मशिदींवरील बेकायदा भोंग्यांना होणारा विरोध हा मुद्दा सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, नुकतीच ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी याबद्दलची केलेली टिप्पणी लक्षात घेता समजते की, हा मुद्दा धार्मिकतेचा नसून सामाजिकच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हीच बाब प्रकर्षाने अधोरेखित केली. देशात याबद्दल भिन्न मते असली तरीही परदेशातील नागरिकांनी प्रार्थनास्थळावरील भोंगे हा विषय फक्त सामाजिक मुद्दाच ठेवला. विशेषतः मुस्लीम राष्ट्रांनीही नियमांचे पालन करण्यातच राष्ट्रहित मानले.
सौदी अरबचे उदाहरण ताजे आहे. तिथले शेख मोहम्मद बिन सालेह अल उथैमीन आणि सालेह बिन फवझान अल फवाझान यांनी एक फतवा काढत मशिदींवरील भोंग्यांची नियमावली जाहीर केली. होय, इस्लामिक देशानेच मशिदींवरील भोंग्यांवर बंदी आणली, ही बाब तंतोतंत खरी आहे. तिथल्या नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा कांगावा न करता या नियमांचे पालन केले. या देशाचे इस्लामिक व्यवहारमंत्री डॉ. अब्दुल्लातीफ अल शेख यांचे दि. २३ मे, २०२१ रोजीचे ‘ट्विट’ आहे की, ‘मशिदींवरील भोंग्यांचा वापर हा केवळ प्रार्थनेला बोलाविण्यासाठी आणि नमाजासाठी करावा. तसेच, या भोंग्यांचा आवाज हा एकतृतीयांश परीघापर्यंत ऐकू जाईल इतकाच असावा.
अन्य कुठल्याही कारणांसाठी मशिदींवरील भोंगे वापरू नयेत. तसेच,या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ विशेष म्हणजे, यात भोंग्यांवरून बांग देण्याची मुभा आहे ती फक्त मशिदीच्या आवारातच. मशिदीबाहेर कुठल्याही प्रकारे भोंगे किंवा ‘अॅमप्लिफायर’ लावण्यास पूर्णपणे मज्जावच. या नियमांचे उल्लंघन करणारा कारवाईस पात्र आहे. तसेच, भोंग्यांद्वारे धर्मग्रंथ मोठमोठ्याने वाचला जात असेल आणि तिथल्या उपस्थितांव्यतिरिक्त कुणीही लक्ष देऊन ऐकत नसेल किंवा विचार करत नसेल, तर तो त्या विशिष्ट धर्मग्रंथाचा अवमान ठरेल, असेही हे परिपत्रक सांगते.
साधारणतः वर्षभरापूर्वीची ही बातमी आहे. आज ज्या प्रकारे भारतात प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्याबद्दल नियमावलीवर बोट ठेवून कारवाईची मागणी ठरावीक पक्षांकडून केली जाऊ लागली त्यानंतर अचानक इतका आकांडतांडव करण्यात आला. याउलट सौदी अरबमध्ये याबद्दलचा नियम लागू होऊन वर्ष उलटू आले तरीही तिथल्या कुठल्याही धर्माच्या नागरिकांनी याबद्दल विरोध केलेलाच नाही.
भोंग्यांचा शोेधच मुळात २०व्या शतकाच्या सुरुवातीस लागला. मशिदींवरील भोंगे बसवण्याची सुरुवात ही मुळात 1936च्या दरम्यान सुरू झाली होती. सर्वात आधी सिंगापूरच्या सुल्ताना मशिदीवर भोंगे बसवण्यात आले होते. यावेळी हा निष्कर्ष काढण्यात आला की, यामुळे ‘बांग’ ही एक मैलापर्यंत जाऊ शकत होती. त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा प्रमुख हेतू होता. यानंतर हा पायंडा पडत गेला. कालांतराने याबद्दल अनेक अडचणी निर्माण होत गेल्या. यात प्रामुख्याने अशा भागात एकापेक्षा जास्त मशिदी आहेत, तिथे आवाजाची सरमिसळ सुरू झाली आणि गोंगाट वाढत गेला. कालांतराने तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली, तसे भोंगेही अद्ययावत मिळू लागले. काही भोंग्यांचा आवाज पाच मैल दूरही जातो, अशी नोंद आहे. पहाटेच्या वेळी शांतता असताना हा आवाज अधिक दूरवर जातो. सौदीसह नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, युके, ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि बेल्जियम शहरांत प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर आजही मर्यादा आहे. इंडोनेशियातही प्रचंड मोठ्या वादानंतर भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आलेली आहे. असेच उदाहरण नायजेरियातही आहे.
२०१६ मध्ये तिथल्या प्रशासनाने ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी ७० चर्च आणि २० मशिदींवरील ध्वनिप्रक्षेपक हटवण्यात आले होते. त्यासोबत दहा हॉटेल्स आणि पब्सही ध्वनिप्रदूषणामुळे बंद करण्यात आले होते. बर्याच देशात हा मुद्दा धार्मिक वादातही परावर्तित झाला. त्यातही चर्चमध्ये होणार्या घंटांबद्दलचा मुद्दाही वादात आला होता. परंतु, कुठल्याही देशातील नागरिकांनी कायदा आणि नियमावली धुडकावली नाही. त्यांचे तंतोतंत पालन आजही केले जाते. विशेषतः बर्याच देशांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा हा ध्वनिप्रदूषण आणि त्याचा होणारा त्रास याच चौकटीत बसवून दाखवला. आपल्या देशातही भोंग्यांबद्दलचा न्यायालयाने दिलेल्या निवाड्याप्रमाणेच पालन होणे गरजेचे आहे.