ठाणे : शिवसेनेच्या एककल्ली कारभाराला सर्वसामान्य शिवसैनिक कंटाळले असुन सेनेत आऊटगोईंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात अनेक शाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने शिवसेनेला खिंडार पाडले असतानाच आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच शिवसेनेचा गेम केला असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यानी रविवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याने आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे.

ठाण्यातील चिरागनगर येथील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते देवेंद्र साळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. साळवी हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदार संघात शिवसेनेत कार्यरत होते. यापुर्वीही आ. सरनाईकांच्या आणखी एका पदाधिकान्याने राष्ट्रवादीची कास धरली. त्यामुळे, पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यावर आ. सरनाईक यांची पकड राहिली नसल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान , ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने आ. सरनाईक आधीच शिवसेनेत एकाकी पडले आहेत. अशातच आता अनेक निष्ठावंत शिवसैनिकही साथ सोडून मंत्री आव्हाडांच्या गोटात जाऊ लागल्याने आ. सरनाईकांचा पक्षातील दबदबा कमी झाल्याचे बोलले जात आहे.