मौन कोणाचे? कशाविषयी?

    17-Apr-2022
Total Views |

13
 
धर्मांध मुस्लीम हिंसेला तयार होता, त्याची तयारी त्याने आधीपासूनच करुन ठेवली होती, त्यासाठी आपापल्या घरांत मोठ्या प्रमाणावर दगड साठवून ठेवले होते. फक्त श्रीराम नवमीची शोभायात्रा समोर येण्याचा अवकाश होता अन् शोभायात्रा येताच आपल्या भावना दुखावतील व आपण दगडफेक करू, असे ठिकठिकाणच्या धर्मांध मुस्लिमांनी आधीच ठरवले होते.
 
देशातील सामाजिक हिंसेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्दही उच्चारलेला नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून हिंसेला कारणीभूत जमावाला अभय दिले जात असल्याचेच हे द्योतक आहे,” अशा शब्दांत काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह १३ विरोधी पक्षाध्यक्षांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून नुकतीच टीका करण्यात आली. त्याला पार्श्वभूमी आहे ती हनुमान जयंती, श्रीराम नवमीसह त्याआधीच्या देशभरातील दंगलसदृश्य घडामोडींची. नरेंद्र मोदींनी त्यावर दोन शब्द बोलावे, अशी विरोधी पक्षांची अपेक्षा. मोदींनी त्यावर बाळगलेल्या मौनानेच हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान असून देशातील दंगली वा हिंसाचारावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री व गृहखाते सक्षम आहे. तसेच भाजपशासित राज्यांतही दंगलखोरांवर कठोर कारवाई सुरुच आहे. पण, काँग्रेस व त्यासोबतच्या इतर पक्षाध्यक्षांनी तरी कुठे कधी दंगलखोरांवर, हिंसाचार पसरवणार्‍यांविरोधात तोंड उघडले आहे? त्यांच्या संयुक्त निवेदनाचा अर्थ सामाजिक हिंसा भडकावणारे हिंदू असून त्यामुळेच नरेंद्र मोदी त्यावर बोलत नाही, असा आहे. पण, प्रत्यक्षातली स्थिती नेमकी उलट आहे. ती देशभरातील ठिकठिकाणच्या उदाहरणाने समजावून घेता येईल. त्या सगळ्यांतली धर्मांध मुस्लिमांची हिंसाचाराची पद्धती एकच आहे.
देशातील वेगवेगळ्या ठिकाणी श्रीराम नवमीनिमित्त हिंदू धर्मीयांनी मोठ्या उत्साहाने शोभायात्रेचे आयोजन केले होते. तशा त्या शोभायात्रा गाव-शहरांतून आनंदाने जातही होत्या, पण जिथे जिथे हिंसाचार माजला त्या त्या शोभायात्रा एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यावर घरा-घरांतून दगडफेकीला सुरुवात झाल्याचे दिसले. त्यासंबंधीच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झालेल्या असून दगडफेक करणारे कोण, याची ओळखही पटलेली आहे. पण, त्या-त्या ठिकाणच्या घरांतून दगडफेक झालीच कशी? हा मुख्य प्रश्न आहे. म्हणजे, श्रीराम नवमीनिमित्त हिंदूंनी शोभायात्रेचे आयोजन केले, शोभायात्रा गाव-शहरातून जात होत्या, शोभायात्रा मुस्लिमांच्या घरे वा प्रार्थनास्थळांसमोर आल्या. त्यानंतर विरोधकांकडून असे म्हटले जाते की, हिंदूंनी लावलेली गाणी, दिलेल्या घोषणांमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या. तरीही प्रश्न उरतोच की, मुस्लिमांच्या घरात दगड आले कुठून? कारण, कोणाही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात दगड आणि तेही हजारोंच्या संख्येने कधीही नसतात. तसेच आता जवळपास प्रत्येक गाव-शहरात डांबरी वा सिमेंटचे रस्ते तयार झालेले आहेत वा मोकळी जागाही ‘पेव्हर ब्लॉक’ने भरलेली असते. त्यामुळे रस्त्यावरही दगड दिसतच नाहीत. अशा परिस्थितीत मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचा प्रकार झाला, तरी दोन्ही बाजूत फार-फार तर बाचाबाची होऊ शकते वा घरातील साहित्य म्हणजे भांडीकुंडी फेकून मारली जाऊ शकतात वा एखादी लाठी-काठी घेऊन वादावादी होऊ शकते. पण, तसे कुठेही झाले नाही. त्या त्या ठिकाणी थेट दगडफेकच केली गेली.
 
तसेच जर भावना दुखावणारे कृत्य हिंदूंनी केले असेल, तर मग मुस्लिमांनी त्याचे चित्रण करायला हवे होते, पोलिसांकडे सुरक्षा मागायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही. अर्थात, धर्मांध मुस्लीम हिंसेला तयार होता, त्याची तयारी त्याने आधीपासूनच करुन ठेवली होती, त्यासाठी आपापल्या घरांत मोठ्या प्रमाणावर दगड साठवून ठेवले होते. फक्त श्रीराम नवमी-हनुमान जयंतीची शोभायात्रा समोर येण्याचा अवकाश होता अन् शोभायात्रा येताच आपल्या भावना दुखावतील व आपण दगडफेक करू, असे ठिकठिकाणच्या धर्मांध मुस्लिमांनी आधीच ठरवले होते. तसे झालेही, धर्मांध मुस्लिमांच्या भावना दुखावल्या व त्यांनी हिंसाचाराला सुरुवात केली. अर्थात, हिंसाचार धर्मांध मुस्लिमांनीच केला, हिंदूंनी नव्हे. हिंदूंच्या गाण्यांनी वा घोषणांनी भावना दुखावल्या असत्या, तर मुस्लिमांनी धरणे धरले असते, पोलिसांत ‘एफआयआर’ नोंदवण्यासाठी मोर्चा नेला असता, दंगलखोरांच्या चित्रफिती पुरावा म्हणून दाखवल्या असत्या. पण, हिंदूंकडून तसे काही झालेच नाही किंवा होत नाही, म्हणूनच धर्मांध मुस्लिमांना कायद्याची मदत घ्यावीशी वाटले नाही, तर त्यांनी भारतीय कायद्याला नाकारून शरियाप्रमाणे दगडफेकच केली. असा प्रकार मध्य प्रदेशच्या खरगोनपासून झारखंड, उत्तराखंड, गुजरात वा इतरत्र सर्वत्र जो हिंसाचार झाला, त्या प्रत्येक ठिकाणी झाला. विरोधी पक्षाध्यक्ष यावर कधी बोलतील? त्यांनी का मौन बाळगले आहे, या प्रकाराविषयी? तर त्याचे उत्तर मुस्लिमांची एकगठ्ठा मतपेटी आपल्यालाच मिळावी, हे आहे. त्यामुळेच धर्मांध मुस्लिमांनी काहीही केले तरी हिंदूंवर आळ घेण्याचे आणि मुस्लिमांना नामानिराळे ठेवण्याचे उद्योग त्यांच्याकडून केले जात आहेत. पण, त्याचा त्यांना काहीही लाभ होणार नाही. कारण, आता सारे पुरावे समाजमाध्यमांतून तत्काळ पुढे येतात आणि कोण दंगलखोर, कोण हिंसाचारी, हेदेखील अवघ्या जगाला माहिती होते.
 
दरम्यान, खाद्यपदार्थ, पोषाख, धार्मिक श्रद्धा, उत्सव, भाषा आदी मुद्द्यांवरुन देशातील सत्ताधार्‍यांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही विरोधी पक्षाध्यक्षांनी आपल्या निवेदनात म्हटले. पण, श्रीराम नवमी-हनुमान जयंतीच्या हिंसाचारावरून हिंदूंच्या नावाने गळा काढणार्‍यांनी शोभायात्रा मुस्लीम भागातून का नेली, असा उलटा सवाल केला होता. म्हणजे, समाजात फूट कोण पाडत आहे, हेच यातून स्पष्ट होते. देशाची मुस्लीम भाग आणि हिंदू भाग अशी फाळणी करायची या सर्वांची योजना आहे. तथाकथित मुस्लीम भागातून हिंदूंनी जाऊ नये, हिंदूंनी आपले सण-उत्सव त्या भागात साजरे करू नये, शोभायात्रा त्या भागातून नेऊ नये, असा या सगळ्यातून अर्थ निघतो. १३ पक्षाध्यक्षांनी दिलेल्या निवेदनातील भाषेनुसार हाच एक सामाजिक तेढ वाढवण्याचा नियोजित कट आहे. इतकेच नव्हे, तर देशात छोटे-छोटे पाकिस्तान तयार होतील, असे हे षड्यंत्र आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजप मात्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’च्या मंत्राने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे, राष्ट्राच्या एकजुटीचे काम करत आहेत. त्यामुळे सोनिया गांधी असो वा शरद पवार वा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर आरोप करण्यापेक्षा आपण लावत असलेल्या आगी आणि त्याने जळत असलेली समाजाच्या एकसंधतेची वीण पाहावी. आपण कशाकशावर मौन बाळगले, त्याची उजळणी करावी, दुसर्‍या कोणाला सल्ले वा उपदेश देऊ नयेत.