वैचारिक प्रगल्भतेचा उदयोन्मुख अभिनेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2022   
Total Views |

abhishek
 
 
 
नाशिकमधून मुंबईला येऊन मराठी चित्रसृष्टीतील अभिनय क्षेत्रात अल्पावधीतच यश प्राप्त करणार्‍या अभिषेक रहाळकरविषयी आज जाणून घेऊया...
 
 
 
 
अभिनय केवळ एक आवड नसून ती एक अभिव्यक्तीची जागृती आहे. विचारांची प्रगल्भता जर अभिनयातून समोर येत असेल, तर अभिनय आदर्श वस्तूपाठाची निर्मिती करतो. प्रामाणिकपणा, गुणवत्ता व एखाद्या क्षेत्रात वाटचाल करण्याचा ठाम मानस या तिहेरी संगमातून अभिनय क्षेत्रात अल्पावधीतच यश प्राप्त करणारे नाशिकमधील नाव म्हणजे अभिषेक रहाळकर. अभिषेकचे बालपण नाशिकच्या रविवार कारंजा भागातले. शहराच्या वाडा संस्कृतीशी त्याची आजही नाळ जोडलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षणदेखील त्याने नाशिकमध्येच पूर्ण केले. आज आपल्या अभिनयातून विविध पात्र साकारणारा अभिषेक लहानपणी अगदी बुजरा होता. मात्र, सभाधीटपणा हवा, आपल्या मुलातील गुणांना वाव मिळायला हवा याबाबतच्या आईच्या आग्रहाखातर शालेय जीवनात तो वक्तृत्व स्पर्धा, नाट्याभिनय यात सहभागी होत होता. या स्पर्धांमुळे आपण घडत गेलो. आपल्याला एखादी गोष्ट मोठ्या समूहाला सांगायची असेल, तर एरवी ते तितकेसे सोपे नसते. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु, मंचावरून जेव्हा आपण ती गोष्ट सांगतो तेव्हा मुळातच सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे असते आणि ते लक्ष टिकवून ठेवणे इतकेच आपले महत्त्वाचे काम असते, हा धडा आपल्याला मिळाला याचे श्रेय आईच्या प्रयत्नांना असे अभिषेक आवर्जून सांगतो.
 
 
 
शालेय व महाविद्यालयीन जीवनातील अभिनयाची व रंगमंचाची आवड अभिषेकच्या मनात कायमच होती. त्यातूनच त्याने ‘सीए’चे शिक्षण घेत असताना एकीकडे नाटकात काम करायला सुरुवात केली. आपल्याला खर्‍या अर्थाने या क्षेत्रात यश मिळवायचे असेल, अजून शिक्षण घ्यायचे असेल, तर मुंबईत जायला हवे, असे त्याला प्रकर्षाने जाणवत होते. अर्थात त्याच्या या इच्छेबाबत त्याचे पालक मात्र साशंक होते. पुढे लहान-मोठ्या कामांमधून स्वकष्टाने काही पैसे उभे करून काही पैसे वडिलांकडून घेत अभिषेकने मुंबई गाठली. आता खर्‍या संघर्षाला सुरुवात झाली होती. “घरातील सुरक्षित वातावरण सोडून मुंबईच्या मायानगरीत स्वतःचे स्थान शोधणे, मनाजोगते काम मिळवणे, कुठलाही अनुभव पदरी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना नव्या क्षेत्रात पाऊल टाकणे तसे सोपे नसते”, असे अभिषेक सांगतो. काही जुजबी ओळखी असल्या तरी त्याआधारे काम न मिळवता स्वबळावर उभे राहण्याचा त्याने निर्णय घेतला.मराठी सिने-नाट्य सृष्टीऐवजी हिंदीत काही करता येईल का, असा सुरुवातीला त्याने प्रयत्न केला.
 
 
त्यादरम्यान आलेले अनुभव अभिषेक अतिशय रंजकपणे मांडतो. तेव्हा, अभिनयाबरोबरच लेखनाविषयीची त्याची आवड सहजपणे दिसून येते. हिंदीमध्ये संधीच्या शोधात असणार्‍या प्रचंड मोठ्या संख्येतून आपल्याला काम मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय हे लवकरच त्याच्या लक्षात आले. एकीकडे मराठीमध्ये अभिषेकला काही मालिकांमधून संधी मिळत गेली. काही लहान-मोठ्या भूमिका करत आर्थिक नियोजनाचे गणित सांभाळत मुंबईत टिकून राहणे साधत असतानाच एकीकडे ‘स्वामिनी’ मालिकेतील सदाशिवरावभाऊंची भूमिका अभिषेककडे चालून आली. सदाशिवरावभाऊंची व्यक्तिरेखा साकारताना अभिनयाच्या वाटेवर त्याचे खर्‍या अर्थाने नाव होऊ लागले. पुढे ‘वैदेही’ या मालिकेतील प्रमुख भूमिका त्याला मिळाली. एव्हाना त्याने आपल्या अभिनयक्षमतेने सर्वत्र प्रशंसा मिळवली होती. एका अंध व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी अभ्यास म्हणून अंध व्यक्तीप्रमाणेच मुंबईत केलेला प्रवास, त्यावेळी लोकांनी केलेली मदत आपल्या कायमच स्मरणात राहील, असे अभिषेक सांगतो. आपल्या अभिनयाची ती पावती होती, असे त्याला वाटते. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत सध्या अभिषेक भूमिका करत आहे. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक भूमिकेतून वैविध्य टिकवून ठेवण्यात तो यशस्वी ठरला आहे.
 
 
 
 
संवेदनशील जाणीवसंपन्नता आणि माध्यमांतील अभ्यासपूर्ण वावर हे अभिषेकचे वैशिष्ट्य. नाटक, डेली सोप, रंगमंचावरील लहान-मोठी सगळी कामं, लेखन अशा सगळ्याच आघाड्यांवर रस असलेला, संधीचे सोने करणारा अभिषेक चित्रपटांतूनही सशक्त भूमिका करण्याचा निर्णय बोलून दाखवतो. या प्रत्येक माध्यमाचे आपले बलस्थान तो ओळखून आहे. निरनिराळ्या भूमिकांमधून अभिनय करताना आपण माणूस म्हणूनही घडत जातो, असे त्याला वाटते. मुळातच प्रगल्भ असलेला हा तरुण अभिनेता गज़ल लिहिणारा, उर्दू गज़लचा अभ्यास करणारा म्हणूनदेखील ओळखला जातो.
 
 
आपल्या शहरातून सिनेनाट्य क्षेत्रात पुढे येणार्‍या मुलांसाठी आपण मार्गदर्शन करावे याबाबत तो प्रयत्नशील आहे. सुरुवातीला ‘ऑडिशन्स’मधून मिळणारा ‘नॉट फिट’ हा शिक्का पचवणे, प्रचंड गर्दीत उभे राहून स्वतंत्र स्थान निर्माण होईपर्यंत मानसिकता जपणे, आर्थिक नियोजनाचा अभ्यास असणे, आपल्याला नेमकेपणाने काय हवे आहे याबाबत सजग असणे ही प्रत्येकच क्षेत्रात सुरुवातीच्या काळातली आवश्यकता या क्षेत्रात अधिक ठळकपणे आहे, असे अभिषेक सांगतो. आपल्या यशामुळे आपल्या आई-वडिलांना, परिचितांना, शहराला अभिमान वाटावा, असेच काम अभिषेकला कायम करायचे आहे. स्वप्नांचा योग्य मार्गाने पाठपुरावा केला, तर स्वप्नपूर्ती अवघड नसते, भविष्यात शहीद भगतसिंगांची भूमिका साकारण्याचे स्वप्न मनात बाळगणारा अभिषेक हाच विश्वास देऊन जातो.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@