श्री कालिपीठ संस्थान नैमिषारण्यतर्फे गीतरामायण आणि श्रीराम कथेचे आयोजन

    19-Apr-2022
Total Views |
 
 
ram
 
 
अयोध्या : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपा प्रसादाने श्री कालिपीठ संस्थान नैमिषारण्यतर्फे गीतरामायण आणि श्रीराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कालिपीठाधीश प. पू. गोपाळ शास्त्री, नैमिषारण्य यांच्या उपस्थितीत १ जुलै ते १० जुलै या कालावधीत अयोध्या काशी, नैमिषारण्य, प्रयागराजसह अयोध्या येथील जानकी महल येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून गौरवण्यात आलेले प्रतिभावंत कवी ग. दि.माडगूळकर (गदिमा) विरचित गीतरामायण संगीतबद्ध करून ते आपल्या अमृतवाणीने, भावपूर्ण स्वर्गीय स्वरात गीतगायन करून बाबूजींनी म्हणजेच सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या या महाकाव्याचे गीतगायन बाबूजींचे सुपुत्र सर्जनशील श्रीधर फडके सादर करणार आहेत. रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे निस्सीम कलावंत म्हणजेच स्वरश्री आणि सुरश्री बाबूजी! बाबूजी म्हणजे मराठी संगीत क्षेत्रातील सुवर्ण पान! त्यांची ओळख केवळ संगीतापुरतीच नाही, तर उत्तम व्यक्तिमत्त्व, उदात्त विचार, संस्कार आणि राष्ट्रप्रेम अशी असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे पाईक म्हणजे बाबूजी. विविध मानाचे पुरस्कार आणि मानसन्मान बाबूजींना मिळाले आहेत.
 
 
श्रीधर फडके यांच्या भावपूर्ण वाणीतून हा गीत रामायणाचा अमृतकलश पावन रामजन्मभूमीत, अयोध्या नगरीत पवित्र शरयू नदीच्या तटावर सादर होणार आहे. श्रीधर यांच्या आई लतिका फडके आणि पू. बाबूजी दोघेही दिग्गज गायक असल्याने लहानपासून घरातच त्यांच्यावर संगीताचे वातावरण आणि संगीताचे उत्तम संस्कार झाले आहेत. शिवाय, राष्ट्रीय कीर्तीचे कथा कीर्तनसम्राट हभप चारुदत्त गोविंद स्वामी आफळे बुवा, पुणे आपल्या पवित्र आणि ओघवत्या वाणीने श्री रामकथा सादर करणार आहेत. राष्ट्रीय कीर्तनाची महान परंपरा ४०० वर्षापासून आफळे कुटुंबात आहे.
 
 
राजपुत्र लव-कुश यांनी अयोध्येच्या पावन पुण्य भूमीत ज्याप्रकारे श्रीरामांपुढे रामायण गायले, तीच कथा आधुनिक लव-कुशाच्या रुपात श्रीधर फडके आणि ह भ प श्री चारुदत्त आफळेबुवा सादर करणार आहेत. अयोध्येच्या पावन भूमीत गीत रामायण सादर करण्याची पू. बाबूजी आणि गदिमांची अपूर्ण राहिलेली इच्छा, हे दोघे आधुनिक लव-कुश पूर्ण करणार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ’असा हा दुर्मिळ मणि कांचन योग सहपरिवार, सखे सोयर्‍यांसह सहभागी होऊन स्वर्गीय स्वरातील अजरामर महाकाव्याचा अमृतकलश प्राशन करून श्रीरामांच्या सांनिध्यात पावन व्हा’, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.