नवी दिल्ली : रविवारी रात्री ऑस्कर २०२२च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. कोरोनानंतर तब्बल २ वर्षांनी हा सोहळा लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये रंगला. यावेळी अनेक कलाकारांची उपस्थिती दर्शवली. पण, यंदाच्या सोहळ्यालाही गालबोट लागलेच. प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ याने ख्रिस रॉकला स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली. या प्रसंगानंतर जगभरात याची चर्चा झाली.
स्टेजवर आलेल्या ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथची खिल्ली उडवली. पण त्याची ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने मंचावर येत ख्रिसच्या कानशिलात लगावली. ख्रिस रॉकने 'जी.आय. जेन २' या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला, असे वक्तव्य केले. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने रॉकच्या थोबाडीत लगावली. मुळात, त्याच्या पत्नीला अलोपेसिया नावाचा आजार आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत.