नवी दिल्ली: इस्लामिक सहकार्य संघटनेकडून होणाऱ्या इस्लामाबाद येथील परिषदेसाठी काश्मीर मधील फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सला आमंत्रण देण्यात आले आहे. संघटनेच्या या भारत विरोधी भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या बद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. "भारतविरोधी कारवाया करणाऱ्या कलाकार तसेच संघटनांना इस्लामिक सहकार्या संघटनेकडून प्रोत्साहन मिळावे हे आम्हांला अजिबात मान्य नाही" अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
"इस्लामिक संघटनेच्या कोणा एका सदस्याच्या भूमिकेनुसार अजेंडा ठरविणे हे खूप दुर्दैवी आहे, अशा भारतविरोधी संघटनांना आपला मंच वापरू देणे इस्लामिक संघटनेने थांबबावे" असेही बागची यांनी पाकिस्तानचे नाव न घेता इस्लामिक संघटनेला सुनावले. काश्मीर मधील फुटीरतावादी आणि पाकिस्तान समर्थक म्हणून हुर्रियत कॉन्फरन्स हा पक्ष ओळखला जातो. सातत्याने भारतविरोधी कारवाया करणे आणि जनतेची माथी भांडवणे यांसाठी हा पक्ष प्रसिद्ध आहे.