अमोल मिटकरींविरोधात गुन्हा दाखल होणार?

राष्ट्रीय महिला आयोगाला भिवंडीच्या महिलेचे पत्र

    23-Apr-2022
Total Views |

Amol Mitkari
 
 
 
मुंबई : "राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे दि. २० एप्रिल रोजी झालेल्या सभेत कन्यादान या हिंदू धर्मातील पवित्र विधी संदर्भात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी फक्त एका महिलेचाच नव्हे तर या धार्मिक विधी अंतर्गत लग्न झालेल्या राज्यातील अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान केला आहे.", असे म्हणत भिवंडीच्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्याच बरोबर या महिलेकडून आयपीसीच्या कलम ३५४ आणि कलम ५०९ अंतर्गत मिटकरींविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
 
 
 
नीता भोईर यांनी पत्रात म्हटले की, "अमोल मिटकरींनी त्यांच्या भाषणात 'मम भार्या समर्पयामी' असा उल्लेख केला. हे वाक्य कन्यादानाच्या धार्मिक विधीमध्ये उपस्थित पंडितांकडून म्हटलं जातं, असंही ते म्हणाले. मात्र हे वाक्य कन्यादानाच्या विधित कुठेही नाही. अमोल मिटकरी हे एक आमदार आहेत. त्यांनी केलेल्या या विधानातून फक्त एका महिलेचाच नव्हे तर या धार्मिक विधी अंतर्गत लग्न झालेल्या अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान करण्यात आला आहे. यावेळी मंचावर उपस्थित जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेकजण मिटकरींच्या विधानावर हसत होते. त्यामुळे मिटकरींची या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर तातडीनं करवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे अशी विधानं करण्यापूर्वी त्यांच्याकडून खबरदारी घेतली जाईल."