होता म्हणजे बोलणार्‍याला संकोच वाटू नये म्हणून स्वतःच संभाषणास आरंभ करायचा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला, आपण रामासाठी महत्त्वाचे आहोत, असे वाटे. कोणत्या व्यक्तीच्या अंगी कोणते गुण आहेत, हे जाणणारा, दुसर्‍याला उद्वेग उत्पन्न होईल, असे भाषण न करणारा, निंद्य गोष्टींचे कधीही ग्रहण व आचरण न करणारा, अंतर्बाह्य पवित्र, निग्रह व अनुग्रह यथायोग्य करण्यात निपुण, पाहिल्याक्षणीच व्यक्तीचे अंतरंग ओळखण्यात कुशल, असा तो होता. सज्जनांचा संग्रह करणे, दुर्जनांना योग्य काळी योग्य स्थानी शिक्षा करणे, याचे त्याला सम्यक ज्ञान होते.
 
 
आध्यात्मिक पाया
 
वसिष्ठगुरुकुलात शिक्षण घेतल्यानंतर, १४ वर्षांच्या रामाने एक वर्ष भारतभ्रमण केले. देशाटन करत असताना, रावणाच्या दहशतीने भयग्रस्त देश, जनतेमधील असुरक्षिततेची भावना, राक्षसांचा प्रतिकार करण्याची असमर्थतता रामाने प्रत्यक्ष पाहिली व ‘असे का?’ या प्रश्नाने त्याला भेडसावले. तो फार अस्वस्थ व उदास झाला. वसिष्ठांनी रामाला ‘योगवसिष्ठ’ म्हणून सुपरिचित असलेला आध्यात्मिक उपदेश केला. रामाचा संशय व खेद दूर झाला. नवी दृष्टी प्राप्त झाली. कोवळ्या वयातच आध्यात्मिक पाया पक्का झाला की, व्यक्ती किती असामान्य गुणांचा धनी होते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम!
 
 
प्रेरक राम
 
राम म्हणजे एका मानवाने मूल्यांशी तडजोड न करता केलेला संघर्ष! ‘अहं’च्या वर उठून केलेल्या व्यक्तिगत सुखांचा त्याग! मर्यादापुरुषोत्तम रामाने स्वत:च्या उदाहरणावरून मानवी वर्तनाचे निकष प्रस्थापित केले. रामाने वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे वर्तन केले. मूलतः सज्जन प्रवृत्तीचे असलेल्या लोकांशी राम सत्याग्रही, तर मूलतः अपराधी वृत्तीचे अशा लोकांशी शस्त्राग्रही होता. निरपराध्यांची हिंसा होऊ न देणे हीसुद्धा अहिंसा आहे, असे रामाचे मत होते. राम काही प्रसंगांत दुःखी, अस्वस्थ झाला होता. पण, रामाच्या दु:खाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने सदैव स्वतःसाठी नाही, तर इतरांना होणारा त्रास व वेदना यासाठी शोक केला.
 
 
राम इतरांना आपली मते मांडण्यासाठी उत्तेजन देत असे. चर्चा घडवत असे. मनोवैज्ञानिकदृष्ट्या हे फार महत्त्वाचे आहे. नेतृत्व जेव्हा आपला निर्णय सांगते वा लादते तेव्हा अनुयायांच्या मनात अशी भावना असते की, आपण कुणाचा तरी निर्णय कार्यान्वित करत आहोत. परंतु, जेव्हा नेतृत्व, इतरांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेते, तेव्हा ’निर्णयाचे स्वामित्व माझ्याकडे आहे’ अशी सर्वांची भावना होऊन ते त्याची कार्यवाही जीव ओतून करतात.
 
 
युवराज्याभिषेकाचा निर्णय ऐकला तेव्हा राम सुखावला नाही. कैकेयीने जंगलात जाण्यास सांगितले तेव्हा त्याला शोकही झाला नाही. भरताच्या होणार्‍या अभिषेकाची आनंदाची बातमी दशरथाने स्वतः आपल्याला का दिली नाही व कैकेयीने सामान्य व क्षुल्लक गोष्टीसाठी त्याच्या वडिलांना का त्रास दिला, याचाच रामाला शोक वाटला!
 
 
राज्याभिषेकाच्या सिद्धतेची आदली रात्र, तर पुढचीच रात्र ध्यानीमनी नसताना जंगलातील वास्तव्याची! मनोनिग्रहाची कसोटी पाहणारे, एका रात्रीत झालेले परिवर्तन रामाने सहजतेने स्वीकारले. ’समलोष्टाश्मकांचनः’, ’सुखदुःखेसमेकृत्वा’ हे म्हणणे सोपे आहे. पण, रामाने तसे आचरणांत दाखवून देऊन मनावर नियंत्रण असलेली स्थितप्रज्ञता व अनासक्तीच्या परिसीमेचा आदर्श रामाने प्रस्थापित केला आहे.
 
 
रामाने मिळत असलेले सिंहासनच केवळ अव्हेरले नाही, तर आपल्या राजवाड्यातील स्वतःचे साहित्यही अयोध्या सोडण्यापूर्वी नोकर आणि दीन लोकांना देऊन टाकले. वनवासाला निघालेल्या रामामागून ज्ञानाने, वयाने, तपोबलाने वृद्ध असंख्य प्रजाजनही निघाले होते. त्यानंतरच्या काही रात्री अयोध्यानगरीत अग्निहोत्र झाले नाही. कुणाच्याही घरी अन्न शिजले नाही. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. त्यावेळेस राम केवळ पंचविशीतील होता. राजा नव्हता. युवराज्याभिषेकसुद्धा झाला नव्हता. म्हणजे त्याच्याजवळ ना अधिकार होता ना सत्ता होती. राम किती गुणवान व चारित्र्यसंपन्न असेल!
 
 
राजपुत्र असल्याने राम वनात जाण्याअगोदर जमिनीवरून कदाचित चाललाही नसेल. नंतरची १४ वर्षे त्याने जंगलात घालवली. पर्णशय्येवर झोपला! वटवृक्षाच्या दुधाने चिकाने जटा बनविल्या. पर्णकुटी बांधली. नदी ओलांडण्यासाठी तराफा बांधला. राजघराण्यातील राम-लक्ष्मणाने केवढे कष्ट सोसले. हे सर्व रामाने का करावे? तर नीतिमूल्यांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी... आदर्श प्रस्थापित करण्यासाठी...
 
 
पित्याची आज्ञा पालन करत खरेतर रामाला इतर कुठल्याही वनांत राहता आले असते. परंतु, ऋषींना त्रास देणार्‍या व तपस्व्यांशी शत्रुत्व बाळगणार्‍या राक्षसांचा संहार करण्याची प्रतिज्ञा केलेल्या रामाने जाणीवपूर्वक दंडकारण्यात प्रवेश केला होता.
 
 
पित्याला दिलेल्या वचनानुसार, राम वनवास संपेपर्यंत कुठल्याही नगरीत प्रवेश करू शकत नव्हता. म्हणून वालीवधानंतर सुग्रीवाच्या राज्याभिषेकाला किष्किंधा नगरीत, तर रावणवधानंतर विभीषणाच्या राज्याभिषेकाला लंकानगरीत राम प्रवेशला नाही. दिलेला शब्द दुसर्‍याकरिता पालन करायचा नसतो, तर आपल्या स्वतःकरिता, सत्याकरिता पालन करायचा असतो. व्यावहारिक जीवनातील असे अनेक निकष रामाने प्रस्थापित केले.
 
 
आजानुबाहू रामाने ३०-३१ वर्षे आपल्या ७०व्या वर्षी जलसमाधी घेईपर्यंत राज्य केले. प्रजानुरंजनाचा एकच ध्यास उराशी बाळगला. रामाची नैतिक शक्ती हा रामराज्याचा मजबूत पाया होता. ‘धर्माधिष्ठितसुशासन म्हणजे रामराज्य’ असे समीकरण झाले आहे.
 
 
राज्यपद
 
राज्यपद स्वीकारण्यासंबंधी रामाने मातापिता, गुरू यांचे ऐकले नाही. ज्येेष्ठांचे आज्ञापालन व समाज, राष्ट्रहित रक्षण या कर्तव्यात संघर्ष निर्माण झाला, तर धर्मतत्त्वाचा अवलंब करायचा, ही रामाची शिकवण आहे.
ऐन तारुण्यात सहज चालून आलेल्या सिंहासनावर, दुसर्‍याचा अधिकार आहे म्हणून स्वीकार न करणे, या राम-भरत सावत्र भावाभावांतील मानवी इतिहासाने कधीच न पाहिलेल्या अलौकिक चढाओढीला जगाच्या इतिहासात तोड नाही. भारतीय संस्कृती अशा उदात्त उदाहरणांमुळे समृद्ध झाली आहे.
 
 
अहिल्या
 
अहिल्या शिळा होऊन पडली. रामाचा शिळेस पाय लागला व रामाचा पदस्पर्श झाल्यावर तिला पूर्ववत मनुष्यरूप प्राप्त झाले. अहिल्येचा उद्धार झाला, हा उल्लेख स्कंदपुराणात आहे, वाल्मिकी रामायणात नाही. तेजस्वी अहिल्येच्या तपाने प्रकाशमान झालेल्या तिच्या आश्रमात जाऊन रामाने तिला पादाभिवंदन केले आहे. तारुण्यसुलभ अवस्थेत अहिल्येने केलेले कृत्य रामाने केवळ क्षम्यच केले नाही, तर तिला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.
 
 
वाली वध
 
वाली-रावणात ना-युद्ध व वेळप्रसंगी परस्परांना साहाय्य करण्याचा करार झाला होता. सुग्रीवाशी सख्य करून दुष्ट वालीला कपटाने मारण्याव्यतिरिक्त रामापुढे अन्य पर्यायच नव्हता. महाभारतातही भीष्म, द्रोण, कर्ण आदी शत्रूपक्षीय वीरांचा वध श्रीकृष्णाच्या उपस्थितीत, किंबहुना त्याच्या अनुमतीने कपटानेच झाला होता. युद्ध हे नैतिक पुस्तकात दिलेल्या नियमांनुसार लढायचे नसते.
 
 
सीता अग्निप्रवेश, सीतात्याग, सीतेचा भूमिप्रवेश
 
सीता शुद्धतेचे प्रतिरूप आहे, हे रामाला ठाऊक असले तरी रावणाचा शरीरस्पर्श सीतेला झाला होता. एक वर्ष सीता रावणाच्या नियंत्रणात राहिली होती. सीता समाजमनाच्या संशयाला बळी पडू नये म्हणून आणि सीतेचे पावित्र्य संपूर्ण जगापुढे सिद्ध करण्यासाठीच या तिन्ही प्रसंगांत राम एवढा कठोर वागला. रघुवंशातील राजा रामाने त्याचे हृदय ‘सीतापती’ म्हणून विदीर्ण होत असले, तरी रघुकुळातील राणीस नाकारले. रामाने पुनर्विवाह केला नाही. रामाने त्याच्या घराण्याच्या परंपरेनुसार दुसरे लग्न केले असते, तरी कुणी त्याला अडविले नसते. पण, रामाने त्या काळात, एकपत्नीत्वाचा आदर्श घालून दिला, नवीन निकष स्थापन केले!
 
 
भाषणे करून नैतिकता स्थापित होत नाही, तर तसा व्यवहार करूनच स्थापित होते. राम हा धर्माचे प्रतीक होता. कोणत्याही प्रसंगांत रामाचे वर्तन भावनेवर आधारित नव्हते. राजाकडून जे सामाजिक वर्तन अपेक्षित आहे, त्या मापदंडावर ते आधारित होते. रामाच्या नीतिपालनाच्या कठोर निर्णयांमुळे पिता मृत्यू पावला, पत्नीने मृत्यूला कवटाळले. प्राणाहूनही प्रिय असलेल्या लक्ष्मणाचाही त्याग करावा लागला. त्याला दुःख नक्कीच झाले होते. पण, त्याने दुःखाची पर्वा केली नाही. सुदृढ समाजव्यवस्था रुजावी, टिकावी, यासाठी रामाने हे सर्व केले.
 
 
अलौकिक कृत्ये
 
रामाची अलौकिक कृत्ये ही दैवी कृत्ये मानण्याची आवश्यकता नाही. जनकाकडील शिवधनुष्याची चारचाकी गाड्यावरून ने-आण व्हायची, एवढे त्याचे वजन होते. ते उचलण्यात रामाची असामान्यता नक्कीच होती. पण, त्यात दैवी असे काही नाही. राणाप्रतापाचे शिरस्त्राण व चिलखत ५० किलो वजनाचे होते. ते आजही उदयपूर संग्रहालयात पाहण्यास उपलब्ध आहे. एकापाठोपाठ असलेल्या सात वृक्षांना भेदून रामाचा बाण बाहेर गेला होता. यामुळे रामाला ‘दैवी पुरुष’ समजण्याची आवश्यकता नाही. एका रांगेत एका मागे एक ठेवलेले सात लोखंडी तवे एकाच बाणाने आरपार भेदण्याचा पराक्रम राजा पृथ्वीराज चौहानने केला होता!
 
 
समारोप
 
’मानुष्ये राघवो’ ५/५१/२७; ‘आत्मानंमानुषंमन्येरामम्’ ६/११७/११ असे रामाविषयी स्पष्ट उल्लेख असलेल्या ऐतिहासिक रामाला देव न मानता, त्याचे मानवत्व स्वीकारून तो आणि त्याचे कार्य समजून घ्यायला हवे. एखाद्या मनुष्याने, त्या त्या प्रसंगी नीतिनुसार जे केले पाहिजे, तेच रामाने केले आणि आपल्यालाही ते करता येईल, असे मग आपल्याला वाटू लागेल. रामाने आचारलेली सर्व जीवनमूल्ये अंगीकारण्याच्या दिशेने आपले प्रयत्न चालू होतील. रामायण लिहिताना वाल्मिकींची तीच तर अपेक्षा होती!
 
 
रामाच्या आपल्यापेक्षा अनंत पटीने असलेल्या श्रेष्ठत्वाला ईश्वरीय अवतार मानून आपण रामाला भक्तिभावाने पूजतो. रामाचे प्रतिमापूजन करतो. त्यात काहीच अनुचित नाही. परंतु, केवळ एवढेच मर्यादित राहू नये. आपल्याला केवळ देवघरातील राम नव्हे, तर लोकांच्या आचरणातील राम हवा आहे. रामाचे नामस्मरण, भजन करता करता रामाला आदर्श ठेवून त्याचे अनुकरण करायचे आहे. खरी पूजा म्हणजे आपल्या प्रत्येकात ईश्वरीय अंश आहे, यावर विश्वास ठेवून रामासारखे होण्यासाठी रामाची पूजा करायची.
  
रामोभूत्वारामम्यजेत्!
 
 
डॉ. गिरीश टिळक
(लेखक ‘वाल्मिकींच्या रामायणाचे सिंहावलोकन’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)