ठाणे: मध्य रेल्वेवरील कळवा हे अत्यंत गर्दीच्या स्थानकांमधील एक आहे. तरीही इथल्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे रेल्वे प्रशासन लक्षच देत नसल्याने पारसिक प्रवासी संघ आणि मुंबई रेल प्रवासी संघ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एसी लोकलचे तिकीट कमी करावे, कळवा येथे फास्ट लोकल थांबा, कळवा होम प्लॅटफॉर्म, नवीन ५-६ ट्रक लोकल सेवांसाठी आरक्षित करणे, कळवा पूर्व येथे पार्किंगची सोया करणे या प्रवासी संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत.
मुंबई प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी या मागण्या मांडल्या आहेत. " एसी लोकलचे तिकीट दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून ते लवकरच मेट्रो तिकिटाच्या धर्तीवर कमी करावेत जेणेकरून प्रवासी त्यातून प्रवास करू शकतील. कळवा कारशेड येथे प्लॅटफॉर्म बांधवा जेणेकरून लोकांची चेंगराचेंगरी कमी होईल. कळव्यात नवीन रेल्वे स्थानक बंधूनसुद्धा त्यावर अजून सेवा सुरु केली नाही ती करण्यात यावी" अशी मागणी मधू कोटियन यांनी केली आहे. पारसिक प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई यांनीही याबद्दल " कळव्यातील प्रवाशांनी आतापर्यंत खूप अन्याय सहन केला आहे आता सहनशक्ती संपली आहे आता आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल" अशी प्रतिक्रिया दिली आहे.