अहमदाबाद: श्रीराम नवमी हिंसाचारामागे परदेशांतून कट-कारस्थान रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुजरात पोलिसांच्या तपासातून ही खळबळजनक माहिती उघड झाली असून याबाबत काही महत्त्वाचे पुरावेदेखील सापडल्याचे समजते.
१० एप्रिल रोजी गुजरातमधील खंभात येथे श्रीराम नवमीच्या दिवशी हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील धार्मिक सौख्य बिघडवण्याच्या उद्देशानेच श्रीराम नवमीदरम्यान ठिकठिकाणी हिंसाचार घडविण्यात आले. याबाबतचे सर्व कट-कारस्थान परदेशांमध्ये रचले गेले. याबाबत काही महत्त्वाचे पुरावे गुजरात पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजित राजिया यांनी दिली.
हिंसाचार घडवण्यासाठी खंभात येथे बाहेरून माणसे बोलावण्यात आली होती. श्रीराम नवमीनिमित्त १० एप्रिल रोजी शोभायात्रा निघणार होती. मात्र, त्याआधीच हिंसाचार घडविण्याची तयारी करण्यात आली होती. यासाठी शनिवार ९ एप्रिल रोजी दगड आणि घातक शस्त्रसाठा हल्लेखोरांना पुरविण्यात आला. या हल्लेखोरांनी स्वतः तर हिंसा घडवलीच. परंतु, प्रत्यक्ष हिंसाचार सुरू झाल्यानंतर हल्लेखोरांनी दगडफेक आणि जाळपोळीसाठी इतरांनाही चिथावले होते, असेदेखील पोलीस तपासातून समोर आले आहे. तसेच यासाठी हल्लेखोरांना परदेशांतून मोठ्या प्रमाणात पैसाही पुरविण्यात आला, असेही पोलिसांच्या तपासांतून समोर आले आहे. मौलवी मुस्तकीम, त्याचे दोन साथीदार मतीन व मोहसीन तसेच रझाक अयूब, हुसैन हशमशा दिवाण हे या कटात सहभागी होते, असे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
श्रीराम नवमीनिमित्त आयोजित शोभायात्रा विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाजवळून जात असताना दगडफेक आणि जाळपोळ करत हिंसाचार घडवा, अशादेखील सूचना हल्लेखोरांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही कृती केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले, असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर श्रीराम नवमी हिंसाचाराच्या आरोपाखाली पकडले गेलात, तरी आम्ही तुमच्या पाठीशी राहू. तुम्हाला कायदेशीर मदत पुरवू, असेही हल्लेखोरांना सांगितले गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन आणि ‘डेटा’ तपासला असून, हा हल्ला पूर्वनियोजित होता, हे त्यातून स्पष्ट झाले आहे. हिंदू धर्मीयांना लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच श्रीराम नवमीनिमित्त आयोजित शोभायात्रांदरम्यान हिंसाचार घडविण्याचा कट रचला गेला होता, असेही तपासात आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी १४ जणांना अटक
हनुमान जयंती उत्सवादरम्यान काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान दिल्लीतील जहाँगीरपुरी येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. रविवारी याप्रकरणी पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रथयात्रा काढून हिंसाचाराचा तीव्र निषेध
जहाँगीरपुरीतील हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी दिल्लीतील विकासनगर परिसरात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत रथयात्रा काढली. या रथयात्रेत अनेक नागरिक तलवार काठ्या घेऊन सहभागी झाले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या यात्रेत सहभागी होत जहाँगीरपुरीतील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदवला.