काँग्रेस पक्षास बहुमत मिळेल, असा विश्वास हरीश रावत यांनी व्यक्त केला होता. त्यावर पुष्करसिंह धामी यांनी, “रावत हे दिवसा सत्तेची स्वप्ने पाहात आहेत. हरीश रावत हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहात आहेत,” असे जे धामी यांनी म्हटले होते, ते प्रत्यक्षात खरे ठरले आहे.
दि. ७ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची अखेरची फेरी संपली आणि विविध वाहिन्यांवरून मतदानोत्तर कौल जाहीर होऊ लागले. ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तराखंड या राज्याचाही मतदानोत्तर कौल जाहीर करण्यात आला. त्या मतदानोत्तर कौलानुसार ‘टाइम्स नाऊ’, ‘इंडिया टुडे -अॅक्सिस’ आणि ‘न्यूज २४-टुडेज चाणक्य’ यांनी उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळेल, असे म्हटले होते. त्यातील ‘टाइम्स नाऊ’ने ३७, ‘इंडिया टुडे- अॅक्सिस’ने ३६ ते ४६ आणि ‘न्यूज २४ - टुडेज चाणक्य’ने ३६ ते ५० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. गुरुवारी झालेली मतमोजणी लक्षात घेता त्यातील दोन अंदाज जवळ जवळ बरोबर ठरले, असे म्हणता येईल. पण, एक मतदानोत्तर कौल वगळता कोणीही उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सत्ता मिळेल, असे म्हटले नव्हते! प्रत्यक्षात चित्रही वेगळे दिसले. भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होईल, अशी भाकिते करणार्यांची पूर्ण निराशा झाली आणि भाजपने जोरदार मुसंडी मारून काँग्रेसला बरेच मागे टाकले! निर्विवाद बहुमतासाठी आवश्यक असलेला ३५चा आकडा ओलांडून भाजपने ४७ जागा जिंकल्या. या निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्याची स्वप्ने पाहत असलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावे लागत आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला दोन मोठे हादरे बसले. भाजपचे उमेदवार असलेले मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला, तर काँग्रेस सत्तेवर येईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला.
उत्तराखंडमध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी हरीश रावत यांनी स्वीकारली आहे, तर भाजप नेते पुष्करसिंह धामी यांनी, या निवडणुकीत पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला होता आणि त्याप्रमाणे घडलेही! गेल्या चार विधानसभा निवडणुकांच्या नंतर कोणत्याच पक्षाचे सलग दुसर्यांदा सरकार आले नव्हते. पण, पुष्करसिंह धामी यांनी हे म्हणणे फेटाळून लावले. भाजपला पुन्हा संधी देऊन उत्तराखंड इतिहास घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पुष्करसिंह धामी हे गेल्या २१ वर्षांतील ११वे मुख्यमंत्री. भारतीय जनता पक्षाने २०१७ पासून तीन मुख्यमंत्री बदलले. पण, या राजकीय बदलाचा राज्याच्या विकास कार्यक्रमांवर काहीही परिणाम होणार नाही, असे धामी याने स्पष्ट केले होते. “पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला संधी दिली. त्या संधीचा राज्याच्या विकासास गती देण्यासाठी मी पुरेपूर उपयोग करीन,” असे पुष्करसिंह धामी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
काँग्रेसचे नेते हरीश रावत यांना, राज्यात पुन्हा काँग्रेस निवडून येईल, असा विश्वास वाटत होता. आपल्या पक्षास विधानसभा निवडणुकीत ४८हून अधिक जागा मिळतील, असे त्यांनी म्हटले होते. पण, निकाल भलतेच लागले. भाजपला ४७ आणि काँग्रेसला फक्त १९ जागांवर समाधान मानावे लागले. आपल्या पक्षासच बहुमत मिळेल, अशा थाटात वावरत असलेल्या हरीश रावत यांनी, “सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्ष कोणाशीही आकसाने वागणार नाही, राज्याचे चित्र बदलण्यास आम्हाला वेळ लागेल. कोणाचा बदला घेण्यासाठी आम्ही सत्तेवर येत नाही. आम्हाला निवडणुकीत ४८ जागा मिळतील,” असे म्हटले होते. हरीश रावत यांचे हे वक्तव्य पाहता गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढू पाहणार्या नवरदेवासारखी त्यांची अवस्था झाली होती, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. हरीश रावत यांना पुष्करसिंह धामी यांनी तसेच उत्तर दिले होते. “मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येईल, त्याप्रमाणे त्यांची संख्या कमीकमी होत जाईल. त्यांच्या आनंदावर विरजण पडेल. प्रचंड बहुमताने भाजप सत्तेवर येईल,” असे धामी यांनी म्हटले होते.
गुरुवारी लागलेले निवडणुकांचे निकाल पाहाता धामी किती आत्मविश्वासाने बोलत होते, याची कल्पना येते. २०१७च्या निवडणुकीत भाजपला ५७ जागा मिळाल्या होत्या. पण, या निवडणुकीत तेवढी संख्या भाजपला गाठता आली नाही. पण, भाजपने केलेली विकासकामे, निवृत्त सैनिकांसाठी भाजप सरकारने केलेली कामे यामुळे निवृत्त सैनिक भाजपच्या मागे आहे, असे पुष्करसिंह धामी यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये माजी सैनिक मोठ्या संख्येने आहेत. धामी हे स्वतः सैनिकाचे पुत्र आहेत. “उत्तराखंडमधील फौजींना भाजपबद्दल आस्था आहे,” असे धामी यांनी म्हटले आहे.
“उत्तराखंडमध्ये जे भाजप सरकार सत्तेवर येणार आहे, त्या सरकारकडून भाजपने जी जी वचने मतदारांना दिली आहेत, त्यांची पूर्तता करण्यात येईल. त्यामध्ये समान नागरी संहितेचाही समावेश आहे,” असे धामी यांनी म्हटले आहे. “निवडणूक निकालानंतर देहरादूनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, प्रचारादरम्यान समान नागरी संहिता अस्तित्वात आणण्यात येईल,” असे आश्वासन पक्षाने दिले होते. त्याची पूर्तता केली जाईल, असे ते म्हणाले. “शपथविधीनंतर आपले सरकार एक उच्चस्तरीय समिती नेमेल आणि त्याचा मसुदा तयार करील,” अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले उत्तराखंडचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, “भाजपने सलग दुसर्यांदा राज्यात सत्ता मिळवून इतिहास घडविला,” असे सांगितले. “उत्तराखंडमध्ये सलग दुसर्यांदा कोणता पक्ष सत्तेवर आला नव्हता. पण, पुष्करसिंह धामी यांनी ते शक्य करून दाखविले. आम्ही हे दशक उत्तराखंडचे दशक आहे हे लक्षात ठेवून कार्य करू,” असे प्रल्हाद जोशी म्हणाले.
या निवडणुकीत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला होता. पण, काँग्रेसने हरीश रावत वा अन्य कोणत्या नेत्यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली नव्हती. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याचा निर्णय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी घेतील,असे हरीश रावत यांनी म्हटले होते. तसेच, काँग्रेस पक्षास बहुमत मिळेल, असा विश्वास हरीश रावत यांनी व्यक्त केला होता. त्यावर पुष्करसिंह धामी यांनी, “रावत हे दिवसा सत्तेची स्वप्ने पाहात आहेत. हरीश रावत हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहात आहेत,” असे जे धामी यांनी म्हटले होते, ते प्रत्यक्षात खरे ठरले आहे. हरीश रावत यांचा अशाप्रकारे स्वप्नभंग झाला आहे!