स्वच्छ, कार्यक्षम राज्य कारभाराची नवी संस्कृती भाजपने सुरू केली. ही संस्कृती सरकार आणि जनता यांच्यात थेट संपर्काची यंत्रणा निर्माण करणारी आहे. जनतेला सोबत घेत विकासाच्या वाटचालीत जनतेचाही सहभाग नोंदवत मार्गक्रमण करणारी आहे. भाजपच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्ताने या नव्या राजकीय संस्कृतीचा घेतलेला आढावा.
जो किरीलिऑस या अमेरिकेतील राजकारण्याने राजकीय संस्कृतीबाबत बोलताना, "In politics when you treat people well and they know you are honest, sincere, I think it is advantage. Just because somebody comes from a hard-boiled political culture does not make him a good U.S. senator," असे वक्तव्य केले होते. किरीलिऑस याने अमेरिकेच्या संदर्भात केलेले हे मतप्रदर्शन भारतातील गेल्या आठ वर्षांतील मोदी सरकारच्या कारभाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाचे राज्यशकट चालवणार्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण होणे, त्याच्या प्रामाणिकतेबद्दल आणि सचोटीबद्दल खात्री निर्माण होणे आवश्यक असते. ही खात्री देशाचे सर्वोच्च पद भूषविणारी व्यक्ती आपल्या राज्य कारभाराच्या पद्धतीतून निर्माण करते. एखादी व्यक्ती राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी असली आणि त्या व्यक्तीकडे निष्कलंक चारित्र्य नसेल, तर त्या व्यक्तीला राजकारणात विश्वासार्हता निर्माण करता येत नाही, हे किरीलिऑस याचे निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात सर्वार्थाने सिद्ध झाले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एकहाती यश मिळवत केंद्राची सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पार्टीने केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांत आपल्या विचारधारेच्या आधारे विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत आणि देशाचा सर्वांगीण विकास हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत प्रस्थापित राजकीय संस्कृती मोडीत काढली. स्वच्छ, कार्यक्षम राज्य कारभाराची नवी संस्कृती सुरू केली. ही संस्कृती सरकार आणि जनता यांच्यात थेट संपर्काची यंत्रणा निर्माण करणारी आहे. जनतेला घेत विकासाच्या वाटचालीत जनतेचाही सहभाग नोंदवत मार्गक्रमण करणारी आहे. भाजपच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्ताने या नव्या राजकीय संस्कृतीचा घेतलेला आढावा.
दि. ६ एप्रिल, १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आणीबाणीच्या कालखंडात विशिष्ट परिस्थितीत जन्मलेल्या जनता पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली. त्याआधी १९५१ पासून भारतीय जनसंघ राष्ट्रीय राजकारणात होता. जनसंघाचेच नवे रुप भारतीय जनता पार्टीच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात कार्यरत झाले. १९८० ते २०२२ असा ४२ वर्षांचा कालखंड नजरेसमोर येत असताना भारतीय जनता पार्टीने राजकारणात या कालखंडात आपले स्वतःचे स्थान निर्माण करताना, देशात नवी राजकीय संस्कृती जन्माला घालण्याचेही काम केले. १९५१ ते १९७७ या काळात असलेल्या जनसंघाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर मर्यादितच होता. हिंदुत्ववादी शक्तींबद्दल महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर पसरवल्या गेलेल्या समज-गैरसमजांमुळे जनसंघाच्या वाढीला अनेक मर्यादा आल्या. त्याही अडथळ्यांवर मात करत जनसंघ १९६७ पर्यंत ३५ खासदार निवडून आणण्याएवढा दखलपात्र बनला होता. १९९०च्या दशकात भारतीय जनता पार्टीला काही राज्यांत आणि देशाचीही सत्ता मिळाली. केंद्रात सरकार स्थापन करताना भारतीय जनता पार्टीला अनेक प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागली. या तडजोडीच्या राजकारणाचा अपरिहार्य परिणाम सत्ता राबविताना झाला.
जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीने प्रखर राष्ट्रवादाबरोबरच समाजातील सर्वांत अविकसित माणसापर्यंत सरकारच्या योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या ‘अंत्योदय’ विचारसरणीला सर्वोच्च स्थान दिले. २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये केंद्रात स्वबळावर सत्ता स्थापन केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला आपली ‘अंत्योदया’सारखी तत्वप्रणाली प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर राष्ट्रवादाच्या विचारधारेला विकासाची जोड देत देशाला समृद्ध, बलशाली राष्ट्र बनविण्याच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. प्रखर राष्ट्रवादाचा अर्थ केवळ शत्रू राष्ट्राला डोळ्यांपुढे ठेवून देशाला शस्त्रसज्ज बनवणे, असा नसून देशाला आर्थिक दृष्टीनेही सामर्थ्यशाली बनवणे असाही आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या राजवटीत शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींना तितक्याच ताकदीने उत्तर दिले गेले. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा सामर्थ्यशाली राष्ट्र, अशी तयार करण्यात गेल्या आठ वर्षात यश आले आहे. भारत कुणावरही आक्रमण करणार नाही. मात्र, भारतावर कुणी आक्रमण केले अथवा दहशतवादी कारवायांद्वारे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा खणखणीत संदेश २०१६चा ‘सर्जिकल स्ट्राईक’, २०१९ मधील बालाकोट ‘एअर स्ट्राईक’ यातून संपूर्ण जगाला गेला आहे. २०१७ मध्ये चीनने डोकलाम येथे केलेली घुसखोरी, २०२० मध्ये लडाखमध्ये केलेली आगळीक भारताने तितक्याच ताकदीने हाणून पाडली. १९६०च्या दशकात ड्रॅगनने केलेल्या चढाईचा इतिहास पाहता भारताने चीनला दिलेले हे उत्तर आंतरराष्ट्रीय राजकारणाला अनपेक्षित होते. नवी राजकीय संस्कृती यालाच म्हणतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात बड्या शक्तींच्या ‘अरे’ला ‘का रे’ असे म्हणण्याचे सामर्थ्य निर्माण करणे म्हणजेच नवी संस्कृती जन्माला घालणे. ‘आत्मनिर्भर योजने’सारख्या योजनेतून आंतरराष्ट्रीय मापदंडावर टिकणारी उत्पादने निर्यात करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळाली आहे.
भारतासारख्या कल्याणकारी शासन पद्धत स्वीकारलेल्या देशात सरकारी योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्याची २०१४ पर्यंतची रूढ पद्धत मोदी सरकारने निर्धाराने बदलली. या रूढ पद्धतीत सरकारी यंत्रणेतील आणि राजकीय व्यवस्थेतील मध्यस्थांचे जाळे निर्माण झाले होते. ‘जन-धन योजने’तून अल्प उत्पन्न, दारिद्य्र रेषेखालील जनतेची बँक खाती उघडून ‘उज्ज्वला पंतप्रधान आवास योजने’सारख्या अनेक योजनांचे फायदे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. शेतकर्यांनाही याच मार्गाने साहाय्य केले जात आहे. हे करीत असताना लाभार्थी जनतेशी नित्य संवाद साधून तसेच विविध माध्यमांतून जनतेचे मत जाणून घेतले जाते आहे. पंतप्रधानांकडे तक्रार पाठविल्यास त्याची तातडीने दखल घेणारी यंत्रणा निर्माण केली गेली आहे. वरवर अगदी छोटी वाटणारी, पण अनेकांनी अनुभवलेली गोष्ट म्हणजे रेल्वे प्रवाशांनी प्रवासातील अडचणींबद्दल केलेल्या ‘ट्विट’ दखल घेऊन त्याचे निराकरण केले जाते ,असा अनुभव अनेकांना आला आहे. द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्गांची कामे धडाक्याने होत आहेत. यातून राज्यकारभाराच्या कार्यक्षम संस्कृतीचा अनुभव जनता घेत आहे.
- केशव उपाध्ये
मुख्य प्रवक्ते, भाजप