नाशिक-कल्याण लोकल लवकरच!

रेल्वे राज्यमंत्र्यांचे मध्य रेल प्रबंधकांना पत्र

    21-Mar-2022
Total Views |

Central Railway
 
 
 
नाशिक : नाशिककरांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली नाशिक-कल्याण लोकल सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनशिकायत कार्यालयाने ही लोकल सुरू करण्याबाबतची शक्यता चाचणी करण्याचे (फिजिबिलिटी टेस्ट) निर्देश दिले आहेत. मध्य रेल्वे मंडल रेल प्रबंधकांना तसे पत्र देण्यात आले आहे. याबाबत काय कार्यवाही केली ते रेल्वे राज्य मंत्रालयाच्या कार्यालयाला कळवावे, असे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
मुंबईच्या लोकलमध्ये ‘लोको पायलट’ म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले आणि सध्या नाशिक रोड येथे राहणारे वामन सांगळे हे नाशिक-कल्याण लोकल सुरू व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालयाकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून स्वखर्चाने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना याबाबत पत्र लिहिले होते. त्याला प्रतिसाद मिळाला त्यानुसार नाशिक-कल्याण ‘लोकल फिजिबिलिटी टेस्ट’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
 
रेल्वेचे ‘डीआरएम’ शलभ गोयल, रेल्वे विभागाचे अधिकारी अनिलकुमार पत्की आणि अभियंता मानकरे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी लखनौ येथील ‘आरडीएसओ’ विभागाच्या प्रतिनिधींशी संपर्क केला आहे. लोकलचे परीक्षण ‘आरडीएसओ’ करते व तो अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करत असते.
 
 
 
...असे आहेत ‘या’ लोकलचे फायदे
इगतपुरी-भुसावळ मेमू सुरू झाल्यानंतर नाशिक-कल्याण लोकल सुरू करण्यासाठी जनमताचा रेटा वाढला आहे. मात्र, कसारा घाटातील बोगदे लोकलसाठी पुरेसे मोठे नाहीत, ही व अन्य कारणे देत रेल्वे प्रशासन लोकलची चाचणी टाळत आले आहे. चाचणीसाठी निधीची तरतूद होऊनही ऐनवेळी चाचणी रद्द करण्यात आली. ही लोकल सुरू झाल्यास ‘पंचवटी’, ‘राज्यराणी’, ‘तपोवन’, ‘गोदावरी’ या गाड्यांवरील गर्दीचा प्रचंड भार कमी होईल. नाशिक-मुंबई ‘कनेक्टिव्हिटी’ वाढेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, ठाण्याला अप-डाऊन करता येईल. शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. त्यांच्या आत्महत्या बंद होतील. रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जाणे सोयीचे होईल. व्यावसायिकांना रोजगारही उपलब्ध होईल.