खान्देशी पक्षीनिरीक्षक

    04-Mar-2022   
Total Views |
 
 
maans
 
 
जळगाव जिल्ह्यातील पक्षीविविधतेची नोंद करून हतनूर धरण जलाशयातील पक्षीविविधता अबाधित राखण्यासाठी झटणारे पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्याविषयी...
 
हतनूर धरण जलाशयातील पक्षीवैभवाच्या संवर्धनासाठी झटणारा हा माणूस. या परिसरातील पक्षीविविधतेची नोंद करणारा. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना पक्षीनिरीक्षणाचे वेड लागल्याने या माणसाने पक्षीजगताचा सखोल अभ्यास केला. खान्देशातून दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी केल्या. ‘मुनिया’ पक्ष्याच्या एका स्वभाववैशिष्ट्याचे गुपित उलगडले. हतनूर धरण जलाशयातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धित करण्याचे त्यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. या जलाशयाला आंतरराष्ट्रीय पाणथळीचा ’रामसर’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी ते झगडत आहेत. खान्देशातील पक्षीवैविध्य जतन करण्याचा वसा उचललेला हा पक्षीनिरीक्षक म्हणजे अनिल महाजन.
 
 
महाजन यांचा जन्म दि. ४ ऑक्टोबर, १९७५ रोजी भुसावळ तालुक्यातील टहाकळी या गावात झाला. ग्रामीण वातावरणामुळे त्यांच्या घरात शिक्षणाप्रती निष्ठा नव्हती. शाळेत जाण्याचे सोडून महाजन आपल्या मित्रमंडळींसमवेत जंगलात भटकायला जायचे. यावेळी रानात दिसणारे नानाविध पक्षी आणि त्यांचा किलबिलाट महाजन यांना आकर्षित करायचा. हिवाळ्यात तापी-पूर्णा नदीच्या संगमावर फिरताना अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी त्यांना दिसायचे. या रंगीत पक्ष्यांना न्याहाळत महाजन तासन्तास नदीकाठावर बसून राहायचे.
 
 
महाविद्यालीयन शिक्षण आणि नोकरीत स्थिरस्थावर होईपर्यंत महाजन पूर्णपणे पक्षीजगतापासून दुरावले होते. दरम्यानच्या काळात वाचनाची आवड असल्याने त्यांनी व्यंकटेश माडगूळकर, गो. नि. दांडेकर, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची पुस्तके वाचून काढली. त्यातून मिळलेल्या निसर्गमय माहितीचा साठा त्यांनी संचयित केला. १९९९७ साली नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर महाजन यांनी पुन्हा आपले लक्ष पक्षीनिरीक्षणाकडे वळवले. रानवाटांची भ्रमंती करून पक्ष्यांना न्याहाळण्याचे काम सुरू केले. पक्ष्यांविषयीच्या माहिती मिळवण्याच्या स्त्रोतांचा तपास केला. त्यावेळी त्यांना ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) पक्षी अभ्यासाविषयी माहिती मिळाली. ’बीएनएचएस’ला भेट देऊन त्यांनी पक्ष्यांविषयीची माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. संस्थेच्या पक्षीशास्त्राविषयी असलेल्या कोर्समध्ये सहभागी होऊन पक्ष्यांविषयी शास्त्रीय ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. सोबत पक्ष्यांच्या मागे भ्रमंती सुरूच ठेवली. त्यासाठी दुर्बिण आणि तत्सम सामग्रीचा लवाजमा खरेदी केला.
 
 
पक्षीनिरीक्षणामुळेच महाजन ’महाराष्ट्र पक्षीमित्र’ या संघटनेशी जोडले गेले. पक्षीमित्र संमेलनात सहभागी होऊन विविध परिसरांमध्ये पक्ष्यांविषयी सुरू असलेल्या कामांची माहिती मिळवली. पक्षीमित्र संघटनेमधील प्रकाश गोळे, प्रकाश ठोसर या ज्येष्ठ पक्षीमित्रांसमेवत भटकंती करण्यास त्यांनी सुरुवात केली. या भटकंतीच्या माध्यमातून महाजन यांना भरपूर काही शिकायला मिळाले. पुढच्या काळात ते वृत्तपत्रांमधून पक्षीनिरीक्षणासंबंधी लिखाण करू लागले. यावेळी त्यांनी ‘मुनिया’ पक्षी हा आपल्या घरट्यात लोणारी कोळसा ठेवत असल्याची नोंद केली. जमिनीपासून साधारण एक फूट उंचीवर ‘मुनिया’ पक्षी घरटं बांधते. अशावेळी त्यामधील पिल्लांना शिकार्‍यांचा धोका असतो. अशावेळी घरट्यात लोणारी कोळसा ठेवल्याने दवामुळे घरटे ओलसर राहत नाही आणि पिल्लांच्या विष्ठेची दुर्गंधीही नाहीशी होते. त्यामुळे विष्ठेच्या वासावाटे शिकारी हे पिल्लांचा माग काढत नसल्याची शास्त्रीय नोंद महाजन यांनी प्रसिद्ध केली. या नोंदीला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.
 
 
पुढच्या काळात महाजन यांनी आसपासच्या परिसरातील पक्ष्यांची ‘चेकलिस्ट’ तयार केली. ती ‘रिसर्च जर्नल’मध्ये प्रकाशित केली. तोपर्यंत अनेक समविचारी लोक महाजन यांच्याशी जोडले गेले होते. म्हणून त्यांनी मिळून २०१० साली ’चातक निसर्ग संवर्धन संस्थे’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. पक्षीवैभवाची देणगी लाभलेल्या हतनूर धरण जलाशयाच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केले. गणपती विसर्जनावेळी निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम राबविला. शाळांमध्ये पक्षी जनजागृतीचे कार्यक्रम केले. वनकर्मचार्‍यांच्या वनप्रशिक्षणादरम्यान त्यांच्यामध्ये पक्ष्यांविषयी जागृती केली. हतनूर जलाशयामध्ये पक्षीनिरीक्षण करण्यासाठी ‘फिल्ड गाईड’ तयार केले.
 
 
’चातक निसर्ग संवर्धन संस्थे’च्या या सर्व प्रयत्नांमुळे हतनूर धरण जलाशयाचा समावेश ’बर्ड लाईफ इंटरनॅशनल’च्या महत्त्वपूर्ण पक्षी क्षेत्रांमध्ये करण्यात आला. सध्या संस्थेकडून या जलाशयाला आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्राचा ’रामसर’ दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाजन यांनी खान्देशातून अनेक दुर्मीळ पक्ष्यांची नोंद केली आहे. ’रेड फ्यालोरफ’ या दुर्मीळ पक्ष्यांची नोंद त्यांनी हतनूर जलाशयातून केली आहे. तसेच, संस्थेच्या पक्षीमित्राच्या माध्यमातून ‘अल्बिनो’ प्रकारातील मोठी लालसरी (रेड क्रेस्टेड पोचर्ड) या पक्ष्याची देशातील पहिलीच नोंद करण्यात आली. हतनूर जलाशयाला ’रामसर’ दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि तिथली पक्षीविविधता अबाधित ठेवण्यासाठी महाजन सध्या कार्यरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, नोकरी सांभाळून ते पक्षीमय जीवन जगत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.