समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरी त्या काम करून जाते.
आपण मागील लेखात पाहिले की, माणूस व्यर्थ, निरर्थक बडबड करून आपल्या आयुष्याचा वेळ फुकट घालवत असतो. त्याने दोन प्रकारे नुकसान होते. एक म्हणजे, निरर्थक बडबड करण्यात आनंद मिळत असल्याने आपले हित कशात आहे, हे माणसाला कळत नाही आणि दुसरे म्हणजे, सुखाचा अंतकाळ साधण्यासाठी मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण होऊन त्याचे नाम मुखी येण्याची शक्यता पार मावळते. आयुष्यभर भगवंताच्या नामाचा गुणांचा अभ्यास चिंतन न करता सर्व वेळ निरर्थक गोष्टीत फुकट घालविलेला असतो. मग ते नाम अंतकाळी कसे मुखात येईल? मागील लेखात सांगितल्याप्रमाणे श्लोक क्र. २३ व २४ मधील ‘न बोले मना राघवेवीण काही’ व ‘रघुनायकावीण वाया सिणावे’ या ओळीत, तसेच मनाच्या श्लोकांतील इतर श्लोकांत काही ऐतिहासिक सत्य सांकेतिक रुपात सांगण्याचा प्रयत्न आहे का, हे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. वरील ओळींचा सरळ अर्थ राघवाची भक्ती सांगणारा आहे आणि तो राघवाच्या भक्तिपंथासाठी अध्यात्मदृष्ट्या योग्य आहे, याबद्दल कोणाचे दुमत नाही. तथापि वर उल्लेखलेले श्लोक आणि मनाच्या श्लोकांतील श्लोक क्र. ३८ ते ४२ हे पाच श्लोक सांगताना समर्थांच्या दृष्टीसमोर राघवाच्या भक्तिपंथाबरोबर तत्कालीन राजकीय, सामाजिक, परिस्थिती तसेच शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी स्वामिनिष्ठ माणसे तयार करण्याची प्रेरणा या हकिगती असाव्यात, असे वाटते. समर्थांच्या अंत:मनात याविषयी मंथन चालू असावे, असे मानण्यास जागा आहे. श्लोक क्र. ३८ ते ४२ या सर्व श्लोकांची शेवटची ओळ ‘मना सज्जना राघवी वस्ति कीजे’ अशी आहे. ‘वस्ती’ या शब्दांचा अर्थ राहण्याची जागा, निवास करून राहणे, असा आहे. मनाने राघवाजवळ वस्ती करुन राहायचे म्हणजे काय करायचे, याचा विचार केला पाहिजे.
अध्यात्मदृष्ट्या राघवाचे, भगवंताचे स्थान वैकुंठात किंवा भक्तांच्या हृदयात आहे, तेथे जवळपास वस्ती करून राहायचे म्हणजे मनात राघवाचे स्मरण काय असू द्यायचे, असा आशय भक्तिपंथाला अनुसरून सांगता येतो. तथापि समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरित्या काम करून जाते, याचे उत्तम उदाहरण ब्रिटिश राजवटीत पाहायला मिळते. त्या काळात लॉर्ड कर्झनची कारकिर्द अतिशय त्रासदायक होती. लोकांचा छळ होत होता, पण त्याविषयी उघडपणे बोलता येत नसे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी ‘किचकवध’ नावाचे नाटक लिहिले. ते नाटक महाभारतातील पांडवांच्या अज्ञातवासातील वास्तव्यावर लिहिलेले होते. पांडव व द्रौपदी वेश पालटून एका राजाकडे नोकरी करत होते. तेथील राजाचा मेव्हणा व सेनापती किचक याची द्रौपदीवर वाईट नजर होती. तो तिला त्रास देऊ लागला. पांडवांनी कटकारस्थान करून एका रात्री किचकाला नृत्यशाळेत एकट्यालाच बोलवून घेतले. त्यावेळी संधी साधून भीमाने किचकाला ठार केले. हे नाटक पौराणिक विषयावरचे असून त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले होते. त्या नाटकाचा ब्रिटिश सत्तेशी थेटपणे काहीही संबंध नव्हता, तरीही इंग्रजांनी त्या नाटकावर बंदी आणली. कारण, त्यातील सांकेतिक, रुपकात्मक भाषा नाटकातील किचक म्हणजे लॉर्ड कर्झन, द्रौपदी म्हणजे पारतंत्र्यातील भारत आणि भीमकृत्य म्हणजे लोकांचा सशस्त्र उठाव हे रूपक तत्कालीन सर्व लोकांना माहीत होते, हे चाणाक्ष इंग्रजांनी ओळखले होते. त्यांनी त्या नाटकावर बंदी आणली आणि असाच काहीसा प्रकार समर्थांच्या वरील श्लोकांनीही साधला आहे. त्यातील रूपक स्पष्ट करण्याअगोदर त्याची आवश्यकता स्पष्ट करू.
समर्थ वैराग्याच्या भगव्या वेषात भ्रमण करीत असत. त्यांचा निवास गावाच्या डोंगरातील घळीत असे. ते आपल्या नियोजित कार्यासाठी गावात येत असत. त्यांच्यावर मुसलमानी अंमलदारांची करडी नजर असे. हा वैरागी कीर्तन करतो, पूर्जा-अर्चा सांगतो, तो लोकांना शिवाजी महाराजांबद्दल सांगून आपल्या विरुद्ध भडकवत नाही, असे औरंगजेबाच्या हेरांनाही वाटत होते. तथापि समर्थांचे राजकारण गुप्तरूपे चाललेले असे, याची त्यांना कल्पना नव्हती. समर्थ म्हणतात, ‘राजकारण बहुत करावे। परी गुुप्तरूपे॥’ ब्राह्मण मंडळ्या, भक्त मंडळ्या मिळवणे त्यातून महंत शोधून त्यांना स्वराज्य व संस्कृती या कामासाठी मठांवर पाठवणे, शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी अनुकूल व स्वामिनिष्ठ सेवक तयार करणे ही कामे बिनबोभाट चालू होती. लोकांना रामराज्याची जाणीव करून देऊन त्यांच्या मनात तत्कालीन जुलमी मुसलमानी राजवटीविरुद्ध वन्ही पेटवण्याचे काम गुप्तपणे चालू होते. समर्थांचे व शिवाजी महाराजांचे संबंध घनिष्ट आणि जिव्हाळ्याचे होते. समर्थांच्या राजकारणातील सहभागाचा विषय निघाला की, काही लोक लगेच ऐतिहासिक पुराव्याचे कागद दाखवा म्हणून सांगू लागतात. पण, त्यांनी हे लक्षात घ्यावे की प्रत्येकवेळी ऐतिहासिक कागदपत्रेच बोलतात असे नाही. काही वेळा परिस्थितीजन्य तर्कावर शक्याशक्यता आजमावता येते आणि त्यालाही ऐतिहासिक महत्त्व असते.
समर्थांची रामभक्ती सर्वश्रुत आहे. राम न्यायी, सज्जन, शूर, पराक्रमी, दुष्ट दुर्जनांचा, संहारक सज्जनांचा कैवारी, प्रजेचे हित जाणणारा राजा होता. तो स्त्रियांवर अत्याचार करणार्याला कर्दनकाळ होता. शिवाजी महाराजांच्या ठिकाणी हे गुण असल्याने लोक त्यांना प्रभू रामचद्रांचा अवतार मानीत, दासबोधातील 2.8 सद्विद्या निरुपण या समासात सांगितलेली आदर्श पुरुषांची लक्षणे रामाची आठवण करून देतात. त्यांनी सांगितलेले, ‘जयवंत’, ‘यशवंत’, ‘कीर्तिवंत’, ‘सामर्थ्यवंत’, ‘युक्तिवंत’, ‘बुद्धवंत’ हे सारे गुणविशेष स्वामींनी ‘निश्चयाचा महामेरू’ या अप्रतिम कवितेत शिवाजी महाराजांसाठी वापरलेले आहेत. यावरून स्वामीसुद्धा शिवाजी महाराजांकडे ‘रामावतार’ म्हणून पाहत होते. त्याकाळी लोकांमध्ये प्रचलित संकेत वा रुपके अशी होती. शिवाजी महाराज म्हणजे राम, विश्वास; शूर योद्धे म्हणजे मारुती; शिवरायांचे सैन्य म्हणजे मारुतीचे शेपूट; पारतंत्र्य आपल्या देश म्हणजे सीता; औरंगजेब म्हणजे रावण या रुपकांधारे पुढील ओळीतील ध्वनित अर्थ पाहा. कंसातील अंक श्लोक क्रमांक आहेत.
अवज्ञा कदा हो येदर्थी न कीजे। (३८)
याबाबतीत शिवाजी महाराजांची आज्ञा पाळा. त्यांची आज्ञा कधीही मोडू नका, ते आपल्या हिताचे आहे.
तयालागीं सर्व चांचल्य दीजे। ३९)
काही मराठा सरदार कधी आदिलशहाकडे, तर कधी मुघलांकडे जात. त्यांचा स्वभाव चंचल होता. तेव्हा आता हे चांचल्य शिवरायाला अर्पण करुन त्याच्या ठिकाणी स्थिर राहा.
बहु हिंडता सौख्य होणार नाही।(४१)
चंचल मनाने सारखे इकडेतिकडे फिरत राहाल, तर त्याने तुम्ही सुखी होणार नाहीत.
अतिआदरे ठेविजे लक्ष तेथे। (४०)
शिवरायांकडे पाहताना अतिशय आदराने पाहा. तिथेच तुमचे लक्ष असू द्या.
रघुनायका आपलेसे करावे।(४२)
शिवाजी महाराजांना आपलेसे करून राहण्यास तुमचे भले आहे. या सर्व श्लोकांच्या शेवटी ‘मना सज्जना राघवी वसति कीजे’ असा उल्लेख आहे.
याचा संकेतार्थ असा की, तुम्ही सर्वांनी शिवाजी महाराजांच्या आसपासच वस्ती करून राहा, त्यातच तुमचे भले आहे. कारण, मुसलमानी जुलमी सत्तेपासून शिवाजी महाराज तुमचे रक्षण करणारे आहेत. त्यांना कधी सोडू नका. ‘रघुनायकावीण वाया सिणावे’ असे वर म्हटलेले आहे. त्याकाळचा शिवरायांचा विश्वासू सेवकवर्ग ही सांकेतिक रुपके जाणत होता, म्हणून स्वामी रुपकात्मक भाषेचा प्रयोग करीत असावेत, असे म्हणायला हरकत नाही.(क्रमशः)
सुरेश जाखडी