कोलकत्ता: पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात रामनवमी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत. हावडा येथील रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे पश्चिम बंगाल पोलिसांचे कारस्थान असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
पश्चिम बंगालचे विरोधी पक्ष नेते आणि नंदीग्रामचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल पोलीस महासंचालकांचा उल्लेख करत ट्विटरवर या घटनेचा समाचार घेतला आहे. अधिकारी यांनी या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ शेअर केले असून, "हावडा जिल्ह्यातील शिवपूर भागात राम भक्तांनी मिरवणूक काढली आणि कॉन्स्टेबल आणि पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाठीमार केला. काही लोक गंभीर जखमी झाले." असे म्हटले आहे.
या राज्यात सनातन धर्माचे पालन करण्यास मनाई आहे का, असा सवालही त्यांनी केला. ट्विटर वर सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या हावडा येथे घडलेल्या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. पश्चिम बंगाल भाजपच्या प्रमुख सुकांता मजुमदार यांनी रामनवमी हल्ल्यांबाबत पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मत व्यक्त केलेआहे.
हावडा येथे रामनवमीच्या दिवशी शांततापूर्ण हिंदू मिरवणुकीवर झालेल्या गंभीर हल्ल्यांना टीएमसीचे गुंड जबाबदार असल्याचा दावा मजुमदार यांनी केला आहे. भाजप प्रमुख मजुमदार यांनी ट्विट केले की, “हावडा ते बांकुरा, रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामच्या मिरवणुकांवर 'टीएमसी'च्या गुंडांनी हल्ला केला. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जीवन सुरक्षित नाही."