राम हे नाव त्रैतायुगात होते, द्वापारयुगात होते आणि आता कलियुगातही आहे. राम कालातित आहेत. भारतातून राम काढला, तर भारतात काही ‘राम’ राहणार नाही. राम हे भारताचे आत्मतत्त्व आहे. राम हे नाव माहीत नाही, असा भारतीय माणूस शोधूनही सापडणार नाही. राम आणि रामायण घरोघरी आहे आणि हीच आमची धरोहर आहे.
राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त म्हणतात,
राम तुम्हारा वृत्त स्वयं ही काव्य हैं।
कोई कवी बन जाये सहज सम्भाव्य हैं॥
रामाचे गारुड इतके व्याप्त आहे की, रामकथा वाचता वाचता ‘कोई कवी बन जाये, सहज सम्भाव्य’ महर्षी वाल्मिकींचे रामायण चिंरजीव आहे, अक्षय आहे, अमर आहे. असा हा राम अनेकांना वेगवेगळ्या स्वरुपात भावतो.
एक राम दशरथ का बेटा,
एक राम घट-घट में लेटा।
एक राम का सकल पसारा,
संत कबीर यांची निर्गुणी भजने अतिशय प्रसिद्ध आहेत. कुमार गंर्धव यांनी ती गायली आहेत. ती ऐकणे हा स्वर्गीय आनंद असतो.
कबीराचा राम कसा आहे, तोे दशरथपुत्र राम नाही, राजाराम नाही, त्याची भव्यता कबीर या निर्गुणी भजनात सांगतात-
राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे।
अंजन उतपति वो उंकार, अंजन मांड्या सब बिस्तारा॥
कबीराचा राम हा निरंजन राम आहे. ‘निरंजन’ याचा अर्थ ज्याला कोणताही डाग नाही, जे अविनाशी आहे, शाश्वत आहे, असे अक्षय तत्त्व राम आहे आणि अंजन म्हणजे माया.
आपण जे सगळं पाहतो, हा सगळा मायेचा पसारा आहे, त्यात शाश्वतता नाही. ते नित्य परिवर्तनशील आहे, म्हणून ते सत्य नाही. असलेच तर आभासी सत्य आहे, असे कबीरजींना म्हणायचे आहे आणि या भजनाच्या शेवटच्या ओळी आहेत-
कहे कबीर कोई बिरला जागे
अंजन छाडी अनंत ही दागे रे॥
कबीरजींना म्हणायचे आहे की, आभासी सत्य सोडून चिरंतन सत्य पाहणारा दुर्मीळच असतो. अविनाशी रामावर ध्यान केंद्रित करणारा विरळ असतो.
हा झाला रामाचा तत्त्वविचार. पण, असा तत्त्वविचार करणारे विरळच असतात. आपल्यासारख्या या सर्वसामान्य माणसाला ‘रघुपती राघव राजाराम पतीतपावन सीताराम’ हेच भावतं. दशरथपुत्र राम, कौसल्यासुत राम, सीतापती राम, लक्ष्मणबंधू राम, राजाराम, बजरंगबलीचे परात्मा राम, ही रुपे आपल्याला भावतात. तत्त्वविचार हा कबीरासारखेच मोजके लोकच करू शकतात. असा हा राम मर्यादापुरुषोत्तम राम आहे. ‘मर्यादापुरुषोत्तम’ हे जसे त्याचे विशेषण आहे, तसे हे विशेषण समाज आणि राष्ट्रधारणेचा महामंत्र आहे. निसर्ग नेहमी आपल्या मर्यादेतच राहतो. दररोज समुद्राला भरती येते.
कधी थोडी जास्त येते. पण, या दोन्हींच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. समुद्र आपल्या मर्यादा ओलांडत नाही. पाऊसही पडण्याच्या मर्यादा आहेत.मर्यादेत राहणे म्हणजे शाश्वत नैसर्गिक नियमांचे पालन करणे. सृष्टी नियमांनी चालते, ज्याला आपण ‘कायदे’ म्हणतो. निसर्ग कायदे मोडत नाही, माणूस कायदे मोडतो. माणूस जेव्हा कायदे मोडतो, तेव्हा समुद्र पाण्याची पातळी वाढते, वादळे निर्माण होतात, अवकाळी, अकाली, अतिपर्जन्यवृष्टी, अल्पपर्जन्यवृष्टी याचा सामना करावा लागतो. मर्यादा उल्लंघनाचे हे परिणाम आहेत.
मर्यादापुरुषोत्तम रामाने जीवन जगण्याचे सर्वश्रेष्ठ आदर्श निर्माण केले. आदर्शपुत्र, बंधू, पती आणि राजा ही श्रीरामाची रुपे आहेत. मनुष्यजीवन जगताना अनेक प्रकारच्या कर्तव्यांचे पालन करावे लागते. कर्तव्यपालनाला आपला शब्द आहे, ‘धर्मपालन’. पुत्रधर्म, पतीधर्म, बंधुधर्म, राजधर्म अशा चढत्या क्रमाने या सर्व कर्तव्यांचे पालन करावे लागते.
पुत्रधर्मात मातापित्यांच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांची सेवा करणे, ही कर्तव्ये येतात. ‘मुलगा म्हणून माझा हक्क आहे आणि या हक्कासाठी मी वाटेल ते करीन’ ही झाली आजची भाषा. रामाची ही भाषा नाही. पतीधर्म म्हणून पत्नीशी एकनिष्ठ राहणे, ‘एकपत्नीत्वा’चे पालन करणे, पत्नीला सहधर्मचारिणीचा दर्जा देणे, हे रामाने केले. ‘मी पती आहे, बायकोशी माझे पटत नाही. तिचे तारुण्य आता संपले तेव्हा मी नवीन बाईच्या मागे लागेल. मी राज्यकर्ता आहे, तेव्हा अनेक बायकांशी माझा संबंध असलाच पाहिजे,’ हे झाले आजचे हक्क. रामाने कर्तव्याचरण कसे करावे, याचा आदर्श घालून दिला. हाच आदर्श सीतेनेही घालून दिला. पत्नी म्हणून माझे हे सतराशेसाठ अधिकार आहेत, असे ती कधी म्हणाली नाही. एकच अधिकार तिने गाजविला तो म्हणजे ‘जेथे राघव तेथे सीता.’
कालौघात राम राजा झाला. राजधर्माचे पालन करण्याचे कर्तव्य आले. जेवढे वरच्या स्तरावर जावे तेवढे कर्तव्याचे पालन अधिक कठोरपणे करावे लागते. वरच्या स्तराच्या कर्तव्याला अग्रक्रम द्यावा लागतो. राजधर्म म्हणजे प्रजेचे पुत्रवत पालन करणे, प्रजेच्या सुखामध्ये वृद्धी करणे, प्रजेच्या दुःखाचे निराकारण करणे, प्रजेला सन्मार्गावर ठेवणे, समृद्धी, सुरक्षा आणि सन्मान प्रत्येकाला सहज प्राप्त करून देणे, हा झाला राजधर्म! या राजधर्माचे पालन करीत असताना किती कठोर राहावे लागते, यासाठी रामाच्या जीवनाकडे पाहावे लागते. राजधर्माचे पालन करीत असताना प्राणाहून प्रिय असणार्या सीतेचा त्याग करावा लागला. बहिश्चर असलेल्या लक्ष्मणाचादेखील त्याग करावा लागला. राजधर्माचे पालन, असे अत्यंत कठीण असते.
आजचा राजधर्म विश्वासघात करून राज्य मिळविण्याचा, एकेकाळच्या आपल्या सहकार्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रिपद मिळविण्याचा, सुपारी घेऊन आपला पक्ष सत्ताधारी पक्षाच्या विरोधासाठी वापरास देण्याचा, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा, लग्नाची एक बायको असताना अनेक बायकांशी संबंध ठेवून संतती निर्माण करण्याचा झालेला आहे, हे पापाचरण आहे. रामाला दहा तोंडाच्या रावणाशी लढावे लागले. ही दहा तोंडे म्हणजे दहा प्रकारची पापे जर समजली, तर आजचे रावण हजार तोंडांचे आहेत.
आजच्या संदर्भात रामराज्याचा विचार करताना केवळ हक्कांचा विचार करून चालत नाही. भारतीय राज्यघटनेने जसे हक्क दिले आहेत, तशी मूलभूत कर्तव्येही सांगितली आहेत. त्याची कुणीही चर्चा करीत नाहीत. सन्माननीय न्यायमूर्तीदेखील आपल्या निकालपत्रात या कर्तव्यांची आठवण करून देत नाहीत. थोर पुरुषांची बदनामी करणे हे काही लोकांना आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य वाटते आणि आपला तो हक्क वाटतो. दुसर्याच्या धर्मभावना दुखविणे हे विचारस्वातंत्र्य आहे,
असे अनेकांना वाटते. पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणे हे वेगळे मत ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे, असे काहीजण सांगतात.
पण, ही सर्व मंडळी एक गोष्ट विसरतात की, प्रत्येक हक्काबरोबर कर्तव्ये येत असतात. कर्तव्यविना हक्क म्हणजे शून्यता आहे. म्हणून हक्काची भाषा नंतर करा, कर्तव्यचरण अगोदर करा. दुसर्या भाषेत रामाचे अनुसरण करा, म्हणजे रामराज्य येईल. रामराज्य म्हणजे कुठल्या एका उपासनापंथाचे राज्य नव्हे अथवा रामाची देवळे बांधून रामरक्षेचे पठन करण्याचे राज्य नव्हे. हे राज्य, राज्यातील प्रत्येेकाने आपल्या कर्तव्यधर्माचे आचरण करण्याचे राज्य, असे समजले पाहिजे.
आजच्या संदर्भात श्रीरामाचा विचार करीत असताना रामाच्या राजधर्माचा विचार करावा लागतो. आजच्या संदर्भात या राजधर्माची तीन अंगे आहेत. १. समृद्धी. २. सुरक्षा आणि ३. सन्मान. समृद्धी याचा अर्थ शेवटच्या पंगतीतील शेवटच्या माणसाचा विकास. प्रत्येकाला रोजगार, आरोग्य, निवारा याची शाश्वतता. सुरक्षा याचा अर्थ जीवन जगण्याची सुरक्षा. समाजात चोर, दरोडेखोर, खूनी, राहणार नाहीत, दहशतवादी राहणार नाहीत, याची शाश्वती आणि सन्मान म्हणजे जन्मावरून कुणाचेही समाजातील स्थान ठरणार नाही. प्रत्येक माणूस हा ईश्वराची कृती आहे आणि त्यामध्ये ईश्वरीय अंश आहे. प्रत्येकाला आपल्या क्षमतेप्रमाणे वाढू दिले पाहिजे आणि वाढीचे अनुकूल वातावरण राज्यसंस्थेने निर्माण केले पाहिजे. समृद्धी, सुरक्षा आणि सन्मान या तीन संकल्पना प्रत्यक्षात आल्या असता, त्या राज्याला ‘रामराज्य’ असे म्हणावे लागेल.
मर्यादापुरुषोत्तम राम हा जीवन जगण्याच्या ज्या मर्यादा सांगतो, त्याचाही आजच्या संदर्भात विचार केला पाहिजे. एक मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, धरतीमातेने दिलेली भौतिक साधने आणि त्यांचे साठे हे अमर्याद नाहीत. त्यांच्या मर्यादा आहेत. म्हणून त्यांचा वापर करीत असताना प्रत्येक पिढीने खूप विचार केला पाहिजे. संयमित उपभोग जर आपण शिकलो नाही, तर भविष्यात येणार्या पिढ्या भयानक संकटात सापडतील. रोज नवीन नवीन गरजा निर्माण केल्या जातात. या गरजा जीवनासाठी आवश्यक आहेत का, याचा विचार केला पाहिजे. गरजांची मर्यादा समाजानेच निश्चित केली पाहिजे.
जी जीवनपद्धती आपण स्वीकारली आहे, ही जीवनपद्धती भोगलालसा वाढविणारी आहे. कबीरांच्या शब्दात सांगायचे, तर हा सगळा ‘अंजन सकल पसारा हैं.’ जे अशाश्वत आहे, त्याच्यामागे आपण धावतो. विदेशातील लोकांची नक्कल करण्यात आपण धन्यता मानतो. अमेरिकेचे किंवा जर्मनीचे दरडोई उत्पन्न किती आणि उपभोग किती, याची आकडेवारी घेऊन त्याच्याशी आपली तुलना करतो. पण, अमेरिका आणि पश्चिम युरोपचा मार्ग हा आपला मार्ग नव्हे, हे आपण लक्षात घेत नाही. आपला मार्ग हा राममार्ग आहे. हा मार्ग सकल सृष्टीची समृद्धतता, विकास आणि शांतता याची कामना करणारा मार्ग आहे. हे शाश्वत रामतत्त्व आहे. आजच्या संघर्षमय जगात या राममार्गाने आपल्याला जावे लागेल.
भांडवलशाही विचारधारा आणि कम्युनिझमची विचारधारा यांनी जगात नको तितका रक्तपात केलेला आहे. युक्रेनमध्ये या दोघांचा टकराव झालेला आहे. हे दोन्ही मार्ग मानवाला विनाशाकडे आणि रावणगृहाकडे घेऊन जाणारे आहेत. म्हणून तिसरा मार्ग जो राममार्ग आहे, त्यामार्गाने आपण सर्वप्रथम उभे राहिले पाहिजे. राम जसा सात्विक शक्तीचा प्रतीक आहे, तेवढाच या सात्विक शक्तीच्या पालनासाठी आवश्यक असलेली लष्करी शक्तीदेखील रामाकडे होती. जग सात्विक उपदेशाने जग चालत नाही. त्यामागे धर्नुधारी रामदेखील असावा लागतो. म्हणून अभयमुद्राधारी राम आणि धर्नुधारी राम हा आपला आदर्श आहे आणि तोच आपला मार्ग आहे.