मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री मातोश्री बाहेर हल्ला करण्यात आला. शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. तर "मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे," अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
तसेच "मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही," अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर "आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार?मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच.या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे," अशी मागणी सुद्धा फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
"सत्ता गमावण्याच्या भीतीने गारठलेली शिवसेना आता भ्याड हल्ल्यावर उतरलेली आहे. मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला हा त्याच भीरु मानसिकतेचे लक्षण आहे. असे हल्ले भाजपाला रोखू शकतील या भ्रमातून उद्धव ठाकरे यांनी लवकरच बाहेर यावे," असा टोला अतुल भातखळकर यांनी सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे.
"उत्तर भारतीय संघात एक विवाह सोहळा होता. तेथून मी निघून घरी परतत असताना कला नगर जंक्शनजवळ सिग्नलला माझी गाडी जेव्हा थांबली. त्यावेळी शंभर ते दोनशे शिवसैनिकांचा जमाव माझ्या गाडी जवळ आला. त्यांनी सरळ माझ्या गाडीवर हल्ला केला. मला काही कळण्याच्या आत तेथे पोलीस आले. मात्र शिवसैनिकांनी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, हँडल तोडलं, गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नसुद्धा केला. तसेच काही लोकांनी गाडीत घुसण्याचाही प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेत जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सिग्नल सुटला आणि माझ्या ड्रायव्हरने तेथून गाडी बाहेर काढली. मुंबईत अशा प्रकारची घटना रस्त्यावर होत असेल, तर मला वाटतं मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा मी निषेध करतो," अशी पहिली प्रतिक्रिया कंबोज यांनी दिली.