विनोदातला उगवता ‘सूर्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2022   
Total Views |
 
 
vinod
 
 
‘ड्रीम गर्ल’, ‘झोंबिवली’, ‘मोतीचूर चकनाचूर’ यांसारख्या चित्रपटांत, ७०हून अधिक जाहिरातींमध्ये, अनेक ‘शॉर्ट फिल्म्स, ‘वेबसीरिज’, मालिकांमध्ये झळकलेल्या तरी झोपडपट्टीत राहणार्‍या, घरची बिकट परिस्थिती असताना अभिनय क्षेत्रात आणखीन काम करण्याचे ध्येय ठेवणार्‍या आणि अशा अनेक अडचणींवर मात करणार्‍या विनोद सूर्या या सच्च्या कलाकाराच्या कर्तृत्वाची ही कहाणी...
 
कलाक्षेत्रात असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयकौशल्यातून विनोदाचा दर्जा पिढ्यान्पिढ्या उंचावला आहे. जॉनी वॉकरपासून ते जॉनी लिवरपर्यंत विनोदी भूमिकांचे अनेक असे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर आहेत. कोणी तरी खरंच म्हटलं आहे की, ’कोणाला तरी रडवणं सोप्पं असतं, पण हसवणं खूप कठीण!’ अगदी मोजक्याच जणांकडे हे कौशल्य असतं. आपल्या अभिनयातून रसिकप्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविणारा अभिनेता म्हणजे विनोद सूर्या. ‘आयपीएल’, ‘बिंगो’ अशा प्रसिद्ध टीव्ही जाहिरातींमध्ये तुम्ही हा चेहरा नक्कीच पाहिला असेल. कारण, सध्या ’टीव्ही जाहिराती’ हा जणू आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटकच. पण, पडद्यावर अवघ्या काही सेकंदांसाठी हसवणार्‍या या चेहर्‍यामागे एक खूप मोठा दडला संघर्ष आहे. पण, अपघाताने अभिनय क्षेत्राकडे वळलेल्या विनोद सूर्या यांचा चेहरा आज अनेक घरांमध्ये पोहोचला आहे. तेव्हा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने विनोद सूर्या यांच्या कर्र्तृत्वाची ही प्रेरणादायी गोष्ट....
 
विनोद सूर्या यांचा जन्म दि. १ नोव्हेंबर, १९८७ रोजी मुंबईतील अंधेरी येथे झाला. त्यावेळी त्यांची घरची स्थिती तशी हलाखीचीच होती. कारण, त्यांचे वडील लक्ष्मण तुकाराम सूर्यवंशी आणि आई कलावती सूर्यवंशी हे दोघेही रोजंदारीवर काम करत होते. मुळचे कर्नाटकचे असलेले सूर्यवंशी कुटुंब हे कामानिमित्ताने मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रेती, सिमेंट वाहून नेण्याचे कामही केले. मात्र, रोजंदारीच्या कामामध्ये कधीकधी कामही मिळत नसे किंवा केलेल्या कामाचा पुरेसा मोबदलाही मिळत नसे. असे असले तरी त्यांनी मुलाचा दाखला मराठी माध्यम शाळेत करून दिला.
सूर्या यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य हे झोपडपट्टी परिसरात गेले. एकीकडे रोज परिस्थितीशी दोन हात करताना, दुसरीकडे विनोददेखील मिळेल ती कामं करून कुटुंबाला हातभार लावत असे. त्यामुळे विनोदच्या शिक्षणाची गाडी दहावीपुढे सरकली नाही. नोकरीच्या शोधत असताना विनोद यांना एका सुरक्षारक्षकाची नोकरी २०११ साली मिळाली. त्या ठिकाणी विनोद यांनी तब्बल पाच वर्षं सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केली.
 
एकेदिवशी त्यांना मित्राचा फोन आला. ’‘एका शुटिंगसाठी १०-१२ लोकांची गरज आहे, आपल्याला त्यासाठी जायचं आहे. एकाच दिवसाचं काम आहे. त्याचे आपल्याला काही पैसेही मिळतील” असे त्या मित्राने सांगितले. त्यावेळी विनोद रात्रपाळी करत असल्याने दिवसा काहीतरी काम करायचे आणि पैसे कमवायचे म्हणून ते त्या शुटिंगसाठी गेले. तिथे सेटवर गेल्यानंतर तिकडचे एकूणच चित्र पाहून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. मग, एखाद्या ‘ऑडिशन’ला जा, या संबंधित क्षेत्रातील लोकांना भेटून, काही काम मिळत का? यासाठी ते प्रयत्न करू लागले. या क्षेत्रातील ज्ञान नसल्यामुळे वेगवेगळ्या शुटिंगला जाऊन, अनेक गोष्टी पाहून, अनुभव घेत यासंबंधित ज्ञान प्राप्त केले.
 
विनोद यांनी अभिनय क्षेत्रात काम करणार असे घरी सांगितल्यानंतर त्यांना कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना करावा लागला. साहजिकच ’या क्षेत्राची काही शाश्वती नाही, त्यात तुला रंगरूप नाही, तुला कामं तरी मिळतील का?’ अशा अनेक प्रश्नांची त्यांच्या आई-वडिलांनी सरबत्ती केली. असे असतानाही त्यांनी इतर कामे सांभाळून अभिनय क्षेत्रात काम करण्याचा मात्र पक्का निर्धार केला होता. त्यानंतर त्यांनी एक वर्ष ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणूनदेखील काम केले. जेणेकरून काही पैसेही कमावता येतील आणि घरही चालेल. इथेच त्यांनी अभिनय क्षेत्रातील मूलभूत ज्ञान प्राप्त केले. हळूहळू मग त्यांनी अनेक ठिकाणी ‘ऑडिशन’ देण्यास सुरुवात केली. अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी इरफान खानच्या अभिनयातून प्रेरणा घेत आपले प्रयत्न चालूच ठेवले.
 
हे प्रयत्न, ही धडपड चालू असतानाच, विनोद यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्यावर येऊन पडली. यादरम्यान त्यांना अनेक आर्थिक, मानसिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर काही काळाने विनोद यांच्या आईलाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांच्यासमोर अडचणींचा खूप मोठा डोंगर उभा राहिला होता. आईच्या आजारपणाचा खर्च कसा सांभाळणार? घर कसं चालवावं? यांसारखे अनेक विचार डोक्यात येऊन काही काळासाठी ते डगमगलेही. असे असतानाही त्यांनी अभिनयाकडे आपली पाठ फिरवली नाही. सुदैवाने त्यांना जाहिरातींमध्ये छोटीमोठी कामे मिळूही लागली. चार महिन्यांच्या कठीण काळातही त्यांनी अभिनयाचा सराव सोडला नाही. अभिनय क्षेत्रात काम करण्याची जिद्द कायम ठेवली.
 
सर्वप्रथम २०१६ मध्ये ’वन टच’च्या एका जाहिरातीसाठी त्यांची निवड झाली. सुप्रसिद्ध अभिनेता बोमन इराणीसोबत त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. जाहिरात क्षेत्रात त्यांचे अनेकजणांशी संपर्क आले. पुढे त्यांना एका कामातून दुसरे, अशी जाहिरातींमध्ये कामे मिळत गेली. अनेकवेळा काही कामांमध्ये अंतरही पडत असे. अशावेळी अभिनयामध्ये सातत्य राहावे म्हणून त्यांचा सराव हा सुरूच राहायचा. मग, मित्रांसोबत काही छोटे विनोदी, प्रासंगिक व्हिडिओ तयार करणे, तर एखादा ‘पॅच’ घेऊन स्वतःमधील अभिनयाचा अभ्यास करणे त्यांनी सुरूच ठेवले. यादरम्यान अनेक नकारदेखील त्यांनी पचवले. यावेळी ’आज अपयश आले, उद्या यश मिळेल,’ अशी भावना मनात ठेवून ते प्रयत्न करत राहिले. त्यांना पुढे कामातून काम मिळत गेले आणि अनेक चित्रपट, वेबसीरिज आणि मालिकांमध्येही त्यांनी साहाय्यक भूमिका साकारल्या.
 
आत्तापर्यंत विनोद सूर्या यांनी महेंद्रसिंग धोनी, रणवीर सिंग, जॉनी लिवर, अशा अनेक कलाकारांसोबत ७०हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे, तर अनुष्का शर्माच्या ’परी’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यामध्ये त्यांची अगदी छोटी भूमिका होती, तर दुसरीकडे ’सत्यमेव जयते’ या चित्रपटामध्येही एक छोटी भूमिका त्यांनी साकारली. यानंतर त्यांनी ’शोले गर्ल’ या वेब चित्रपटात एक छोटी साहाय्यक भूमिका साकारली. तसेच, मराठी मालिका ’लक्ष्य’ आणि ’असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ यामध्येही छोट्या भूमिका केल्या. पुढे त्यांनी ’कार्टेल’ या वेबसीरिजमध्ये तर ’ड्रीम गर्ल’, ’झोंबिवली’ या चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांचा हिंदी पदार्पण असलेल्या आगामी ’मुंबईकर’ या चित्रपटात विनोद सूर्या यांची एक महत्त्वपूर्ण साहाय्यक भूमिका असणार आहे. याशिवाय त्यांचे आणखी तीन-चार प्रोजेक्ट्स सुरू आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना मिळणार्‍या अनुभवातून शिकून ते या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या नवोदित कलाकारांचे मार्गदर्शनही करत असतात.
 
विशेष म्हणजे, त्यांची पत्नी कल्पना, त्यांची मुले गायत्री आणि नील यांनीदेखील या क्षेत्रात कामे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांचा अभिनय क्षेत्रात ’स्ट्रगल’ सुरूच असून, पुढे मोठ्या भूमिका साकारण्याचे त्यांचे ध्येय आहे आणि त्यांचे प्रयत्न हे चालूच राहणार आहेत. त्यांना भविष्यातील सर्व भूमिकांमध्ये यश मिळो आणि त्यांच्या कर्र्तृत्वाची गुढी अशीच उंच होत राहो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...
 
कोणत्याही क्षेत्रात काम करताना अनेक संकटे येतात. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, न डगमगता ध्येय गाठण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची तयारी ठेवावी, तर हा प्रवास करताना नम्रपणा, ध्येय गाठण्याचे जिद्द ठेवून, सजग राहून, संबंधित क्षेत्राचे मूलभूत ज्ञान घेऊन, समर्पित होऊन काम करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. - विनोद सूर्या 
 
@@AUTHORINFO_V1@@