कोल्हापुरातील हत्तींच्या संवर्धनासाठी झटणारा हा वन कर्मचारी. हत्तींच्या मृत्यूमुळे मनाला वेदना झाल्याने हत्ती संवर्धनाच्या कार्याचा विडा उचललेल्या वनपाल दत्तात्रय पाटील यांच्याविषयी..
दत्तात्रय पाटील यांचा जन्म दि. १८ जानेवारी, १९७९ रोजी आजरा तालुक्यातील घाटकरवाडी गावात झाला. त्यांच्या गावाला लागूनच २ हजार, ५०० हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र पसरलेले होते. त्यामुळे दैनंदिन कामादरम्यान जंगलाचे दर्शन व्हायचे. शेतकरी कुटुंबात जन्मल्याने शेतावर जाण्यासाठी या जंगलातूनच पायपीट करून जावे लागे. या जंगलात अनेक वन्यजीव दिसायचे. त्यातूनच जंगलाचे आणि वन्यजीवांचे आकर्षण निर्माण झाले. बालपणच जंगलात गेल्याने पाटील यांचा महाविद्यालयीन शिक्षणाचा ओढा विज्ञान शाखेकडेच वळला. ‘बीएस्सी’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर नोकरीच्या शोधार्थ असलेल्या पाटील यांनी हवी तशी नोकरी सापडत नव्हती.दरम्यानच्या काळात २००३ साली वन विभागाच्या वनरक्षक पदासाठी आलेल्या भरती प्रक्रियेत ते सहभागी झाले. योगायोगाने त्यांची निवड होऊन २००४ साली ते वनसंरक्षणाच्या कामात रुजू झाले.
जंगलातच बालपण गेल्यामुळे त्यांच्यासाठी जंगल हे नवीन नव्हते. केवळ वन विभागाची कार्यपद्धती त्यांना अवगत करावी लागली. दि. १४ एप्रिल, २००४ साली त्यांची वनरक्षक पदावर आजरा तालुक्यात नियुक्ती झाली. कामाला रुजू झाल्यापासून पाटील यांनी वनसंवर्धनाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. चंद्रपूर येथे २००६ मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय वनक्रीडा स्पर्धेत त्यांना ‘कांस्यपदक’ मिळाले. त्यानंतर दि. १ जानेवारी, २००७ ते दि. ३१ डिसेंबर, २००७ दरम्यान त्यांचे शहापूर येथे वनप्रशिक्षण पार पडले. हे प्रशिक्षण त्यांनी प्रथम क्रमांकासह पूर्ण केले आणि सर्वोत्कृष्टविद्यार्थी म्हणून त्यांना निवडले गेले. दरम्यानच्या काळात चंदगड वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून चार हत्तींचा मृत्यू झाला. यावेळी पाटील त्याठिकाणी मदतीला गेल्यानंतर त्यांना हत्तीच्या मृत्यूचे कारण ऐकून धक्का बसला. शेतपिकाचे नुकसान केल्यामुळे शेतकर्यांनी विजेचा धक्का देऊन हत्तींना मारले होते. ही वास्तविकता पाटील यांचा मनाला टोचली आणि याठिकाणी त्यांच्या विचारांना कलाटणी मिळाली.
२००८ साली कोल्हापूरमध्ये पहिला जंगली हत्ती दाखल झाला. योगायोगाने हा नर हत्ती पाटील यांचे कार्यक्षेत्र असणार्या वनक्षेत्रात स्थिरावला. चंदगडप्रमाणे या हत्तीला मारले जाऊ नये, म्हणून पाटील यांनी जनजागृती अभियानाला सुरुवात केली. उसाच्या शेतावर हत्ती डल्ला मारत होता. अशावेळी पाटील यांनी शेत मालकाची चर्चा करून त्याला नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. शेतकर्यांशी संवाद साधून त्यांनी विजेचा धक्का देऊन हत्तीला मारू नये, याबाबत विनंती केली. तीन महिने हा हत्ती पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रात राहिल्यानंतर निघून गेला. मात्र, पाटील यांनी हत्ती संवर्धन आणि जनजागृती कामाचा विडा उचलला.
त्यानंतरच्या काळात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यादरम्यान हत्तींची ये-जा सुरू झाली. हत्तींचे कळप आपल्या पिल्लांसमेवत कधी चंदगड, तर कधी आजरा, तिलारी भागात दिसू लागले. पिल्लू मागे राहिल्यास आणि ते न दिसल्यास हत्ती शेतीचे नुकसान करायचे. त्यामुळे मानव-हत्ती संघर्षाचा प्रश्न निर्माण व्हायचा. यासाठी पाटील यांनी सर्वप्रथम कोल्हापुरात येण्यासाठी हत्ती कोणत्या वनक्षेत्रांचा आणि भ्रमणमार्गाचा वापर करतात, हे शोधून काढले. हत्ती-मानव संघर्ष कमी करून माणसांना त्याच्याप्रती सहानुभूती वाटावी म्हणून त्यांना नावे देण्याची सुुरुवात केली. त्यामुळे या हत्तींच्या वावर क्षेत्रातील लोकांचा त्यांचाशी ऋणानुबंध निर्माण झाला. पाटील यांनी हत्तींच्या हालचालींचे अर्थ लावून हत्तींचा मार्ग आणि त्यांच्या संभाव्य कृतीचा अंदाज लावण्यास सुरुवात केली. हत्ती जंगल सोडून बाहेर आल्यावर त्यांना तातडीने जंगलात पुन्हा परतवण्यासाठी ही निरीक्षणे त्यांना उपयोगी पडली.
२०१४ साली पाटील यांनी वनरक्षक ते वनपाल कालवर्धित पदोन्नती परीक्षा दिली. या परीक्षेत ते कोल्हापूर वनवृत्तात प्रथम आले आणि त्यांची वन्यजीव विभाग दाजीपूर येथे वनपालपदी नियुक्ती झाली. पाटील यांनी आजवर २०० हून अधिक शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाविषयी मार्गदर्शन केले आहे. वन्यजीवांसाठी श्रमदानातून पाणवठे जीवंत करणे, जखमी वन्यजीवांची काळजी घेणे इ. कामे केली आहेत. २०१८-१९ मधील उत्कृष्ट कामांसाठी त्यांना तत्कालीन वन सचिवांकडून गौरविण्यात आले. २०२०-२१ या काळात वन्यप्राणी शेतपीक नुकसानीच्या ८५० प्रकरणांची चौकशी करून त्यांना नुकसान भरपाई अदा केली. २५ महिने पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार त्यांनी यशस्वी सांभाळला. या सर्व काळात त्यांनी आपले ‘एमबीए’पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या संकल्पगीताची रचना करून त्याचे सादरीकरण केले. सरतेशेवटी महाराष्ट्र शासनाकडून वनसेवेसाठी देण्यात येणारे सर्वोच्च सुवर्ण पदकाचे पाटील मानकरी ठरले आहे. वने आणि वन्यजीव व्यवस्थापनासंबंधी सर्वोत्तम कामगिरी केल्याने राज्य सरकाराने त्यांना हे पदक देऊन गौरविले. आज खर्या अर्थाने वन विभागाला पाटील यांच्यासारख्या वन कर्मचार्यांची गरज आहे. जे सेवा म्हणून नाही, तर आवड म्हणून वनसेवेची कामे करतील. या कामांमधून पराकोटीचे समाधान मिळते, अशी भावना व्यक्त करणार्या पाटील यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!