
१ मे पासून बेरी सांभाळणार पदभार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : निती आयोगाचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी पाच वर्षे सांभाळल्यानंतर राजीव कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता १ मे पासून अर्थतज्ज्ञ सुमन के. बेरी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
निति आयोगाच्या उपाध्यक्षपदी २०१८ साली राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजीव कुमार यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट केली आहे. आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजीव कुमार यांच्या राजीनाम्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यांच्याजागी आता सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत सुमन बेरी ?
सुमन बेरी हे नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे (एनसीएइआर) माजी महासंचालक आहेत, हे पद त्यांनी २००१ ते २०११ या काळामध्ये भूषवले होते. त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले असून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तांत्रिक सल्लागार समिती आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचेही सदस्य होते. एनसीएइआरपूर्वी बेरी हे वॉशिग्टन डिसी येथे जागतिक बँकेत कार्यरत होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील मॅग्डालेन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीपूर्व शिक्षण घेतले असून प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेयर्समधून सार्वजनिक घडामोडींमध्ये पदव्युत्तर (एमपीए) पदवी घेतली आहे.