‘सेल्स’, ‘मार्केटिंग’ आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणारा उद्योजक

    29-Apr-2022
Total Views |
 
 
mtb
 
 
 
 
 
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कुठलाही व्यवसाय हा तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यातच व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर स्वबळावर काम करणे तसे क्रमप्राप्तच. ‘सेल्स’, ‘मार्केटिंग’ आणि तंत्रज्ञान या हातात हात घालून जाणार्‍या गोष्टी आणि सध्याचे उगवते ‘डिजिटल मार्केटिंग’चे क्षेत्र हाच ताळमेळ शिकवते. याच ‘डिजिटल मार्केटिंग’ क्षेत्रामधला व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कल्पना ‘लीडपूल्स’ या कंपनीच्या माध्यमातून सत्यात उतरविणार्‍या सुमित गोकर्ण यांच्या उद्योजकीय प्रवासाविषयी...
 
 
 
कुठलाही व्यवसाय करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपल्या उत्पादनाचे किंवा सेवेचे नेमके ग्राहक कोण, हे ओळखता आले पाहिजे. त्यानंतर अशा हक्काच्या ग्राहकांना चांगली सेवा कशी देता येईल, याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. एकूणच काय तर ग्राहकाभिमुख व्यवसाय करता आला पाहिजे. त्यातून जर ‘सेल्स’ आणि ‘मार्केटिंग’चे काम करत असाल, तर त्यामध्ये ग्राहकाला सर्वोत्तम सेवा देणे, हेच यशस्वी आणि दीर्घकाळ चालणार्‍या उद्योगाचे रहस्य म्हणावे लागेल.
 
 
 
 
‘लीडपूल्स’ या ‘डिजिटल मार्केटिंग’ क्षेत्रातील ख्यातनाम कंपनीचे सुमित गोकर्ण यांचा उद्योजकीय प्रवासही असाच विलक्षण. व्यवसाय सुरू करण्याआधी दहा वर्षे ‘सेल्स’ आणि ‘मार्केटिंग’चा प्रदीर्घ अनुभव सुमित यांच्या गाठीशी होता. साधारणतः एवढ्या अनुभवानंतर, माणूस कायम पुढे जाण्याचा, त्याच कंपनीत वरिष्ठ पदावर जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण, सुमित यांनी स्वतःची कंपनी असावी, स्वतःचा व्यवसाय असावा, हा विचार केला आणि त्यादृष्टीने कामही सुरू केले.
 
 
 
 
सुमित कायमच हटके विचारांतून काम करत आले आहेत. बारावी झाल्यानंतर त्यांना नोकरी करावी लागली. नोकरी करताना त्यांना जाणीव झाली की, आपल्याला आणखीन पुढे जायचे असेल, प्रगती करायची असेल तर शिक्षण घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. स्वतः ‘सेल्स’ या क्षेत्रात काम करत असल्याने पुढे त्याही क्षेत्रातले शिक्षण घेतले. पुढे ‘डिजिटल मार्केटिंग’ या क्षेत्राशी संपर्क आल्यावर या नवीन क्षेत्रांची आवड निर्माण झाली. सतत नवीन काहीतरी शिकत राहिले पाहिजे, ही कायमच वृत्ती असल्याने त्यांनी याही क्षेत्राची माहिती करुन घेतली आणि या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. बर्‍याच ठिकाणी त्यांना कामाच्या निमित्ताने जावे लागले. अनेकांशी संपर्क आला. यातूनच या क्षेत्रात आपल्या स्वतःचे स्वतंत्र काम असले पाहिजे, स्वतःचेकर्तृत्व गाजवायला स्वतःचा ‘स्कोप’ असला पाहिजे, याच विचारातून त्यांनी नोकरी सोडली आणि त्याच ठिकाणी त्यांच्या ‘लीडपूल्स’ या कंपनीचा जन्म झाला.
 
 
 
 
साधारणतः मराठी कुटुंबांमध्ये कायमच नोकरीला प्राधान्य दिले जाते. पण, सुमित यांच्या घरी काहीसे वेगळे वातावरण होते. सुमित म्हणतात की, “माझे वडील व्यवसाय करत असल्याने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मीही व्यवसायात उतरलो. मी १२ वर्षे नोकरी केली. या नोकरीच्या निमित्ताने मला संपूर्ण देशभर काम करता आले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी जे काम करतोय, त्यात काहीच नावीन्य नाही,” ‘मी व्यवसायाकडे कसा वळलो?’ याचे उत्तर देताना सुमित सांगत होते.
 
 
 
 
ते पुढे म्हणतात की, “ ‘सेल्स’ म्हणजे विक्री करत असताना माझ्या लक्षात आले की, माझ्या हाताखाली जे लोक आहेत, ते जे काम करत आहेत ते आणि मी मोठ्या पदावर बसून करत असलेल्या कामांमध्ये काहीच फरक नाही. तेच ते काम आम्ही करत आहोत. मग, यात काहीतरी नावीन्य असले पाहिजे. नावीन्य आणले पाहिजे. याच भावनेतून व्यवसायाकडे वळलो,” असे सुमित सांगतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांना पहिला ग्राहक, पहिले काम मिळाले. तोपर्यंत घरात काय सांगणार, याच विचारातून घरी व्यवसायाविषयीची माहिती लपवूनच ठेवली. पण, पहिले काम मिळाल्यावर मात्र त्यांनी घरी सर्व काही सांगितले. पण, त्या एकाकामाची दहा कामे होईपर्यंतचा प्रवास खूप अवघड, संघर्षमय होता. पण, तो काळ गेल्यावर कामे मिळायला लागल्यावर घरच्यांचाही सुमित यांच्या कामावर विश्वास बसला आणि मग घरच्यांनीही साथ देण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
“ ‘डिजिटल मार्केटिंग’ हा व्यवसाय अगदी अलीकडच्या काळात भारतात रुजायला लागला आहे. त्यामुळे बरेच समज-गैरसमज या क्षेत्राबद्दल आहेत. ‘डिजिटल मार्केटिंग’ म्हणजे फक्त ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स’वर जाहिरात करणे, त्यानंतर त्या माध्यमातून लोकांपर्यंत फक्त आपले उत्पादन किंवा सेवा पोहोचवणे एवढेच आहे का? तर अजिबात नाही. ‘डिजिटल मार्केटिंग’ हा संपूर्ण ‘मार्केटिंग’च्या ‘स्ट्रॅटेजी’चा फक्त 20 टक्केच हिस्सा आहे. त्यामुळे ‘डिजिटल मार्केटिंग’बरोबरच आपण आपल्या व्यवसायाची एक ‘स्ट्रॅटेजी’ ठरवणे गरजेचे आहे आणि ‘डिजिटल मार्केटिंग’ करणार्‍या व्यावसायिकाने आधी पूर्ण काम समजून घ्यावे. कामाचा पूर्ण अभ्यास करूनच मग त्या कामाच्या ‘डिजिटल स्ट्रॅटेजी’चा अभ्यास करावा. मग, त्या सेवेला किंवा उत्पादनाला नेमकी कशाची गरज आहे, त्याच गोष्टींवर ‘फोकस’ करून त्याच्याच भोवती सर्व ‘मार्केटिंग’ करावे, असे माझे मत आहे,” असे सुमित सांगतात.
 
 
 
 
या क्षेत्रात ‘एथिक्स’ म्हणजे मूल्यांना खूप महत्त्व आहे. व्यवसाय करताना काही तडजोडी करत आपल्याला आपल्या तत्त्वांना, मूल्यांना थोडेसे बाजूला ठेवावे लागते. पण, पूर्णपणे या गोष्टींना बाजूला ठेवणे चुकीचे आहे. आपण मालक म्हणून जर आपल्या मूल्यांशी प्रामाणिक असू, तर ती आपल्या कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याकडून ती आचरणात आणली जातात. जरी आपले कर्मचारी बदलले, तरी आपली मूल्ये बदलत नाहीत. त्यामुळेच ती आपली ओळख बनतात आणि बनली पाहिजेत, असे सुमित मानतात.
 
 
 
 
उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात की, “या क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वलच आहे. या क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरु कारण्यासाठी येणार्‍या नवीन उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पण, या उद्योजकांनी या क्षेत्रात व्यवसाय करताना काही पथ्ये सांभाळली पाहिजेत. आपण फक्त ‘डिजिटल मार्केटिंग’ न करता आपल्या ग्राहकाला संपूर्ण मार्केटिंगचा विचार समोर मांडावा. जेणेकरून ग्राहकाला आपल्या कामाची व्याप्ती वाढवता येईल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. हळूहळू या क्षेत्रातला व्यवसाय विस्तारात जाणार आहे. आज असे एकही क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रात ‘डिजिटल मार्केटिंग’चा वापर होत नाही. पण फक्त ‘डिजिटल मार्केटिंग’ केले म्हणजे सगळे झाले. असे नाही. आपले ‘प्रॉडक्ट’ चांगले करण्यावर भर द्या, आपले ‘मार्केटिंग’ जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख कसे करता येईल, याचा विचार करा. म्हणजे तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता. आणि हेच सूत्र आपण ग्राहकांसोबत काम करताना वापरले पाहिजे, जेणेकरून आपला व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख होईल.”
 
 
 
 
व्यवसाय एखादी व्यक्ती तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचीही वैयक्तिक प्रगती करू शकतात. त्यामुळे सुमित काही गोष्टी कायम करतात. ते म्हणजे, त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगारांना ते ‘उद्याचे उद्योजक’ म्हणतात. आपण जोपर्यंत तशा संधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत कोणीच मनापासून काम करणार नाही. त्यामुळे आपण सातत्याने आपल्या कामगारांना प्रोत्साहन देत राहिले पाहिजे. नवीन नवीन गोष्टी शिकण्याची संधी उपलब्ध करून देत राहिली पाहिजे. त्यांच्या कल्पनांना, विचारांना आपल्या कामांमध्ये स्थान दिले पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ आणि उद्योगही पुढे जाईल, अशी माझी कल्पना आहे, असे गोकर्ण सांगतात. एका वेगळ्याच वाटेवरून सुरू झालेला, खूप प्रामाणिक आणि सर्वसमावेशक ध्येय ठेवून चाललेला गोकर्ण यांचा प्रवास खरेच विलक्षण आहे.
 
 
- हर्षद वैद्य