नम्रता हा जीवनाचा आधार आहे. आपल्याकडे सर्व काही असेल, पण नम्रता अंगी नसेल, तर सर्व काही व्यर्थ समजले जाते. आज-काल समाजात वाईट लोकांना महत्त्व दिले जात असले, तरी चिरस्थायी मोठेपणा मिळतो, तो विनयशीलमुळेच. ज्याच्या अंगी नम्रता असते, तो यशाचे शिखर गाठतो.
न्यग् वातोऽव वाति न्यक् तपति सूर्य:।
नीचीनमघ्न्या दुहे न्यग् भवतु ते रप:॥
(ऋग्वेद-10/60/11, अथर्व.6/91/2)
अन्वयार्थ
(वात:) प्राणवायू (न्यक्) खाली नतमस्तक होऊन, नम्रतेने (अव वाति) वाहत आहे. (सूर्य:) सूर्य हादेखील (न्यक्) खालच्याच दिशेला विनम्रतेसह (तपति) तापत आहे, आपली तप्त किरणे फैलावत आहे. (अघ्न्या) गायसुद्धा (नीचीनम्) अतिशय नम्र होत खालच्याच दिशेने (दुहे) दुधाच्या धारा वाहावीत आहे. म्हणूनच हे माणसा!,(ते) तुझे (रप:) नानाविध विकार, मल, पाप ( न्यक् भवतु ) खालच्या दिशेनेच ओसंडोत, नाहीसे होत राहोत.
विवेचन
मानवी जीवनाचे साफल्य जर कशामध्ये असेल, तर ते विविध सद्गुणांमध्ये आणि त्यांतदेखील सर्वात वरचे स्थान कोणाचे असेल, तर ते म्हणजे नम्रतेत! कारण, नम्रता हा जीवनाचा आधार आहे. आपल्याकडे सर्व काही असेल, पण नम्रता अंगी नसेल, तर सर्व काही व्यर्थ समजले जाते. आज-काल समाजात वाईट लोकांना महत्त्व दिले जात असले, तरी चिरस्थायी मोठेपणा मिळतो, तो विनयशीलमुळेच. ज्याच्या अंगी नम्रता असते, तो यशाचे शिखर गाठतो. माणसाचा मोठेपणा हा धनवैभव किंवा भौतिक वस्तूच्या संग्रहात नसून तो नम्रतेमध्ये आहे. कारण, नम्रतेमुळेच त्याला एक प्रकारची उंची व प्रतिष्ठा लाभते. समाजात वावरताना त्याच व्यक्तीला महत्त्व दिले जाते, जो शालीन, सुव्यवस्थित, विनयशील आणि सर्वांशी मधुर, प्रेमळ व विनम्रपणे व्यवहार करणारा असतो. खूप काही शिकला-सावरला आणि मोठ्या पदावर गेला पोहोचला, पण त्याच्या वागण्यातून सहजता व विनयशीलता आढळत नसेल, तर त्याचे शिक्षण आणि पदप्राप्ती हे सर्व व्यर्थच झाले समजा. अशा गर्विष्ठांना कोणीही किंमत देत नाही. म्हणूनच तर म्हटले आहे- ‘विद्याविनयेन शोभते!’ विद्येच्या मुळातदेखील नम्रताच आहे. म्हणूनच ‘विद्या ददाति विनयम्’ असेही म्हणतात.
प्रस्तुत मंत्रात अनुक्रमे प्राणवायू, सूर्य व गाय यांची उदाहरणे देत शेवटी माणसाला आपल्यातील दोषांना दूर करीत विनम्र होण्याचा उपदेश केला आहे. आपल्या जगण्याचा महत्त्वाचा घटक प्राण होय. यामुळेच तर प्रत्येक जीव जीवनशक्ती धारण करतो, म्हणून सर्व जीवांना ‘प्राणी’ असे म्हणतात. प्राणवायू हा सर्वत्र वाहत आहे. आपण जर निरीक्षण केले, तर प्राणशक्तीमध्ये विलक्षण नम्रता दिसून येते. प्रत्येक प्राणी हा जेव्हा श्वासोच्छ्वास ग्रहण करतो, तेव्हा प्राण हे अगदी नासिकेच्या समोर आल्याचे दृष्टीस पडते. खालच्या दिशेने येऊन ते जीवात्म्यांच्या शरीरात प्रविष्ट होतात, म्हणजेच प्राणांची नम्रता आपण अनुभवतो. यासाठीच मंत्र आहे- वातः न्यक् अव वाति। म्हणजेच प्राणवायू हा नम्रतेने सर्वांना जीवन प्रदान करतो. इतके हे महान तत्त्व, जे सर्वांना संजीवनी प्रदान करते, पण तेदेखील विनयशील होऊनच. कोणत्याही प्रकारचा गर्व नाही की अभिमान! हा वायू एके ठिकाणी थांबला नाही. तो सर्वत्र मुक्तपणे सर्वांना आपली प्राणशक्ती वितरण करीत पुढे पुढे सरसावतो आहे. नम्रतेचे दुसरे उदाहरण आले आहे, ते म्हणजे सूर्याचे...सूर्य: न्यक् तपति। समग्र विश्वाला तेजस्वी प्रकाशकिरणांनी उजळवणारा सूर्य आपली किरणे सार्या भूमंडळावर मुक्तपणे फैलावतो आहे. सकळ प्राणिमात्रांना आरोग्य, नवचेतना, ऊर्जा, उत्साह आणि जगण्याची ऊर्मी प्रदान करीत हाच तो सूर्य सर्वांमध्ये जन्मण्याचे सामर्थ्य प्रदान करतो आहे. आपल्या तप्तरश्मी तो नम्रतेने सार्या भूमीवर उतरवताना दिसतोय. सूर्य हा सर्व गुणांनी आणि शक्तीने मोठा असून आपण किती नम्र आहोत, हे सर्व जगाला सांगत आहे. तिसरे उदाहरण आहे ते गोमातेचे. कितीतरी नम्रता झळकते गाईच्या जीवनात. म्हणूनच तिचे महात्म्य गातांना वेदाई म्हणते-
अघ्न्या नीचीनं दुहे!
‘अघ्न्या’ म्हणजेच निष्पाप प्राणी, गाय. तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाप नाही. अगदी करुणेची मंगलमूर्ती म्हणजे गाय. आपले समग्र जीवन मानवाच्या कल्याणासाठी अर्पण करणारी आई म्हणजेच गाय. माणूस जन्मल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या समग्र जीवनप्रवासात गाय ही सर्वदृष्टीने कल्याणकारी देवता म्हणून गोठ्यात उभी आहे. तिचे दूध हे तर अमृतच. इतकेच काय, शेण, मूत्र आणि मृत्यूनंतरचे तिचे अवयवदेखील मानवाकरिता पूरकच. अशीही ‘अघ्न्या’ जेव्हा आपल्या स्तनांतून दुधाच्या धारा प्रवाहित करते, ते खालच्या दिशेनेच! आपल्या दुग्धामृताचे दान करतानादेखील गाईंमध्ये किती मोठी व्यापक नम्रता आहे. शेतकरी किंवा गवळी दूध काढताना तिच्या स्तनांतून खालच्या पात्रात ओघळणार्या दुग्धधारा किती कमालीची विनयशीलता दर्शवितात. आम्ही नेहमीच हे दृश्य पाहतो, पण आपली दृष्टी त्या नतप्रसंगाकडे जात नाही. अशी ही गोमाता आम्हाला नम्र होण्याचा संदेश देतेय. या तिन्ही उदाहरणातून माणसाने काय शिकावे? तर आपल्यातील जेवढे दुर्गुण व दोष आहेत, त्याचबरोबर ज्या काही वाईट सवयी आहेत, त्यांना खाली फेकून द्यावे. आपल्यातील खलत्व गळून पडावे. म्हणूनच वेदऋचा म्हणतेय- ते रप: न्यक् भवतु। जितके पाप, मळ, दोष आणि वाईट सवयी आहेत, त्यांच्यासाठी ‘रप:’ हा शब्द आला आहे. प्रत्येक अनिष्ट कार्याच्या मुळाशी असते, ती माणसाची अनिष्ट वृत्ती! याच वाईट वृत्तीमुळे माणूस ज्ञानी असो की अज्ञानी, तो नेहमीच नको ती वाईट कामे करण्यास प्रवृत्त होतो. वेद, उपनिषद, दर्शन, गीता व इतर आर्ष साहित्याचा हाच उद्देशदेखील हाच! म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ आणि ‘दुरितांचे तिमिर जावो.’ आपल्यातील सर्व प्रकारचे दोष फेकून दिले की, माणूस पवित्र व शुद्ध होतो आणि त्याची वाटचाल दानवाकडून मानवाकडे आणि मानवाकडून देवत्वाकडे होऊ लागते. यासाठीच मानवाने अगदी नम्रपणाने आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करावा. त्याला खाली फेकून द्यावे. असे झाले, तर निश्चितच जीवन सफल ठरते. कवी शाहीर अनंत फंदी यासाठीच तर म्हणतात-
अंगी नम्रता सदा असावी,
राग कुणांवर धरु नको!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य