
यवतमाळ : पहिले बाळंतपण माहेरी व्हावी अशी आईवडिलांची इच्छा असल्याने काही दिवसांपूर्वी हिंगोलीवरून मन्याळीला आली. आयुष्यातील सुखद क्षणाची वाट पाहत असताना रविवारी रात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाव दुर्गम भागात असल्याने फारशा सुविधा नव्हत्या. ऑटोरिक्षातून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. पण, खड्ड्यांमुळे त्रास वाढला. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच जीव गेला.
उमरखेड तालुक्यातील टोकावरच्या ढाणकी-बिटरगाव रस्त्यावर रविवारी रात्री ही घटना घडली. नताशा ढोके (वय ३०) रा. मन्याळी, असे खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या आईचे नाव आहे. नताशाचा विवाह हिंगोलीतील अविनाश ढोके झाला होता. प्रसूतीसाठी ती माहेरी मन्याळीला आली होती. हे गाव दुर्गम भागात वसलेले असल्याने फारशा सुविधा नाहीत. जवळपास रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने रात्री प्रसूतीकळा सुरू होताच कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला.
कुठेही संपर्क होत नसल्याने गावातील ऑटोमधून नताशाला घेऊन ढाणकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाले. बिटरगाव-ढाणकी रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे नताशाचा त्रास अधिक वाढला. ती जिवाच्या आकांताने विव्हळू लागली. रस्त्यावरील खड्डे चुकवित ऑटोरिक्षा चालविणे चालकाला कठीण जात होते. सारे प्रयत्न करूनही ढाणकी दोन किलोमीटरवर असताना ऑटोतच नताशाची प्रसूती झाली. पण, खराब रस्ता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण दोघेही दगावले.