सध्या अवघ्या जगाचा केंद्रबिंदू हा रशिया-युक्रेन युद्ध आणि तेलाच्या वाढणार्या किमती यावरच स्थिरावलेला दिसतो. त्यामुळे या संघर्षाची ठिणगी उडण्यापूर्वी जगाची चिंता वाढविणारी ‘कोविड’ महामारी मात्र एकाएकी मागे पडली. महामारीची जागा संभाव्य महायुद्धाच्या बातम्या, व्हिडिओंनी घेतली. त्यामुळेच जणू ‘कोविड’ हद्दपार झाला, असेच काहीसे चित्र निर्माण झाले. भारतासह बर्याचशा देशांमध्ये ‘कोविड’ची रुग्णसंख्या कमी झालीसुद्धा, पण त्याला अपवाद ठरला एक देश. हा तोच देश ज्याने ‘कोविड’रुपी महामारीचा शाप आणि ताप अख्ख्या जगाला दिला. अर्थातच चीन!
चीनमध्ये कोरोना लसीकरणाचे प्रमाण ८७.४ टक्के असले तरी पुन्हा एकदा काही शहरांमध्ये कडक ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती ओढवली. त्यामुळे एका आकडेवारीनुसार, चीनमधील जवळपास ३० दशलक्ष लोकसंख्या ही घरांमध्ये किंवा विलगीकरण केंद्रांमध्ये कडीकुलपात सध्या बंद आहे. कोरोना चाचणीचे प्रमाणही चीनमध्ये एकाएकी दुपटीने वाढले असून, सर्वत्र या चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. चीनची ‘झिरो कोविड स्ट्रॅटेजी’ म्हणूनच सपशेल अपयशी ठरली असून, ‘ओमिक्रॉन’ने चीनच्या लसींचा फोलपणा यानिमित्ताने जगासमोर आलेला दिसतो. पण, चीनला त्याचे वावगे ते काय... कारण, अगदी २०१९ पासून ते आतापर्यंत चीनने खर्या ‘कोविड’ रुग्णांचा आकडा हा कायमच लपवला. आताही जी आकडेवारी समोर येताना दिसते, ती कितपत खरी मानावी, हाही प्रश्च आहे. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या या देशात आजवर फक्त ४,६३६ नागरिकांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, जे अजिबात पटणारे नाही.
कारण, चीनखालोखाल लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारतात कोरोना मृतांची संख्या ही पाच लाखांच्या घरात आहे. त्यामुळे चीन कोरोनाच्या रुग्णसंख्येपासून ते मृतांचा आकडा किती मोठ्या प्रमाणात लपवतोय, याचा साधारण अंदाज यावा. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने चीनमधील १३ शहरांमध्ये कडेकोट ‘लॉकडाऊन’ असून, काही शहरांमध्ये कोरोनाविरोधी निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. परिणामी, पुन्हा एकदा दुकानांसमोर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा आणि चेहर्यावर तिच अनामिक भीती पुनश्च दिसून आली. त्यातच समोर आलेल्या माहितीनुसार, एकच दिलासादायक बाब म्हणजे, नागरिकांना सरकारी विलगीकरण केंद्राच्या पिंजर्यात न डामता यंदा घरच्या घरी विलगीकरणाची परवानगी चीन सरकारने दिली आहे. कारण, यापूर्वीच्या कोरोना लाटांमध्ये अख्ख्या इमारतींच्या मुख्य प्रवेशद्वारालाच टाळे लावून चीन सरकारने नागरिकांची चांगलीच कोंडी केली होती. तसेच, पत्र्याच्या छोट्याशा कंटेनरमध्येही नागरिकांना अक्षरश: कोंबण्याची असंवेदनशीलता चीनने दाखविली होती. आता त्या तुलनेत चीन सरकारने आपल्याच नागरिकांवर दया दाखवली, असे म्हणायचे.
सध्या बीजिंग, शांघाय या शहरांसह एकूणच देशांतर्गत उड्डाणेही चीनने रद्द केली आहेत. तसेच, या ‘लॉकडाऊन’मुळे चीनच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील प्रांत, जे चीनच्या ‘जीडीपी’मध्ये मोठा वाटा उचलतात, त्यांचीही आर्थिक कोंडी झाल्याने, चीनने ५.५ टक्क्यांच्या ‘जीडीपी’चे ठरवलेले लक्ष्य यंदा पूर्णत्वास येण्याची शक्यताही तशी धुसरच. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रचार-प्रसारामुळे काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानसेवाही खंडित झाली असून, चीनमध्ये प्रवेश करण्याचा किंवा बाहेर पडण्याचे मार्गही आपसूक बंद झाले आहेत.
एकूणच काय, तर कोरोनाच्या जन्मभूमीची आता पुन्हा एकदा मृत्युभूमीकडे वाटचाल सुरू झाली असून ‘पेराल तेच उगवेल’ ही उक्ती यानिमित्ताने अगदी सार्थ ठरावी. पण, आपण कोरोनाला चीनची जन्मभूमी मानत असलो तरी अद्याप चीनने या वैश्विक पापाचा स्वीकार मात्र केलेला नाही आणि भविष्यातही चीन कोरोनाच्या उगमाची जबाबदारी स्वीकारेल अथवा या देशावर त्याने ती तशी स्वीकारावी म्हणून जागतिक दबाव आणला जाण्याची शक्यताही धुसरच! त्यामुळे चीनच्या या पापाची शिक्षा अख्ख्या जगासोबत आता चीनलाही पुन्हा एकदा निश्चिंत जगू देणार नाहीच. तेव्हा, ‘करावे ते भरावे’ हीच निसर्गनियमानुसार चीनला नियतीने दिलेली शिक्षा समजावी!