साधनेद्वारे झालेली गुणाणुरचना, शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणुंची रचना अतिशय शुद्ध म्हणजेच सुसंस्कृत हवी. योगसाधना म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणाणुरचना आपोआप घडत असे. साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो. केवळ आसनाने, कोरडा जप केल्याने वा पुस्तके वाचल्याने असली उपयुक्त कुंडलिनी जागृती होणार नाही. सतत साधनेने ही नवकुंडलिनी रचना स्थिर बनते. मग साधक एक नवी सुसंस्कृत धर्माची व्यक्ती बनते. ही नवकुंडलिनी रचना नंतर सहसा बदलत नाही. कुंडलिनी जागृतीची जाणीव समुच्चय पद्धतीने व प्रकर्षाने मूलाधाराचे स्थानी होत असते. कारण, सर्व मज्जातंतूंचे संमेलन त्यास्थानी होत असते आणि म्हणून कुंडलिनीचे स्थान आपण मूलाधारात समजतो. पण तो समज आहे, वस्तुस्थिती नाही.
सर्व शरीरातच कुंडलिनी असते. ध्यान व स्वभाववृत्ती संयमाने कुंडलिनी जागृती योग्य तर्हेने होत असते. शक्तिपाताने कुंडलिनी जागृती योग्य तर्हेने होत नसते. ती तशी झाली असे वाटल्यास ती हानिकारक असते. त्यात कोणाचाच लाभ होत नसतो. गीता याबाबतीत स्पष्टच सांगते. ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:।’ येथे धर्म म्हणजे स्वभावधर्म वा गुणाणुरचना होय. परक्या व्यक्तीच्या धर्माने साधकाची मूळ गुणरचना बळेच बदलून तो कुठलाच राहत नाही. कित्येक वेळा असे साधक अवनतीला गेलेले दिसतात. कुंडलिनी जागृतीचा माणूस पार बदलून गेलेला असतो, त्यांचा मूळ स्वभाव पार बदलून तो आता एक खर्या अर्थाने देवमाणूस बनला असतो. त्याची शरीरकांती सुवर्णासारखी झालेली असते. त्याची बुद्धी अतिशय प्रखर व संपन्न झालेली असते. त्याला अनेक कला व विद्या करतलाभवत् झालेल्या असतात. म्हणून त्याचे ओजस जागृत झालेले असते. म्हणून सर्वच संत उत्तम कवी असतात. उत्तम वक्ते असतात. कुंडलिनी जागृतीशिवाय देवतादर्शन वा आत्मदर्शन नाही. पण, कुंडलिनी जागृती ही मध्यअवस्था आहे, अंत्यअवस्था नाही. हे अध्यात्म प्रदेशाचे प्रवेशद्वार होय. खरे मंदिर बरेच खोल व आत असते. या कालात काही साधकांना सर्पदर्शन होत असते. कुंडलिनी गती सर्पासारखी असल्याने साकार संस्कार साधर्म्यामुळे साधकाला सर्पदर्शन होऊ शकते. भगवान शंकरांच्या अंगाखांद्यावर म्हणूनच सर्प दाखविले असतात. कालांतराने साधकाचे शरीर पूर्ववत बनते, अगदी साधारणासारखे! तेज:पुंज चेहरा व पुष्ट शरीर प्राथमिक अवस्था आहे, शेवटची नव्हे.
साधकाने हीच साधना पुढे चालू ठेवावी. साधकाला आता समजून येईल की स्तोत्रगायन, ज्योतिदर्शन, स्वरुपदर्शन आणि देवतांचे अवयवदर्शन बंद होत आहे. स्तोत्र चालू आहे, पण आतून कोणीतरी ते म्हणत आहे. दर्शन होत आहे, पण नेत्र बंद आहेत. दिव्यनाद ऐकू येतो आहे, पण कानाने काही ऐकू येत नाही. दिव्य स्पर्श जाणवतो, पण देहभाव कधीच हरपलेला आहे. स्मृती आणि व्यवधानसुद्धा नष्टप्राय होऊन जातात. आता साधकाला वारंवार असा आवाज ऐकू येतो की, त्याचे नाव घेऊन त्याला कोणीतरी बोलावित आहे. परंतु, समोर पाहिल्यास कोणीच नसते. नंतर साधक आपल्या इष्टदेवतेचे नावसुद्धा वारंवार ऐकतो. परंतु, प्रत्यक्ष भगवान मात्र समोर दिसत नाहीत. साधक अशा विलक्षण अनुभवातून जातो आणि आपल्या भगवंताच्या दर्शनासाठी वेडा होतो. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याला आपल्या भगवंताचे नाव ऐकू येते आणि भगवंताच्या दिव्य दर्शनाचा आभास होतो. परंतु, तो आभासच असतो. प्रत्यक्ष भगवान त्या जड वस्तूच्या आत मात्र लपून हसत राहतात आणि भक्ताची तडफड पाहतात. धन्य आहे तो चित्तचोर छद्मी भगवान आणि धन्य त्याचे हट्टी वेडा भक्त!
दिव्य क्षण
एक क्षण असा येतो की, भगवंताची ही क्रूरता आणि छद्मीपणा पाहून भक्त निराश होतो. अंत:करणात दडलेली असते उदंड इच्छा, परंतु प्रत्यक्ष अनुभव मात्र घोर निराशेचा. अशा विकल अवस्थेत साधक त्रस्त होऊन चिडून जातो. अधिकच वेडा बनतो आणि आपल्या भगवंताची आपल्याला आता प्राप्ती होणार नाही, या भावनेने व्याकुळ होऊन त्याचे मन आणि अंत:करण पूर्णपणे शिथिल बनते. आता त्याचे काहीच उरलेले नसते, न तो स्वतः, न त्याचा प्रिय भगवंत. एवढेच काय, पण भगवंताला प्राप्त करण्याची त्याची प्रखर इच्छासुद्धा शिल्लक राहिलेली नसते. तो निराश होऊन परततो. बिचारा भक्त! ज्या भगवंताकरिता तो सर्व संसाराचा त्याग करुन वेडा, व्याकुळ बनतो आणि त्याला रानावनात शोधतो. तो आता संपूर्ण भावनारहित म्हणजे निरहंकारी बनलेला असतो आणि उगवतो तो दिव्य क्षण... अचानक त्याचा भगवंत त्याच्या समोर येऊन प्रकट होतो आणि त्याला दर्शन देतो. धन्य तो क्षण, धन्य तो भगवान आणि धन्य तो भक्त! भक्ताच्या जीवनाची ही अंतिम अवस्था आहे, ही जीवनाची समाप्ती आहे. याच दिव्य क्षणासाठी भक्त जीवंत राहतो आणि मरतोसुद्धा. भक्तिमार्गाचे हे सर्वस्व आहे. साधकाच्या कर्मानुसार साधक भक्त या दिव्य दर्शनात सदा रममाण होतात. परंतु, काही श्रेष्ठ साधक या दिव्य अनुभूतीच्या मायेत गुरफटून न राहता आणखी पुढे जातात. असे साधक जल-स्थल-काष्ठ-पाषाणामध्ये भगवंताला पाहतात. पण नंतर पाहणे, ऐकणे आणि अनुभव घेणे पण बंद होते.
निर्गुण निराकार
अनुभवांचे प्राशन करून हा श्रेष्ठ पुरुष आता स्वत:च भगवान बनलेला असतो, पण त्याला मात्र त्याचे भान नसते. आता त्याला काहीच दिसत नाही. कोणतेच अनुभव येत नाहीत. अशी ही अनुभवरहित, स्मृतिरहित, जीवनरहित, इच्छारहित, अवस्थारहित अवस्था म्हणजे निर्गुण निराकार अवस्था आहे. आहे ते केवळ शून्य. उपनिषदात या शून्याचे वर्णन आहे.
ओम् पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।
वर्णन केलेल्या सरळ आणि सुलभ साधनेचे निष्ठापूर्वक अवलंबन केल्यास त्याला हे सर्व प्राप्त होऊ शकते. योगी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाप्रसादाने लेखकाने या सर्व पायर्या चढून जाऊन सर्व काही पाहिलेले आणि अनुभवलेले आहे आणि आता त्यांच्याच कृपेने काहीसुद्धा पाहत नाही. सर्व संसार, सर्व विश्व खरेखुरे वैदिक (ज्ञानमय) बनून आणि खरेखुरे ब्राह्मण (ब्रह्म जानाति इतिः ब्राह्मण:) व्हावे, हीच कर्मकामना विश्वाच्या विद्यमान स्पंदनात स्पंदन करुया. ‘भद्रं नो अपिवातय मनः’ हे परमनिधाना, आम्हाला चांगल्या कार्यामध्ये स्वारस्य दे. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)