रामायण साहित्य विस्तार व अंतरंग

    08-Apr-2022
Total Views |

news 1

 
 
 
 
भारतीय संस्कृतीचे मापदंड समजून घेणे म्हणजेच रामायण. रामायण व राम विश्वाचे असाधारण केंद्र आहे. नीति, न्याय आणि नेतृत्व जाणून घ्यायचे, तर ते रामायणातूनच! मानवीय मूल्यांचे प्रतिनिधित्व राम करतो. रामायणाची शेकडो संस्करणे आहेत. पण, त्या सर्व संस्करणांत राम हा मानव म्हणूनच वर्णिला आहे. जगावे कसे, तर रामासारखे मर्यादापुरुषोत्तम! योगी-महंतांनी श्वासात रामाला गोवले. अशा या रामाचे रामायण आदी कवी वाल्मिकींनी रचिले. परंतु, विश्वव्यापी रामायणाची आणखीही भाषात संस्करणे आहेत. त्यांची माहिती जाणून घेऊया.
 
अध्यात्म रामायण

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव कसा ठेवावा, हे अध्यात्म रामायणातून सांगितले आहे. कथानकास प्रसंगानुरूप तत्वज्ञानात्मक रूप देण्यात आले आहे. ब्रह्मंडपुराणाचा भाग असलेल्या या रामायणात ज्ञान व भक्ती वर्णिली आहे. याची सात कांडे व 15 सर्ग आहेत. यामध्ये राम हे सार्‍या जगाचे अधिकरण आहे. अहंकार, काम, क्रोध, मत्सर आदींचा त्याग करून जो रामाचे ठिकाणी अनन्य भक्ती ठेवतो. मन, वाचा, काये शुद्ध राहतो. त्यास रामस्वरूपाची प्राप्ती होईल, असे सांगितले आहे.
अध्यात्म रामायणात रामाचे अध्यात्मिक, अलौकिक स्वरूप दाखवण्यात आले आहे. सर्व विश्वाला व्यापून राहणारे अव्यक्त, अविनाशी तत्त्व कोणते याचा अभ्यास अध्यात्मातून होतो. हे तत्त्व भक्तांना साध्या सरळ मार्गाने दाखवण्यासाठी रामावतार आहे. त्या रामावताराचे वर्णन भगवान शंकर करतात. राम हे सर्वव्यापी तत्त्व आहे. या रामायणाच्या शेवटी महादेव म्हणतात,
अहं भवन्नां गृणान्कृतार्थो
वसामि काश्यामनिशं भवान्या।
मुमूर्षमाणस्य विमुक्तयेऽहं दिशामि मंत्रं तव रामनाम।
अर्थात, मी महादेव तुझा जप करीत काशीमध्ये निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.
कम्ब रामायण
तामिळ साहित्याची ही सर्वोत्तम रचना आहे. कम्बन चोल राजा कुलोतुंग तृतीय (1178-1202) यांच्या दरबारात होते. कम्ब रामायणात एकूण सहा कांडे आहेत. याचे नित्य पाठ दक्षिण भारतात होतात. ‘बालकांड’, ‘अयोध्या कांड’, ‘अरण्य कांड’, ‘किष्किन्धा कांड’, ‘सुंदर कांड’ आणि ‘युद्ध कांड’ ही कांडे होत. यात उत्तरकांडाविषयी काही माहिती नाही. त्यांचे रामायण रामाच्या राज्याभिषेकाचे वेळी संपते. यात एकूण 123 अध्याय आहेत. वाल्मिकी रामायणातूनच कथानक घेतले आहे. परंतु, त्यातील घटना आपल्या कल्पनेप्रमाणे रंगविल्या आहेत. याचे चरित्रचित्रण करताना कंबनने तामिळ संस्कृती, परंपरा यांच्यानुसार बदल केले आहेत.
कंबनने रामायणात शासन करण्याचे दोन प्रकार सांगितले आहेत.
1) न्याययुक्त शासन : जे सत्कार्यावर आधारित असते. यात शासक आपल्या मंत्र्यांचे म्हणणे किंवा मंत्रणा मानतो. शासकाचा उद्देश सर्वांचे हित असा असतो. अयोध्येत अशा प्रकारचे राज्य होते.
2. शक्ती शासन : याचा आधार साहस आहे. शक्तिशासनात मंत्र्यांची उपेक्षा केली जाते. लंकेत शक्तीशासन होते.
रामचरितमानस

गोस्वामी तुलसीदासद्वारा लिखित रामचरितमानस सोळाव्या शतकातील प्रसिद्ध ग्रंथ आहे. अवधी/हिंदी साहित्यातील ही महान कृती आहे. ‘वाल्मिकी रामायणा’नंतर सर्वाधिक लोकप्रियता या ग्रंथास मिळाली. यास सामान्यपणे ‘तुलसी रामायण’ असे देखील म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत याला विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. उत्तर भारतात याचा नित्यपाठ केला जातो. यामध्ये चरित्र नायक राम मर्यादापुरुषोत्तमाच्या रुपात दाखवले आहेत. संपूर्ण मानवजातीला सर्व शक्तिमान असूनही मर्यादेत राहून परिस्थितीला कसे सामोरे जावे, हे शिकवण्याचे काम रामाद्वारा केले आहे. ‘रामचरितमानस’मध्ये रामकथेद्वारे नैतिकता व सदाचार यांची शिकवण दिली आहे. भारतीय संस्कृतीचा वाहक असा हा ग्रंथ सार्‍या विश्वाला आचरणशास्त्राचा बोधक ठरतो. मानवधर्माचे सिद्धांत यातून आदर्श रुपात सांगितले आहेत.
नाना पुराण, निगमागम, रामायण तसेच काही ग्रंथांचे आधार घेऊन तुलसीने आपल्या आत्मिक सुखासाठी रघुनाथाची गाथा सांगितली आहे, असे खुद्द गोस्वामींनी लिहिले आहे. यामध्ये सामान्यधर्म, पितृधर्म, मातृधर्म, गुरुधर्म, शिष्यधर्म, मित्रधर्म, पतीधर्म, पत्नीधर्म एवढेच काय, तर शत्रूधर्माचेही विश्लेषण योग्य प्रकारे केले आहे. यामुळे समाजमान्य योग्य आचरण करून मानवाने कसे वागावे. हे या ग्रंथातून सांगितले आहे. भक्ती, साहित्य, दर्शन यांचा सुंदर मिलाप म्हणजे ‘रामचरितमानस’ आहे. यामध्ये सात कांडे आहेत. ‘बालकांड’, ‘अयोध्या कांड’, ‘किष्किंन्धा कांड’, ‘सुंदर कांड’, ‘लंका कांड’, ‘उत्तर कांड.’ छंदांच्या संख्येनुसार ‘बालकांड’ सर्वात मोठे, तर ‘किष्किंन्धा कांड’ सर्वांत लहान आहे. याची अनुपम शैली दोहे, चौपाई, सोरठ, छंद यांचा आश्रय घेऊन वर्णन करती झाली आहे. तुलसीदास रामाची आराधना करण्याचा सल्ला निर्गुण निराकार परब्रह्म मानणार्‍यांना देतात. याचाच अर्थ आस्तिक-नास्तिक सर्वांनीच शास्त्रसंमत कसे जगावे, हे शिकण्यासाठी रामायण वाचावे.
भानुभक्तीय रामायण

नेपाळी भाषेमध्ये भानुभक्त आचार्‍यांनी ‘वाल्मिकी रामायणा’वर आधारित रामायण लिहिले. नेपाळी भाषेतील हे पहिले महाकाव्य आहे. यात सात कांडे आहेत. ‘बाल’, ‘अयोध्या’, ‘अरण्य’, ‘किष्किंधा’, ‘सुंदर’, ‘युद्ध’ आणि ‘उत्तर बालकांडा’ची सुरुवात शिवपार्वती संवादाने होते. रामजन्म, विश्वामित्र आगमन, ताडकावध, धनुषयज्ञ व विवाह यामध्ये वर्णित आहेत. ‘अयोध्या कांड’मध्ये राज्याभिषेक तयारी, कैकयी कोप, राम वनवास, दशरथ स्वर्गवास, भरत आगमन, राम भरतभेट, भरताचे पुन्हा अयोध्येत येणे आदी विषय वर्णित आहेत. ‘अरण्य कांडा’त शरभंग, पंचवटी निवास, शूर्पणखा विरुपकरण, मारिचवध, सीता हरण आदी विषय वर्णित आहेत. ‘किष्किंधा कांडा’त वाली वध, सुग्रीव अभिषेक, किष्किंधा गमन आदी विषय वर्णित आहेत.
‘सुंदर कांडा’त हनुमान लंका गमन, रावण-सीता संवाद, सीता- हनुमान भेट, लंकादहन आदी विषय वर्णित आहेत. ‘युद्ध कांडा’त वानरसेनेसह रामाचे लंकेत जाणे, बिभिषण शरणागती, लक्ष्मण मुर्च्छा, रावण वध, विभीषण राज्याभिषेक आदींचे वर्णन आहे. ‘उत्तर कांडा’त रामराज्य, सीता वनवास, अश्वमेध यज्ञ, सीतेचा पृथ्वी प्रवेश, रामाद्वारा लक्ष्मणाचा परित्याग, रामाचे महाप्रस्तान वणूर्र्न कथासमाप्ती होते. अशा प्रकारे रामायण नेपाळी भाषेत घेतले गेले आहे. भारतात ‘रामचरितमानस’ जसे प्रसिद्ध आहे, तशी नेपाळमध्ये भानुभक्तीय रामायणास आहे.
राघवयादवीयम्

दक्षिणेकडील कांचीपुरम येथील कवी वेंकटाध्वरी यांनी सतराव्या शतकात एक अद्भुत ग्रंथ लिहिला. ‘राघवयादवीयम्’ असे त्याचे नाव. यामधील श्लोकांना सरळ वाचले की रामायण व उलटे वाचले की, कृष्ण भागवत कथा असे वाचले जाते. यास ‘अनुलोम-विलोम काव्य’ असेही म्हणतात. याचे केवळ 30 श्लोक आहेत. हा विशेष अद्भुत ग्रंथ आहे म्हणून याचा उल्लेख येथे केला आहे.
उदाहरणार्थ-
वंदेऽहं देवं तं श्रीतंरन्तारं कालं भासा यः।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोगध्ये वासे।

अर्थात, मी भगवान रामाच्या चरणी प्रार्थना करतो की, ज्यांच्या हृदयी सीता वास करते, तसेच ज्यांनी आपली पत्नी सीतेसाठी सह्याद्री पार करुन लंकेला जाऊन रावणाचा वध केला. तसेच, वनवास पूर्ण करून आयोध्येला परत आले.
विलोम-
सेवाध्येयो रामलाली गोप्याराधी मारामोराः।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वंदेऽहं देवम्।

अर्थात, मी रुक्मिणी तसेच गोपींना पूज्य अशा भगवान श्रीकृष्णास प्रणाम करतो. जे नेहमी माता लक्ष्मीबरोबर विराजमान असतात. तसेच ज्यांची शोभा सार्‍या अलंकारांची शोभा हरण करते. अशा प्रकारचा ग्रंथ होणे हीच मोठी अद्भुत गोष्ट आहे. सार्‍या विश्वात अनुपमेय एकमेव असा हा ग्रंथ आहे. ज्यात भारतीय संस्कृतीचे चरित्रनायक वर्णिले गेले आहेत.
बौद्ध रामायण

‘दशरथ जातक’, ‘अनामक जातक’ आणि ‘दशरथ कथानक’ नावाच्या तीन जातककथा बौद्ध साहित्यात उपलब्ध आहेत.
थायलंडमध्ये हरित बुद्ध मंदिर आहे. हे मंदिर थायलंड वासीयांसाठी प्रतिष्ठित तीर्थस्थान आहे. हे हरित बुद्ध त्यांच्या देशाचे रक्षक आहेत, असे ते मानतात. हा मंदिर परिसर दोन किलोमीटर लांबीच्या भिंतीने वेढला गेला आहे. त्यावर रामायण थाई भाषेत चित्रित केले गेले आहे. ‘रामाकिन’ म्हणजे रामाची गौरवकथा याचे चित्रण केले गेले आहे. थायलंडच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व हा महान ग्रंथ चित्रकलाकृतीने करतो.
मुघल रामायण

मुघल बादशाह अकबरद्वारा रामायणाचा फारसी अनुवाद केला गेला. त्यानंतर हमीदा बानू, बेगम रहीम आणि जहांगीर यांनी देखील रामायणाचा अनुवाद केला. अकबराचे सचित्र रामायण सध्या महाराजा सवाई मानसिंग द्वितीय संग्रहालय जयपूरमध्ये आहे. हे रामायण 1584 ते 1588 मध्ये तयार केले गेले. अकबर रामायणात 176 चित्रे आहेत. दशरथ यज्ञ, रामजन्म आदी चित्रे यात आढळून येतात.
श्री भावार्थ रामायण

‘भावार्थ रामायण’ एकनाथ महाराज व गावबा यांच्या काव्य प्रतिमेचा सुंदर मिलाफ आहे. याची भाषा प्रासादिक आहे. यात सात खंड, 296 अध्याय आहेत. रामाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व खुलून वर्णिले आहे. मानवी भावनांचे उत्कट वर्णन यात दिसून येते. यात प्रत्येक आदर्श दडला आहे हे रामायण भक्तिरसाने युक्त आहे. त्यामुळे याचे नित्य पारायण होते. मराठीमध्ये अनेक रामायणांवर कलाकृती आहेत. पण, एकनाथांचे ‘भावार्थरामायण’ अनन्यसाधारण आहे.
गीत रामायण

‘मराठी भाषेतील वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीत रामायण’ लिहिले. ‘गीत रामायणा’त एकूण 56 गीते आहेत. 1955च्या रामनवमीपासून 1956च्या रामनवमीपर्यंत या गीतांना रेडिओवर सादर करुन त्याची शृंखला केली गेली.
यातील गीतांची रचना छंद वृत्तांमध्ये केली गेली. शब्दालंकार व अर्थालंकार यांचा सुयोग्य वापर करून ही गीते सुश्राव्य काव्यात रूपांतरित झाली आहेत. बर्‍याच गीतांचा शेवट पुढील गीतांशी जोडला गेल्याने या गीतांची शृंखला खूप सुंदर तयार झाली आहे. या गीतांमध्ये मानवीय भावनांचे दर्शन झाले आहे. नवरसांचे मिश्रणही उत्तम झाले आहे.
गीतातील शब्दही अचूक पेरले गेले आहेत. ‘हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो’ यामध्ये वात्सल्य रसाची अनुभूती होते. ‘मार’ ही त्राटिका ‘रामचंद्रा’ या गीतात त्राटिकेचे वर्णन बिभत्स रसात केले आहे. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या गीतात रामाचे तोंडून सार्‍या जीवनाचे सार सांगितले आहे. गदिमांनी रामायणातील सर्व सौंदर्य स्थळे अगदी अचूक टिपून त्यापासून सर्वसामान्यांना समजेल, असे रामायण वर्णिले. सुधीर फडकेंनी शब्दांच्या अर्थावर लक्ष देऊन ते गायले. त्यामुळे अजरामर कलाकृती निर्माण झाली. असे हे गीतरामायण हिंदी, गुजराती, कानडी, बंगाली आदी भाषांत अनुवादितही झाले आहे.
रामानंद सागर कृत रामायण (हिंदी मालिका)

1987-88च्या काळात रामानंद सागरद्वारा लेखन केलेली, निर्मिती व दिग्दर्शन असलेली अत्यंत गाजलेली ‘रामायण’ ही मालिका. ‘वाल्मिकी रामायण’, तुलसीदास रचित ‘रामचरितमानस’ हे मुख्य आधार घेऊन ही मालिका तयार केली गेली.
या मालिकेच्या प्रसारणादरम्यान केवळ भारतच नाही, तर जगाच्या दूरदर्शन इतिहासात सर्वात जास्त बघितला जाणारा हा कार्यक्रम होता. या मालिकेमुळे रामायण जगाच्या अगदी कानाकोपर्‍यात पोहोचले. सहज उपलब्ध झाले आणि रामायण सर्वत्र पोहोचवण्याचे हे श्रेय अर्थातच रामानंद सागर यांना जाते.
अशाप्रकारे विविध भाषांमध्ये रामायणाची संस्करणे झाली आहेत. वाल्मिकीय आर्ष रामायण महाकाव्यापासून सुरुवात झालेली रामायण कथा विविध ऐतिहासिक कालखंडातून मानवी मूल्यांचा आदर्श मार्ग दाखवत श्राव्य, दृकश्राव्य, ‘डिजिटल’ तंत्रज्ञानापर्यंत जनमानसात रुजली गेली असून जनमानसात वसलेल्या रामाचे द्योतक म्हणावे लागेल.
 
डॉ. वैशाली काळे-गलांडे