मुंबई: “मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधार्यांच्या भ्रष्टाचाराची ’पोलखोल’ आम्ही रोज करतो आहे. ज्यांची ‘पोलखोल’ होते आहे ते अस्वस्थ असल्यानेच असे हल्ले सुरू आहेत. विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी ‘पोलखोल’ होणारच आहे. येणार्या २४ तासांत ‘पोलखोल’ रथावर हल्ला करणार्यांना पकडले गेले नाही तर निर्माण होणार्या संघर्षमय परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असेल,” असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी दिला.
ते पुढे म्हणाले की, “घाबरलेली शिवसेना जाणूनबुजून भाजपच्या पोलखोल अभियानात बाधा आणत आहे. ‘पोलखोल’ अभियानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठले आहे. म्हणूनच असे भ्याड हल्ले केले जात आहेत. हिंमत असेल, तर विरोधकांनी आमनेसामने येऊन दाखवावे. एका स्थानिक आमदाराच्या मुलाने ‘पोलखोल’ रथाची तोडफोड केल्याचा आमचा आरोप आहे. ते ठळकपणे ‘सीसीटीव्ही’मध्ये रेकॉर्ड झाले आहे. रात्री १ वाजल्यानंतर हे कृत्य झालेले आहे. तसेच या हल्ल्यात सहभागी असणार्या एका संशयित आरोपीने धडधडीत एका वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली आहे. तरीही पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही,” असा आरोप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला. या भ्याड हल्ल्यामागील खरा चेहरा समोर आणण्याची मागणीही आ. लोढा यांनी यावेळी केली.
प्रत्युत्तर देण्यास सज्ज :आ. अतुल भातखळकर
मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पोलखोल’ अभियानावर काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. भाजपने सभेसाठी उभारलेले स्टेज काही शिवसैनिकांनी तोडले. मात्र, संविधानिक मार्गाने विरोध करणे आमचा अधिकार आहे, तो अधिकार आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जर तुम्ही आम्हाला छेडले, तर आम्हीसुद्धा तुम्हाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत. आम्ही कुणाला छेडणार नाही. पण, जर आमच्या कुणी वाटेला गेले, तर त्याला आम्ही सोडणारही नाही,” असा सज्जड दम आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला गुरुवारी दिला. मालाड पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलखोल अभियानाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी गणेश खणकर यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
लोक शिवसेनेला सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत : प्रकाश मेहता
“मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हजारो कोटींचा कर गोळा केला जातो. पण, त्या तुलनेत काहीही सुविधा दिल्या जात नाहीत. कोरोनाकाळात लोक मरत असताना शिवसेनेचे नेते हजारो कोटींच्या मालमत्ता गोळा करत होते. २४ वर्षांमध्ये मुंबईत रस्त्यांवर २१ हजार कोटींचा खर्च झाला नव्हे तर ते पैसे खड्ड्यात गेले. त्यामुळे लोक मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळले असून ते आता सत्ताधार्यांना सिंहासनावरून खाली घेतल्याशिवाय राहणार नाहीत,” अशी टीका राज्याचे माजी गृहनिर्माणमंत्री व भाजपचे नेते प्रकाश मेहता यांनी गुरुवारी केली. मालाड पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पोलखोल’ अभियानाच्या सभेत ते बोलत होते.