भारतीय संस्कारासाठी वेगळ्या आयामाने कार्य करणार्या स्वाती इंदुलकर. तंत्रज्ञान ते संस्कृती-संस्कार असा दिप्तीमान प्रवास असणार्या स्वाती इंदुलकरांच्या जीवनकार्याचा मागोवा इथे घेतला आहे.
भारतीय संस्कार आणि कुटुंब व्यवस्था, आजीबाईचा बटवा, पितृपक्ष कृतज्ञता पर्व, चातुर्मास चातुर्य, स्त्रोत्रमंत्र विज्ञान, भगवद् गीता या विषयावर गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रम आयोजित करून स्वाती इंदुलकर यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभ्यासक्रमात सुरुवातीला आठ जण सहभागी होते. आजच्या घडीला १८०० लोक या अभ्यासक्रमात सहभागी होतात. परीक्षाही देतात. ‘एमबीए’पर्यंत शिक्षण झालेल्या आणि देशात परेदशात व्यवसाय नोकरीनिमित्त अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजित काम केलेल्या तसेच उत्कृष्ट नाट्यकर्मी अभिनेत्री असलेल्या स्वाती इंदुलकर. ‘अध्याय प्रोडक्ट अॅण्ड सर्व्हिसेस एलएलपी’ कंपनीच्या त्या संस्थापक आणि सर्वेसर्वा. ‘सॉफ्टवेअर ट्रेनिंग’ कंपनीचा सर्वांगीण विकास आणि सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी करणे इतर अनेक अनुषंगाने ‘अध्याय प्रोडक्ट अॅण्ड सर्व्हिसेस एलएलपी’ काम करते. देशभरातील नामांकित ‘फर्म’ आणि संस्थासोबतच विदेशातही कंपनीच्या कामाचा बोलबाला आहे.
कुणालाही एक प्रश्न पडू शकतो की,तंत्रज्ञान-विज्ञान वगैरे आधुनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीच्या प्रमुख स्वातीयांनी भारतीय संस्कृती आणि इतर धार्मिक सांस्कृतिक आयामासंदर्भातील अभ्यासक्रम का आयोजित केले असतील? तर स्वाती या संस्कार भारती कोकण प्रांतच्या मंत्री आहेत. संस्कार भारतीशी त्या २०१९ साली जोडल्या गेल्या. त्यातून मग पुढे दादा गोखले, ए. के.अहमद, मंजिरी पटवर्धन, माधुरी शेंबेकर वगैरेंचे विचार ऐकून त्यांच्यातला मुळचा संस्कारक्षम स्वभाव संस्कृतीबाबत संवेदनशील झाला. पण, स्वाती यांच्या आयुष्याला वळण देणारी एक घटना आहे. ती घटना म्हणजे ‘कोविड’चा प्रकोप. २०२० साली कोरोना आला. अनेक हसतीखेळती घरे उद्ध्वस्त करून गेला. त्यावेळी स्वाती यांच्या मित्र परिवारातील काही जण कोरोनामुळे देवाघरी गेले. दोन दिवसांपूर्वी ज्यांच्याशी त्या बोलल्या होत्या, ख्यालीखुशाली विचारली होती, तो मित्र दोन दिवसांनी कोरोनामुळे मृत्यू पावला. मृत्यूचे हे भयानक तांडव सुरू असतानाच स्वाती यांचे सर्र्वेसर्वा असलेले वडील चंद्रकांत तसेच स्वातीयांचा भाऊ आणि वहिनी यांनाही कोरोना झाला. तिघेही मृत्यूच्या दारातून परत आले. देव बलवत्तर होते. या सगळ्या काळात स्वाती यांना वाटले की, मृत्यू तर अटळ आहे पण ती भिती? अर्धे लोकं तर कोरोनाच्या भीतीनेच वारले. लोकांच्या मनातील ही भीती घालवायला हवी. अशातच एक चित्र असेही समोर आले की, या कोरोनाच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढले होते. कारण काय? घरात माणसं एकमेकांना भेटू लागली होती. कोरेानाच्या दडपणामुळे माणसाच्या वागण्यात कोंडलेपणा आला. राग, निराशा आणि संताप यांचा उद्रेक शेवटी घरातल्या नात्यांवर होऊ लागला. हे सगळे कसे टाळणार?
कोरोनाच्या महामारीत एक भारतीय म्हणून आपणही कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे. हे स्वाती यांच्या मनात येऊ लागले. त्या अस्थिर काळात भारतीय अध्यात्मावर आधारलेली भारतीय संस्कृतीच आपल्याला आणि जगभरातील लोकांना वाचवू शकेल, असे त्यांना वाटू लागले. या सगळ्यांचा विचार करत स्वाती यांना वाटू लागले की, पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंंब असायची. लोकांकडे जास्त पैसेही नसायचे, ना सुविधा असायच्या. पण तरीही लोक प्रत्येक परिस्थितीला हसत हसत तोंड द्यायचे. कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि एकतेसाठी अमुल्य त्याग आणि कष्ट करायचे. मग आता हे का होत नाही? शहरात ‘हम दो हमारे एक’ अशा घरातही पती-पत्नीमध्ये वितुष्ट का यावे? कुटुंब का तुटते? लोकांना यातून सावरायला हवे. पण काही करायचे, तर कोरोना काळात घराबाहेर पडणे शक्य नव्हते. तसेच, या काळात लोक व्यक्त होण्यासाठी, शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी ऑनलाईन तंत्राचा वापर करू लागली होती. आपणही भारतीय संस्कृतीवर आधारित ऑनलाईन अभ्यासक्रम आयोजित करावा, या ध्येयाने प्रेरीत होऊन मग स्वातीयांनी अभ्यासक्रम सुरू केले. तंत्रज्ञान ते संस्कृती ते भारतीय समाज एकता हा स्वाती यांचा वैचारीक आणि कार्यप्रवणतेचा प्रवास महत्त्वाचा आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल स्वाती यांना इतका विश्वास असण्यालाही संस्कारच कारणीभूत आहेत.
इंदुलकर कुटुंब मुळचे राजापूरचे, नेर्लेतिरवाड गावचे. कामानिमित्त मुंबई वरळीत स्थाईक झालेले. चंद्रकांत इंदुलकर आणि विजया या दाम्पत्याला चार अपत्ये. त्यापैकी एक स्वाती. चंद्रकांत ठाणे महानगरपालिकेत क्लार्क, तर विजयाबाई शाळेत आणि बँकेत दोन ठिकाणी काम करत. दोघांचे जगणे साधे आणि कष्टमय मात्र नितीसंपन्न. इंदुलकर यांच्या घरी पती-पत्नी चार अपत्ये. त्याशिवाय स्वाती यांचे आजी आजोबा आणि आजीच्या दोन बालविधवा बहिणी. तसेच, गावातून मुंबईत शिकायला आलेले होतकरू विद्यार्थी नातेवाईकही असत. त्यांचे शिक्षण आणि अगदी लग्नकार्येही इंदुलकर कुटुंबच करत असत. नाही म्हटले तरी १५ जण या कुटुंबात असतच असत. या संयुक्त कुटुंबातील व्यक्तिंचे एकमेकांना जपणे, शिकवणे, तडतोड करणे, एकत्रित सुख दुःख सहन करणे हे सगळे स्वाती यांनी अनुभवले होते. या सगळ्या कुटुंबाला वेळेवर दोन घास मिळावेत म्हणून आईबाबांची चाललेली तारेवरची कसरत स्वाती यांनी पाहिली होती. त्यातून कुटुंबाचे यशस्वी उत्थानही त्यांनी पहिले. हेच संस्कारी जगणे स्वाती यांना प्रेरणा देऊन गेले. स्वाती म्हणतात, संस्कार भारतीच्या माध्यमातून रा.स्व.संघाचे प्रचारक आणि इतर अनेक मान्यवरांचे निरलस पण अमुल्य कार्य पाहून मला धर्म, समाज आणि देशासाठी कार्य करण्याचे बळ मिळते. यापुढेही मला संस्कृती संस्काराच्या माध्यमातून देश आणि समाजासाठी काम करायचे आहे. स्वाती यांचे म्हणणे ऐकून वाटते स्वाती नक्षत्रात मोती निर्माण होतात असे म्हणतात. तसेच, स्वाती यांच्या कार्याने समाजात सस्ंकाराचे संस्कृतीचे अमुल्य मोती दिप्तीमान होत आहेत.