कागदावरील ज्येष्ठता आणि रंगोपासनेतील ज्येष्ठता यात जमिनास्मानाचा फरक आहे. सतत आणि सातत्याने रंग-आकार आणि कल्पना यांच्या संयुक्ततेतून जे सृजन निर्माण होते, ते अमर ठरते. नाशिक येथील ‘कला निकेतन’ संचालित चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल अभंगे यांच्या कलाप्रवासाची माहिती देणारा हा लेख...
चित्रकार अनिल अभंगे हे अनुभवी चित्रकार. जलरंग, तैलरंग, पेन्सिल स्केचिंगसारख्या माध्यमांमध्ये त्यांचा वावर हा थक्क करणारा आहे. वास्तववादी रंगलेपन शैलीत कलाकाम करणारे, कलाक्षेत्रात अनेकजणं आहेत. प्रत्येक कलाकाराची चित्रशैली वास्तववादी शैलीतदेखील वैविध्य घेऊन आलेली असते. चित्रकार प्रा. अनिल अभंगे यांच्या वास्तवादी चित्रशैलीत रंगलेपन आणि चित्रविषय हे त्यांच्या स्वानुभव आणि परिसरातील वातावरण यावर खूपदा निश्चित केलेले असतात, असे ध्यानात येते. अमर्यादित रंगांचे फटकारे, रंगलेपनातील नैसर्गिक शिस्त आणि आकारांमधील यथार्थ दर्शनाचा आभास, यामुळे चित्रकार अनिल अभंगे यांच्या कलाकृती स्मरणात राहणार्या ठरतात.
‘चांभार’, ‘पेंटर’ अशा सामाजिक विशेषत: मानवी आस्थेच्या व्यवसायांना त्यांनी रंग-विषयांत बद्ध केलेले आहे. जलरंग, तैलरंग, अॅक्रॅलिक अशा विविध रंग माध्यमांमध्ये त्यांच्या कलाकृती सजलेल्या आहेत. चामडी कमावण्याच्या व्यवसायातील अनेक टप्प्यांना, स्तरांना त्यांनी त्यांचा चित्रविषय ठरवून ‘चांभार’ या विषयावरील शृंखला साकारली. ‘पेंटर’ या मथळ्याने, त्यांनी या व्यवसायातील प्रत्येक टप्प्यांचे निरीक्षण, चित्रविषय बनविले. त्यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकालगतच्या खाडी किनारी असलेल्या कुरमुरे बनवण्याच्या भट्ट्यादेखील आपल्या कलाकृतींद्वारे रंगविलेल्या आहेत.
तांदळाच्या राशी, तांदूळ सडविण्याचे यंत्र, बारदानाच्या-गोठ्यासारख्या दिसणार्या झोपड्या, ज्यात भट्ट्या, अंगाराने फुललेल्या लाल रंगालाही अभंगेंच्या कलाकृतीत जागा लाभलेली आहे. त्यांनी ‘तमासगीर’ या मथळ्याखालीही एक चित्रशृंखला साकारलेली होती. त्या कलाकृतींमध्ये लोककलाकारांचं पडद्यामागचं आयुष्य, पडद्यामागचं जीवन कसं असतं, यावर अधिक प्रखरतेने आणि कडवटपणे कटूसत्य चित्रबद्ध केलेले आहे. तमाशातील नृत्यांगना, सोंगाड्या, मावशी, सरदार, ढोलकीवाला, साथीदार अशा विविध पात्रांनी अभंगेंच्या कुंचल्यांतून आकार घेतलेला आहे. अगदी बारकाव्यांसह या शृंखलेतील प्रत्येक कलाकृती म्हणजे त्या-त्या विषयांतील चित्रात्मक चरित्रच म्हणावी लागतील.
एकूणच प्रा. अनिल अभंगे यांच्या अनेक प्रदर्शनांमध्ये त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांसह त्या त्या विषयांना आकार आणि रंगबद्ध केलेले आहे. चित्रविषय कितीही कठीण असू द्या, कलाकृती ही लक्षवेधकच ठरणार, हे जणू अभंगेंच्या कलाकृतींचे वैशिष्ट्य ठरावे! त्यांचं व्यक्तिचित्रण म्हणजे ‘एक्स्प्रेसिव्ह पोर्ट्रेट्स’ असंच असतं. वेगळं तर करायचं, परंतु ते वेगळं वाटू नये, असा त्यांचा कलासृजनाचा वसा आहे.

सांगली जवळच्या मिरजेच्या काही अंतरावर मालगावच्या मातीत बालपण गेलेले प्रा. अनिल अभंगे यांचे कलाशिक्षण हे मुंबईच्या तत्कालीन ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’ येथे पदविका प्राप्त करून पूर्ण झाले. येथूनच त्यांनी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कलाप्रवासाची नौका वल्हवायला सुरुवात केली. राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनाच्या स्तरावर त्यांना एकूण चार पारितोषिके प्राप्त झाली आहेत. चित्रकलेची 25 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही त्यांना लाभलेली आहे. अनेक प्रदर्शने शृंखला, अनेक पुरस्कार, अनेक सन्मानप्राप्त असणार्या या कलावंतांचा कलाध्यापनाचा कालावधीही स्वत:च्या समाधानासाठी सुरळीत सुरू आहे. नोकरी म्हटलं की, इर्षा आलीच. मग ज्येष्ठ-कनिष्ठ वगैरे वाद उभे राहतात. त्यातूनच प्रा. अभंगे हे ठामपणे कलाकार्य करत आहेत. कलाध्यापन करत आहेत. कलाकार हा वयाने श्रेष्ठ असण्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वाने विशेषत: कलासाधनेने श्रेष्ठ असावयास हवा. अशा कलावंतांना, कथित संस्था वा सोसायटी यांच्या ज्येष्ठतेपेक्षा कलोपासनेची ज्येष्ठता फार आनंद देते. अशा या प्रामाणिक आणि सहृदयी प्रा. अनिल अभंगे यांना त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी भरपूर सदिच्छा...!
-प्रा. डॉ. गजानन शेपाळ