कासवांच्या गतीने हस्तकलेचा विजय!

सुनील मोरेंचा ‘कौशल्य विकास’

    05-Mar-2022
Total Views | 125
 
artist
 
 
आपल्या संस्कृतीत पुराणकाळापासून नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष‘ म्हणतात. या झाडाची एकही वस्तू वाया जात नाही. करवंटी तर अत्यंत उपयोगी असते. अशा या करवंटीपासून काय काय बनविता येईल, या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कलाशिक्षक सुनील मोरे यांना काही अद्भुत विचारांनी ऊर्जा दिली.
  
कुठलीही कला ही कौशल्याशिवाय दृश्यस्वरुपात आणता येत नाही. कौशल्याचा विकास हा इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. निर्धारित परिणामांसह वेळ आणि ऊर्जा या दोन्हीच्या प्रमाणात कृती करण्याची क्षमता म्हणजे ‘कौशल्य.’ कौशल्य हे तीन घटकांद्वारे वाढविता येते. सवय, प्रयत्न आणि सराव!
 
कौशल्य असणारी व्यक्ती ही कुठेही जन्मलेली असो, ती श्रीमंत वा गरीब असो किंवा ती व्यक्ती अशी असते की, कुठल्याही प्रकारची साधने-साहित्य उपलब्ध झाले नाही, तरी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दृश्यस्वरुपात कौशल्य दिसू शकते. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात, प्रत्येक जण तणावाखाली वावरत असतो. तणावाला दूर सारायचे असेल, तर ‘कौशल्य विकास’ दृढ करावा, असे जाणकार सांगतात. अशाच एका ‘कौशल्य विकास’ करणार्‍या कलाध्यापकाच्या कलाप्रवासाचा मागोवा आपण आजच्या लेखात घेणार आहोत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे या गावच्या शाळेत, सुनील मोरे नावाचे कलाध्यापक आहेत. सुनील मोरे हे कलाध्यापनासह, हस्तकला प्रकारांत अधिक प्रभावीपणे कार्य करतात. ‘हस्तकला’ ही केवळ ‘कौशल्या’वर आधारित असते.
 
 
सुनील मोरे हे दहा-बारा वर्षांपूर्वी कोकणात पर्यटनाला गेले होते. कोकण म्हटलं की, प्रचंड उंच असलेली नारळी-पोफळीची झाडे आणि हापूस आंब्यांच्या बागा हे जणू समीकरणच! त्यांनी कोकणात बर्‍याच ठिकाणी बर्‍याच प्रकारच्या वस्तू व पदार्थ पाहिले. या वस्तू शंख-शिंपले, लाकूड आणि शहाळे असून, नारळाच्या करवंट्यांपासून बनविलेल्या वस्तू पाहून, पाहणाराही थक्क होतो.
सुनील मोरे म्हणतात, “काहीतरी वेगळं करावं आणि पर्यावरणाचे देणं द्यावं, या विचारातून पाहिले की, नारळाचा, त्यातील खोबर्‍याचा सगळीकडे वापर केला जातो. धार्मिकस्थळी, मंदिरात तर मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने नारळ अर्पण करतात. मात्र, त्याचा वापर झाल्यावर त्या नारळावरील कठीण कवच म्हणजे करवंटी टाकाऊ म्हणून फेकून दिली जाते. मग अशा अनेक नारळाच्या वापरानंतर त्याच्या करवंट्या शेवटी उकिरड्यावर, गटारांमध्ये पडलेल्या आढळतात. कधी गटारे त्यामुळे तुंबतात. कधी रोगजंतू त्यावर अंडी घालतात. प्रदूषण वाढते.” आपणास याबाबत काही करता येईल का, या चिकित्सक विचाराला त्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलाप्रतिभेतून हस्तकलेत रूपांतरित केले आणि टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून नवनिर्मितीचा हा अभिनव छंद जोपासला.
 
 
आपल्या संस्कृतीत पुराणकाळापासून नारळाच्या झाडाला ’कल्पवृक्ष‘ म्हणतात. या झाडाची एकही वस्तू वाया जात नाही. करवंटी तर अत्यंत उपयोगी असते. अशा या करवंटीपासून काय काय बनविता येईल, या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कलाशिक्षक सुनील मोरे यांना काही अद्भुत विचारांनी ऊर्जा दिली.
 
 
त्यांनी सुरुवातीला मंदिराबाहेरील कचर्‍यातील करवंट्या जमा केल्या. करवत आणि पॉलिश पेपर एवढ्याच साहित्यावर करवंट्या आकार घेऊ लागल्या. टाकाऊतून टिकाऊ वस्तू पाहताना कलारसिक मुग्ध झाला नाही, तरच नवलच! काल-परवापर्यंत कचर्‍यात पडलेली करवंटी एखाद्या शृंगार केलेल्या सुवासिनीप्रमाणे सजते आणि आपल्या अंतर्गत गृहसजावटीचा महत्त्वाचा भाग ठरते, हे स्वप्नवत मूर्तिमंत सत्य सुनील मोरे यांनी साधलेलं आहे.
 
 
सुनील मोरे यांनी करवंटीपासून विविध प्राणी, पक्षी, खेळणी, फुले, फुलदाण्या, मासे, पेन स्टॅण्ड, मोबाईल स्टॅण्ड, आरती तबक, समई, दीपवाणी, फुलपाखरू, राख्या, आकाशकंदील, तोरण, सुंदर, प्राचीन भांडी, झोपडी, विविध प्रकाशचे अलंकार दागिने, नारळाचे झाड, झोपडी, हळदीकुंकू पात्र, कोयी, खुर्च्या, कीचेन्स, नाईटलॅम्प, चषक, स्मृतिचिन्ह, बे्रसलेट, गणपती, बुद्धप्रतिमा, मनीपर्स, पिगपॉट, वजन तराजू प्रतिकृती, कॅक्टस, जहाज, होडी, मशरुम, ढोलकी, तबला, टाळ, घंटी, फुलांची परडी, अशा हजारो प्रकारच्या वस्तू तयार केल्या आहेत. वस्तू जेव्हा करवंटीपासून बनविलेल्या आहेत, हे रसिकाला समजतं तेव्हा आपसुकच त्याचा हात खिशात जातो अन् त्याला आवडलेली वस्तू तो संग्रही ठेवण्यासाठी विकत घेतो.
 
 
‘लॉकडाऊन’च्या काळात सुनील मोरे यांनी करवंटीची १११ प्रकारची कासवे बनविली. त्यांच्या या कौशल्य विकासाची अनेक संस्थांनी दखल घेतली आहे. हा हस्तकला उपक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स’ यांनी नोंदलेला असून लवकरच त्यांचा हा हस्तकला प्रकार ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविला जाणार आहे. कला, हस्तकला, कार्यानुभव क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ‘बालभारती’ पाठ्यपुस्तक मंडळावर त्यांची सदस्य म्हणून निवडदेखील झाली आहे. निसर्ग व सामाजिक मंडळांवर त्यांना विभागीय संघटक म्हणून स्थान मिळालेले आहे.
 
 
राज्यातील सुमारे २१ शहरांमध्ये त्यांच्या हस्तकलाकृतींचे प्रदर्शन व कार्यशाळा संपन्न झालेल्या आहेत. आपल्याला अवगत असलेली कला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
 
त्यांच्या हस्तकौशल्यासह कलाध्यापन कार्याला अनेक शुभेच्छा.
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121