
फडणवीस यांचे केद्रीय गृहसचिवांना पत्र
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून मुलभूत अधिकारांचे दररोज हनन होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलिस हे महाविकास आघाडी सरकारच्या नोकरांप्रमाणे काम करीत आहेत, असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि राज्यातील ढासळत्या कायदा – सुव्यवस्थेच्या स्थितीविषयी फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना पत्र लिहीले आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. देशातील सर्वोत्तम पोलिस दलांपैकी एक असलेले मुंबई पोलिस सध्या महाविकास आघाडी सरकारचे नोकर असल्याप्रमाणे काम करीत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मुलभूत अधिकारांचे हनन होत असून त्याविरोधात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गेले असता त्यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये सोमय्या जखमी झाले आहेत. मात्र, सोमय्या यांनी त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ला होऊ शकतो, याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.
सोमय्या यांनी घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार मिहिर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर आणि विनोद मिश्रा उपस्थित होते. यावेळी सोमय्या यांनी गृहसचिवांना दिलेल्या निवेदनामध्ये, हल्ल्याची केंद्र सरकारच्या एसआयटीद्वारे चौकशी, सीआयएसएफला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, सोमय्या यांनी पुरविण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेणे आणि खार पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचीही भेट घेऊन राज्यातील स्थितीविषयी त्यांना माहिती दिली.