मुंबई : रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात हिंसाचार आणि दंगली झाल्याच्या बातम्या समोर येत असून दिल्लीमधील जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात ८ पोलिसांसह ९ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ आरोपींना अटक केली असून अशा दंगली रोखण्यासाठी माजी आयपीएस आणि पुद्दुचेरीच्या माजी एलजी किरण बेदी काही सूचना केल्या आहेत. दंगली रोखण्यासाठी किरण बेदी यांनी पुढील ७ उपाय सुचवले आहेत.
१ - कोणत्याही अरुंद आणि संवेदनशील भागात मिरवणूक काढण्यापूर्वी किंवा मिरवणुकीस परवानगी देण्यापूर्वी काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करायला हवे. जेणेकरुन तेथील लोकांनाही सुरक्षितता आणि शांतता राखण्यासाठी जबाबदार धरता येईल.
२ - मिरवणुकीमध्ये बाजार असोसिएशन किंवा परिसरातील महिला समित्यांसह ज्येष्ठ व्यक्तींना पालक म्हणून काम करण्यास प्रवृत्त करावे. कारण शांतता सुनिश्चित करण्यात महिलाही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
३ - या भागात राहणार्या लोकांवर भूतकाळात गुन्हे दाखल असल्यास त्यांच्यावर नजर ठेवावी व त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावं.
४ - घराच्या किंवा इमारतीच्या छतावर ज्वलनशील पदार्थ किंवा विटा, दगड आहेत की नाही याची खातरजमा करून घ्यावी.
५ - या भागात कोणत्याही व्यक्तीकडे परवानाधारक शस्त्रं असल्यास ती जमा करून घ्यावीत.
६ - कोणतीही घटना घडल्यास पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी. शिवाय, शांतता समितीत महिलांचाही समावेश करून घ्यावा. तसेच पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी स्थानिक लोकांची बैठक घ्यावी.
७ - या भागात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. त्याचबरोबर रेकॉर्ड ठेवण्यासाठी संबंधितांना लेखी कायदेशीर सूचना देण्यात यावी. जेणेकरुन गुप्तचर माहितीच्या आधारे त्याचा वापर करता येईल.