इलैय्याराजा यांनी मोदी यांचे कौतुक केल्याने जळफळाट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2022   
Total Views |
 
 
ilayaraja
 
 
 
 
 
इलैय्याराजा यांनी प्रस्तावनेत पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केल्याने ‘लेफ्टिस्ट - लिबरल’, पेरीयारवादी आणि द्राविडी चळवळीतील नेते-कार्यकर्ते संतापले आहेत. इलैय्याराजा यांना राज्यसभेचे तिकीट भाजपकडून मिळणार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. इलैय्याराजा यांच्यावर ‘संघी’ असा आरोपही केला जाऊ लागला आहे. इलैय्याराजा यांना कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
  
 
सुप्रसिद्ध संगीतकार इलैय्याराजा यांनी एका पुस्तकात लिहिलेल्या प्रस्तावनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याने त्यांच्यावर द्राविडी चळवळीतील नेते, पेरीयारवादी आदींनी टीका केली आहे. ‘आंबेडकर अ‍ॅण्ड मोदी - रिफॉर्मर्स आयडीयाज, परफॉर्मर्स इम्प्लिमेंटेशन’, असे या पुस्तकाचे नाव असून ते दिल्लीस्थित ‘ब्लू क्राफ्ट फाऊंडेशन’ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत इलैय्याराजा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी या दोघांची तुलना केली आहे. समाजाच्या दुर्बल घटकांना भेडसावणार्‍या समस्यांवर या दोन महान व्यक्तिमत्त्वांनी यशस्वी मात केल्याचा उल्लेख इलैय्याराजा यांनी या प्रस्तावनेत केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या दुर्बल घटकांचे आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी जे विविध उपक्रम हाती घेतले त्या उपक्रमांचेही इलैय्याराजा यांनी कौतुक केले आहे.
 
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकाराने केलेले हे कौतुक न आवडल्याने इलैय्याराजा हे अनेकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. ‘तिहेरी तलाक’ला बंदी घालणारे असे महिलांच्या हिताचे कायदे मोदी सरकारने केले. तसेच, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारखे उपक्रम राबवून मोदी यांनी सामाजिक परिवर्तन घडविले. अशा उपक्रमांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिमान वाटला असता, असा उल्लेख या प्रस्तावनेत करण्यात आला आहे.इलैय्याराजा यांनी संगीतक्षेत्रात मोठे नाव कमविले आहे. ते केवळ संगीतकारच नाहीत. तर कंपोझर, गीतकार, गायक, इन्स्ट्रुमेंटलिस्ट आणि आशियातील पहिले सिम्फनी रायटर म्हणून त्यांनी नावलौकिक संपादन केला आहे. इलैय्याराजा यांच्या नावावर विविध भारतीय भाषांमधील सात हजारांहून अधिक गाणी आहेत. इलैय्याराजा यांच्या संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९८८ मध्ये तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी ‘इसाईगनानी’ (संत संगीतकार) अशी उपाधी देऊन त्यांचा गौरव केला होता. तरुण वयात इलैय्याराजा यांनी साम्यवादी पक्षाचे प्रचारकार्य केले होते. पण, नंतर त्यांनी संगीत साधनेसाठी स्वतःला वाहून घेतले.
इलैय्याराजा यांनी प्रस्तावनेत पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केल्याने ‘लेफ्टिस्ट - लिबरल’, पेरीयारवादी आणि द्राविडी चळवळीतील नेते-कार्यकर्ते संतापले आहेत. इलैय्याराजा यांना राज्यसभेचे तिकीट भाजपकडून मिळणार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. इलैय्याराजा यांच्यावर ‘संघी’ असा आरोपही केला जाऊ लागला आहे. इलैय्याराजा यांना कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. तामिळनाडूमधील एका प्रसिद्ध संगीतकाराने इलैय्याराजा यांना राज्यसभेचे तिकीट देण्यात आले तरीही त्यांना कसलाही दोष देण्याचे कारण नाही, असे मत व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी इलैय्याराजा यांचे जोरदार समर्थन केले आहे. इलैय्याराजा यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे जे व्यथित, विचलित झाले आहेत ते सत्तेचे दलाल आहेत. पण तामिळनाडूमध्ये द्रमुकने जी ‘इकोसिस्टिम’ निर्माण केली आहे ती या संगीतकाराचा आवाज दाबू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. इलैय्याराजा यांनी काय चुकीचे केलेे, असा प्रश्न तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी विचारला आहे. द्रमुक पुरस्कृत जे हल्ले केले जात आहेत ते मागासवर्गीयविरोधी आणि घटनाविरोधी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
इलैय्याराजा यांनी पंतप्रधान मोदी आणि डॉ. आंबेडकर यांची तुलना केली. तसेच,मोदी यांनी दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणाचे जे उपक्रम हाती घेतले त्याबद्दल इलैय्याराजाा यांना जे वाटले ते व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही काय? इलैय्याराजा यांनी जे विचार व्यक्त केले ते मांडण्याचा अधिकार लोकशाही व्यवस्थेने त्यांना दिला आहे. त्या अधिकारांवर आक्रमण करण्याचा अधिकार कोणासही नाही, हे द्राविडी चळवळीतील लोकांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे.
 
 
श्रीनगरमध्ये श्रीराम नवमी उत्साहात
 
 
काश्मिरमध्ये विविध ठिकाणी श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच, श्रीनगरमध्येही श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. श्रीनगरच्या लाल चौकात ही शोभायात्रा वाजतगाजत आली. श्रीनगरचा लाल चौक म्हणजे एकेकाळी दहशतवाद्यांचा अड्डा होता. या चौकात भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यास विरोध केला जात असे. या चौकात पाकिस्तानचा ध्वज अनेकदा फडकविला जात असे. त्याच लाल चौकात श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा वाजतगाजत आली. या शोभायात्रेत हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. शहराच्या टांकीपोरा भागातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. शहराच्या विविध भागातून ही शोभायात्रा गेली. अखेरीस लाल चौकात या यात्रेची सांगता झाली. श्रीनगरमध्ये निघालेल्या या शोभायात्रेदरम्यान ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. श्रीनगरमधील इस्कॉन मंदिरात आयोजित विशेष पूजेनंतर शोभायात्रेस प्रारंभ झाला. शहराच्या संवेदनशील भागातून ही शोभायात्रा तेवढ्याच उत्साहात गेल्याचे दिसून आले. ही शोभायात्रा लक्षात घेऊन अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीनगरचा लाल चौक भारताचाच अविभाज्य भाग आहे हे श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने सर्व जगास दाखवून दिले!
 
राजस्थानमध्ये ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडले
 
राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असताना बुलडोझरचा वापर करून ३०० वर्षांपूर्वीचे एक मंदिर पाडून टाकण्यात आले. या मोहिमेमध्ये अन्य बांधकामेही पाडण्यात आली आहेत. मंदिर पाडण्याच्या घटनेनंतर हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. नुकतीच ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत शिव मंदिर पाडण्यात आले. तसेच, ८६ दुकाने आणि घरे पाडण्यात आली. मंदिर पाडण्यात आल्याच्या घटनेसंदर्भात ‘ट्विट’ करताना, ‘हा काँग्रेस स्टाईल सेक्युलॅरिझम आहे’, अशी टीका भाजप नेते भूपिंदर यादव यांनी केली आहे. मंदिर पाडण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर ‘व्हायरल’ झाला. सत्तारूढ काँग्रेस पक्ष अशा घटनाद्वारे हिंदू समाजास लक्ष्य करीत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. अल्वरचे भाजप खासदार बालकनाथ यांनी या मोहिमेत एका मंदिरातील मूर्तीचीही विटंबना झाल्याचा आरोप केला आहे.
 
मंदिर पाडण्यात आल्याच्या घटनेनंतर उसळलेला वाद लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय पालिकेच्या बैठकीत एकमताने घेण्यात आल्याचा दावा केला आहे. पण, राजगढ पालिकेचे अध्यक्ष सतीश गुरिया यांनी नगरपालिकेने आपल्या प्रस्तावामध्ये मंदिरे पाडण्याचा उल्लेख कधीच केला नव्हता, असे स्पष्टपणे सांगितले आहे. अतिक्रमणे पाडण्यात आल्याच्या घटनेनंतर पीडित जनतेने संघर्ष समिती स्थापन करून दाद मागण्याचे ठरविले आहे. पाडण्यात आलेले मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावे, ज्यांची बांधकामे पाडण्यात आली आहेत त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. तसेच, ही कारवाई करण्यास जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही समितीने केली आहे. ३०० वर्षांपूर्वीच्या या मंदिराच्या जागी एखादे प्रार्थनास्थळ असते आणि ते पाडण्याचे ठरविले असते, तर त्यावरून किती आकाशपाताळ एक केले गेले असते! पण हिंदू समाजास विचारतो कोण, असेच या घटनेवरून दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@