कल्याण : औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने वालधुनी नदीचा प्रवाह कमालीचा प्रदूषित झाला आहे. तर दुसरीकडे नदीपात्रात भराव टाकून होणार्या अतिक्रमणांमुळे वालधुनी नदी अरूंद होत चालली आहे. परिणामी, पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन स्थानिकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
वालधुनी नदीच्या उगमस्थानी असलेल्या काकोळे गावाची हद्द संपल्यानंतर पुढे ‘एमआयडीसी’ विभाग सुरू होतो. तिथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याने नदी पात्र अरूंद झाले आहे. अंबरनाथ, उल्हासनगर येथून कल्याणपर्यंत नदी प्रत्येक ठिकाणी आक्रसली आहे.अंबरनाथ नगरपालिकेने नदीसाठी कोणताही ‘फ्लड झोन’ जाहीर केलेला नाही. उल्हासनगर पालिकेने नऊ मीटरचा ‘फ्लड झोन’ घोषित केला असून तोदेखील कागदावरच आहे. इकडे कल्याण-डोंबिवली मनपाने वालधुनी नदीला आधीच नाला घोषित केल्याने त्याला ‘फ्लड झोन’ घोषित करण्याचा विषयच उरत नाही. दरम्यान, पुरस्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण अनधिकृत बांधकामे असून त्यामुळे पुरस्थिती निर्माण होते. ‘रिजन्सी प्लाझा’ या व्यापारी संकुलाने नदी पात्रात भिंत उभी केल्याने पुराचे पाणी नदीकिनारी असलेल्या झोपडपट्टीत शिरते. पालेगाव, रिलायन्सी रेसिडन्सी, वडोलगाव, उल्हास स्टेशन परिसर, हिराघाट या भागांनाही पुराचा फटका बसतो. उल्हास नदीला पूर आल्यास स्थानिकांना ‘अलर्ट’ दिला जातो. मात्र, वालधुनीला पूर आल्यास ‘अलर्ट’ करण्याची यंत्रणाच अस्तित्वात नाही. त्यामुळे रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागते.
काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक जलस्त्रोत बंद
वालधुनी नदी पात्रात काहींनी काँक्रिटीकरण केल्याने नैसर्गिक जलस्त्रोत बंद झाले आहेत. बारमाही वाहणारी वालधुनी आता फक्त पावसाळ्यातच प्रवाहित होते. अतिवृष्टीमुळे शेतीसह नदीकाठच्या घरांना मोठा फटका बसतो. नुकसान झाल्यानंतर कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. अशा शब्दांत काकोळे गावचे उपसरपंच नरेश गायकर यांनी व्यथा मांडल्या.
‘सीआरझेड’ नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकामे
कडोंमपाने वालधुनीला नाला म्हणून घोषित केले आहे. नकाशावर मात्र ती नदी आहे. सर्व अनधिकृत बांधकामे ‘सीआरझेड’ नियमांचे उल्लंघन करूनच झालेली आहेत. निधी कॉम्प्लेक्स, साई निर्वाणा ही बांधकामेही पूर नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून झाली आहेत. ही नदी उगमस्थानापासून पुढे सरकताना तिचे पात्र अरूंद होत जाते. परिणामी, पावसाळ्यात नदीकाठच्या घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानदेखील होते असे आरोप वालधुनी नदी स्वछता समितीच्या अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांनी केले आहेत.