मुंबई (प्रतिनिधी) - तामिळनाडूतील कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्यातून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या पालीचे शरीर मोठे असून या पालीचे नामकरण 'हेमिडॅक्टायलस हेगडेई' असे करण्यात आले आहे. ही पाल 'हेमिडॅक्टायलस' कुळातील ४९वी प्रजाती आहे.
नव्याने शोधण्यात आलेली ही पाल भारतीय 'हेमिडाक्टायलस' कुळातील 'प्रशादी' गटाची सदस्य आहे. या गटातील पाली इतर गटातील पालींपेक्षा रूपात्मक वर्णांच्या आधारे ओळखल्या जाऊ शकतात. या पालींचे शरीर लहान ते मोठ्या स्वरूपाचे असते. त्या जगभरातील अनेक प्रकारच्या परिसंस्थांमध्ये आढळतात. या पाली उष्णकटिबंधीय क्षेत्रात पसरलेल्या प्रजातींमधील सर्वात वैविध्यपूर्ण पालींपैकी एक आहेत. 'हेमिडाक्टायलस' कुळामधील या पालींच्या पाठीवर लहान गोलाकार खवल्यांसह मोठ्या शंकूच्या आकाराचे उंचवटे (ट्यूबरकल) असतात. हे उंचवटे एखाद्या पंक्तीमध्ये लावल्यासारखे दिसतात. तसेच या पालींच्या पायातील बोटांमध्ये जाळीदार पडदा असतो. ही बोटं पानांसारखी दिसतात, म्हणून या पालींना 'लीफ-टोड गेको' असेही म्हणतात. अशा 'हेमिडाक्टायलस' कुळातील पालीच्या नव्या प्रजातीचा शोध 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे सौनक पाल आणि 'द नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगलोर'चे झीशान मिर्झा या मुंबईतील दोन तरुण संशोधकांनी लावला आहे.
ही नवीन प्रजाती, 'हेमिडॅक्टायलस हेगडेई' या शास्त्रीय नावाने आणि 'हेगडेस रॉक गेको' या सर्वसामान्य नावाने ओळखली जाईल. ही पाल दक्षिण पश्चिम घाटातील जंगलांमध्ये प्रदेशनिष्ठ आहे. संशोधकांना ही प्रजाती तामिळनाडूच्या कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्य मधील कमी ते मध्य-उंचीच्या ओलसर-पानझडी जंगलात प्रथम सापडली होती. झऱ्यांच्या काठावर असलेल्या दगडांवर आणि खडकांवर ही पाल वास्तव्य करते. या प्रजातीला विठोबा हेगडेंचं नाव देण्यात आले. वन्यजीव आणि प्राणीशास्त्रीय संशोधन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. हेगडे हे तब्ब्ल ४० वर्षांपासून 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयात वरिष्ठ सहाय्यक आहेत. अलिकडेच पश्चिम घाटामधून 'हेमिडॅक्टायलस' कुळातील 'हे. वनम', 'हे. परागवली', 'हे. ताम्हणीएन्सिस' आणि 'हे. एसई' या शरीराने मोठ्या आकाराच्या नव्या पालीच्या प्रजातींचा शोध लागला आहे. “गेल्या काही वर्षांत या कुळातून पाचहून अधिक नवीन प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. आमचा शोध असे दर्शवितो की, त्यांचा आकार मोठा असूनही, या पालींचा फारसा अभ्यास केला जात नाही आणि त्यांच्या विविधतेला कमी लेखले जाते”, असे सौनक पाल म्हणाले.