आपल्या भारत देशाचे वर्णन करताना आपण म्हणतो, ‘रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम्। ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारत मातरम्॥’ महासागर जिच्या चरणी अर्घ्य अर्पण करतो, जिच्या मस्तकावर हिमालयरुपी मुकूट आहे, ऋषिमुनींच्या परंपरेतील चिरंतन मूल्यरुपी रत्नांनी जी समृद्ध आहे, अशी माझी भारतमाता. तिला मी वंदन करतो. एकेकाळी भारताने जगातल्या फार मोठ्या भूभागावर आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. ब्रह्मदेश (आजचा म्यानमार) ते जपान, इराण ते पाकिस्तान या पट्ट्यातील सर्व देशांमध्ये भारताच्या सांस्कृतिक पाऊलखुणा आजही सापडतात.
अशी श्रेष्ठ जीवनमूल्ये आणि भौतिक समृद्धी असलेल्या भारतावर जवळजवळ १२०० वर्षे आक्रमणे होत राहिली. मोहम्मद बिन कासिमच्या सिंधवरील आक्रमणाने सुरू झालेल्या बर्बरतेची साखळी मोहम्मद गझनी, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, औरंगजेब, अकबर, टिपू सुलतान यांनी पुढे चालवली. या आक्रमणात केवळ संपत्तीची लूट होत नव्हती, तर आपल्या श्रद्धास्थानांचा, मानबिंदूचा विध्वंस करण्याचा विडाच त्यांनी उचलला होता. अनेक मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी उभ्या केल्या. विरोध करणार्यांच्या कत्तली केल्या. ‘इस्लाम स्वीकारा अथवा मरायला तयार व्हा’ या धाकाने लक्षावधींचे धर्मांतरण करण्यात आले.
याच मालिकेतील एक आक्रमण इसवी सन १५२८ मध्ये अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर झाले. उज्जैनचे सम्राट महाराजा विक्रमादित्याने बांधलेले ८४ खांबांचे भव्य मंदिर मुघल सम्राट बाबराच्या आदेशाने त्याचा सेनापती मीर बांकी याने जमीनदोस्त केले आणि बाबराच्या नावाने मशीदसदृश्य इमारत उभी केली. आपल्या श्रद्धास्थानांच्या मुक्तीसाठी श्रीरामभक्तांनी सतत संघर्ष केला. त्यात लाखो हिंदूंनी बलिदान दिले. लढा सुरूच राहिला, पण पाशवी परकीय सत्तेसमोर हिंदूंची शक्ती तोकडी पडली.
दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या फाळणीचे शल्य मनात ठेवत नागरिकांनी हे खंडित स्वातंत्र्य स्वीकारले. त्यांना वाटले आता आपण स्वतंत्र आहोत. या देशात आपल्या ‘स्व’चीपुनर्प्रतिष्ठापना होईल. परकीय आक्रमणांची चिन्हे पुसून टाकली जातील. भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची घोषणा करुन त्या स्वत्व जागरणाच्या अभियानाला सुरुवातही केली होती. पण, दुर्दैवाने सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर ती प्रक्रिया थांबली आणि खिलाफत आंदोलनापासून सुरू झालेली मुस्लीम तुष्टीकरणाची नीती जोर धरु लागली.
ज्या ‘रामराज्या’ची संकल्पना महात्मा गांधींनी सातत्याने मांडली होती, त्या संकल्पनेतील श्रीराम गांधींच्या अनुयायांनी कडीकुलूपात बंद केला आणि सुरू झाला न्यायालयीन संघर्ष. १५२८ ते १९८४ पर्यंत ‘तारीख पे तारीख’ या पद्धतीने न्यायालयाचे काम सुरू होते. हिंदूंच्या न्याय्य मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या. स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये आमचे आराध्यदैवत जर कुलूपबंद असेल, तर त्या स्वातंत्र्याला काय अर्थ? केवळ भाकरी आणि चाकरीसाठी का आमच्या देशभक्तांनी आपल्या आयुष्याचा होम केला? स्वतंत्र देशात आमच्या स्वाभिमानाची, अस्मितेची पुनर्प्रतिष्ठापना होत नसेल, तर आमच्या जगण्याला काय अर्थ, अशा भूमिकेतून धर्मस्थान मुक्तीचे आंदोलन सुरु झाले. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने दि. ७ आणि ८ एप्रिल, १९८४ रोजी दिल्लीच्या विज्ञानभवनात ८०० प्रमुख साधुसंतांच्या उपस्थितीत धर्मसंसदेचे ऐतिहासिक अधिवेशन संपन्न झाले. ‘धर्मस्थान मुक्ती यज्ञ समिती’ची स्थापना झाली.
अयोध्येची श्रीरामजन्मभूमी, मथुरेची श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीचे बाबा विश्वनाथ देवस्थान मुक्तीचा संकल्प सोडण्यात आला. सर्वप्रथम अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे संतांनी ठरवले आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून परिषदेचे तत्कालीन महामंत्री अशोक सिंघल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा शंखनाद झाला. श्रीराम-जानकी रथयात्रांच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर प्रदेश ढवळून निघाला. ‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर भव्य बनायेंगे’ या घोषणेने हिंदू मानस आंदोलित झाले. जनमताच्या दबावाचा परिणाम झाला. फैजाबाद सत्र न्यायालयाच्या आदेशाने मंदिराचे टाळे काढले गेले, दुरूनच पूजाअर्चना करण्यास परवानगी मिळाली. एका बाजूला न्यायालयीन लढाई सुरू होती, तर दुसरीकडे संतांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेने सर्वसामान्यांच्या हृदयातील राम जागविण्याचे प्रयत्न सुरू केले. संपूर्ण देशभर शीलापूजन कार्यक्रमाची योजना आखली गेली. अयोध्येच्या जन्मभूमी मंदिरासाठी प्रत्येक गावातून, वस्तीतून एक एक वीट जावी आणि मंदिरासाठी सव्वा रुपया दान द्यावे, या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन लाख गावांमध्ये शीलापूजन कार्यक्रम झाले आणि देशभरातून आठ कोटी रुपयांचे दान देण्यात आले. संपूर्ण देश जात, पंथ, पक्ष, प्रांतभेद विसरून रामरंगातरंगून गेला. जगाच्या इतिहासातील हा सर्वात व्यापक जनजागरण कार्यक्रम ठरला.
श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा विषय सर्वदूर पोहोचला. संपूर्ण देश ढवळून निघाला. ज्यांच्या कल्पकतेतून हा अनोखा कार्यक्रम योजला गेला, त्या मोरोपंत पिंगळे यांचे स्मरण याठिकाणी करणे उचित ठरेल. आपल्या अस्मितेच्या रक्षणासाठी हिंदू एकवटल्याचे बघून विरोधकांचे धाबे दणाणले. विरोध करण्यासाठी बाबरी मशीद कृती समिती स्थापन झाली, तर दुसरीकडे संतांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन आणि जनआंदोलनाची धार वाढविण्याची तयारी परिषदेने केली.
दि. ३० ऑक्टोबर, १९९० ला प्रत्यक्ष कारसेवा (कर म्हणजे हात - मंदिरासाठी श्रमदान) करण्याचे आवाहन केले. ‘चलो अयोध्या, श्रीराम का बुलावा आया हैं’ या आवाहनाला प्रतिसाद देत देशाच्या कानाकोपर्यातून कारसेवकांचे जत्थे अयोध्येच्या दिशेने निघाले. राजकीय पटलावरही हा विषय गाजत होता. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रा काढण्यात आली.
मुस्लिमांच्या मुजोरीला देशातील ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे ठेकेदार आपल्या वक्तव्याने खतपाणी घालत होते. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या, तर दुसरीकडे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणींची रथयात्रा अडवली. अडवाणींसह हजारो कारसेवकांना बिहारच्या समस्तीपूरमध्ये अटक झाली. अशा स्थितीत दि. ३० ऑक्टोबरची कारसेवा होणार की नाही, नाक्या नाक्यावर पोलिसांची घेराबंदी, रेल्वेत धरपकड, अयोध्येत जाणारे कारसेवक जीवंत परतणार नाहीत, अशाप्रकारचे वातावरण करण्यात माध्यमांची चढाओढ सुरू होती. कारसेवेचा फज्जा उडणार, अशीच स्थिती होती. अखेर दि. ३० ऑक्टोबर, १९९०चा दिवस उजाडला. पोलिसांना गुंगारा देत, वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तसे अयोध्येच्या गल्लीबोळातून कारसेवकांचे जत्थे बाहेर पडले. पोलिसांचे कडे तोडून अशोक सिंघल यांच्या नेतृत्वाखाली कारसेवकांनी वादग्रस्त वास्तूवर चढून कारसेवा संपन्न केली. घुमटावर चढून भगवा फडकवला. शेकडो वर्षाच्या अपमानाचे काही प्रमाणात का होईना परिमार्जन झाले होते. पण कलंकरुपी बाबरी ढाँचा कायम होता.
संतांनी दुसर्या कारसेवेची घोषणा केली. गीताजयंती, ६ डिसेंबर, १९९२. ‘रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे’चा नारा देत कारसेवक अयोध्येत पोहोचले. प्रतीकात्मक कारसेवा करण्यासाठी परवानगी मिळत नाही, हे बघून कारसेवकांच्या संयमाचा बांध फुटला. ‘जय श्रीराम’ची घोषणा करत सगळी वानरसेना वादग्रस्त वास्तूवर तुटून पडली. प्रचंड शक्तिनिशी पडणार्या घणाच्या घावाने ४५० वर्षांची उद्दाम परंपरा डळमळू लागली. कारसेवकांच्या अंगात हजारो हत्तींचे बळ एकवटले होते. शेकडो वर्षांच्या गुलामीच्या शृंखला तुटून पडल्या होत्या. बघता बघता बाबरीचे पतन झाले, गुलामीचा कलंक मिटला. त्याच ठिकाणी मंदिर उभे राहिले, पण भव्य मंदिराचे वचन अजूनही पूर्ण झाले नव्हते.
न्यायालयात खटला संथगतीने पुढे सरकत होता. फे(से)क्युलरवादी वकिलांची फौज खटला प्रलंबित ठेवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावत होती, तर दुसर्या बाजूला न्याय मिळावा, या हेतूने विश्व हिंदू परिषद जनमताचा रेटा वाढवत होती. देशात अनेक ठिकाणी धर्मसभांचे आयोजन करून संसदेत कायदा करावा, अशी मागणीही संतांनी केली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने जनमनाची दखल घेत ऐतिहासिक निर्णय दिला. दि. ९ नोव्हेंबर, २०१९, रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यसब भूमी रामलला कील असे जाहीर केले. आपल्या मानबिंदूच्या रक्षणासाठी सुरू झालेला ४९१ वर्षांचा संघर्ष संपला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना करण्यात आली. महंत नृत्यगोपालदास महाराज त्या न्यासाचे अध्यक्ष चंपतराय सरचिटणीस, तर गोविंददेव गिरी महाराज हे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. न्यासाने लगेचच कामकाज सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट, २०२० रोजी भूमिपूजन संपन्न झाले. ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’ कंपनीवर बांधकामाची जबाबदारी आहे. ‘टाटा कन्सलटन्सी’ कंपनी बांधकाम सल्लागाराच्या भूमिकेत आहे.
श्रीराम मंदिराचा आराखडा चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केला आहे. त्यानुसार मंदिराच्या कळसाची गर्भगृहापासूनची उंची १६१ फूट असेल. सहा फुटांच्या दगडांनी या देवळाच्या भिंती बांधण्यात येतील. मंदिराची लांबी ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट असणार आहे. हे मंदिर तीन मजली होणार आहे आणि मंदिरावर पाच घुमट असतील. मंदिरात सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप, सभामंडप असे चार विभागांत विभाजन करण्यात येणार आहे. संपूर्ण मंदिर ३६६ खांबांवर उभे राहणार आहे. मंदिराचे एकूण क्षेत्रफळ २.७ एकर असेल, तर मंदिराचे बांधकाम ५७,४०० वर्ग फूट असेल. हे मंदिर नागरशैलीत बांधले जात आहे. मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा उपयोग करण्यात येणार नाही. या मंदिरासाठी राजस्थानातील बंशी पहाडपूर येथील खाणीत सापडणारा गुलाबी रंगाच्या दगडाचा वापर केला जाईल. मंदिराच्या सुरक्षा भिंतीसाठी जोधपूरमधील दगडांचा वापर केला जाईल.
मंदिराच्या परिसरात यात्री निवास, सत्संग भवन, संग्रहालय, नक्षत्र उद्यान, रामायण तसेच संस्कृत अध्ययन केंद्र आदी उभारण्यात येणार आहे. या तीर्थक्षेत्र परिसराला चार भव्य प्रवेशद्वार असतील. तसेच परिसरात सहा अन्य मंदिरांचीही उभारणी होणार आहे. भाविकांसाठी ‘सीतामाता रसोई’ या नावाने अन्नछत्रसुद्धा असणार आहे. मंदिर परिसरातील बांधकामांचा विचार करताना पर्यावरण संवर्धनाकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. एकूण ७० एकरच्या विशाल परिसरात उभे राहणारे हे मंदिर हिंदू समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून स्थापित व्हावे, असाच प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीच मंदिरासाठी करण्यात आलेल्या धनसग्रह अभियानात देशातील सर्वसामान्य व्यक्तींना जोडण्याचा प्रयत्न केला गेला. ५,२३,३९५ गावांमधील ६५ कोटी रामभक्तांपर्यंत संपर्क झाला. ४० लाख महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी आपला वेळ दिला आणि ३५०० कोटींहून अधिक धनसंग्रह करण्यात आला. विश्वाच्या इतिहासात हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
गेल्या दीड वर्षात मंदिराचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२३च्या अखेरपर्यंत मंदिर पूर्ण व्हावे, असा प्रयत्न न्यासाच्यावतीने करण्यात येत आहे. मंदिराच्या चौथर्याचे काम आता पूर्ण झाले असून येत्या जूनपासून जोधपूरमधील दगडांच्या साहाय्याने मंदिराच्या चारही बाजूने परिक्रमा मार्ग बांधण्याची सुरुवात होईल. भक्तांसाठी तसेच परिसरातील अन्य सुविधांसाठी मंदिराच्या आसपासच्या भागातील जमीन खरेदी करण्याचेही काम सुरु आहे. आतापर्यंत तीन एकर जमीन खरेदी करण्यात आली असून आणखी जागा मिळविण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. दररोज १२/१२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. २०२३ अखेर मंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या ध्येयाकडे ट्रस्टची वाटचाल सुरू आहे. श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत येणार आहेत, हे लक्षात घेऊन श्रीराम मंदिराची सुरक्षा ‘ब्लूप्रिंट’ तयार करण्यात आली आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिर हे केवळ एका मंदिराचे निर्माण नसून एका राष्ट्रवादी विचारधारेचा आरंभ आहे. हे मंदिर सामाजिक समरसतेचे अनुपम केंद्र बनून संपूर्ण मानवतेला मार्गदर्शन करणार आहे. मंदिराच्या निर्माणासोबतच विविध जातीपातीत खंडित झालेला हिंदू समाज एकवटून उद्घोष करेल.
हिन्दवः सोदराः सर्वे, न हिंदू पतितो भवेत्।
मोहन सालेकर
(लेखक विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे सहमंत्री आहेत.)