मंदिरांच्या माध्यमातून राष्ट्रदेवतेचे दर्शन

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    01-Mar-2022
Total Views | 92

mohan bhagwat
 
 
मुंबई : “अध्यात्मसाधनेसाठी तर मंदिरे आहेतच. परंतु, मंदिरे म्हणजे समाजजीवनाची केंद्रे होती,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. दीपा मंडलिक लिखित ’पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दादर येथील सावरकर स्मारकामध्ये हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. “सर्व संस्कृतींमध्ये केवळ भारतीय संस्कृतीच भौतिकतेच्या पलीकडे जाऊ शकली. मंदिरांमध्ये पाठशाळा चालतात. मंदिरांबरोबर अर्थव्यवस्था, कृषिक्षेत्र, व्यापार आदीचे संबंध जोडलेले असतात, म्हणून, पराक्रमी राजे भव्य मंदिरे निर्माण करीत असत. परंतु, असे असूनही, त्यांनी मंदिरांवर स्वतःचा अधिकार ठेवला नाही, तर ही मंदिरे समाजाला अर्पण केली,” असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले. डॉ. मोहनजी पुढे म्हणाले की, “मंदिरे ही समाजाच्या धारणेची साधने होती, मंदिरांकडे पाहून आपल्या पराक्रमाचा गौरव कळतो. त्यामुळेच मंदिरांचा इतिहास आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेला.” तिरुवनंतपुरम, कालहस्ती, सोमनाथ इ. ठिकाणच्या मंदिरांच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख डॉ भागवत यांनी केला. तसेच, ”दीपा मंडलिक लिखित या पुस्तकातून मंदिरांकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी असावी हे कळते,” असे ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर ’पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ या पुस्तकाच्या लेखिका दीपा मंडलिक, पुरातत्त्ववेत्ते व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ‘राजेंद्र प्रकाशन’च्या संचालिका नीलिमा कुळकर्णी उपस्थित होत्या, तर चित्रा वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
 
स्वा. सावरकर स्मारकामध्ये प्रस्तुत पुस्तक प्रकाशित होत असल्याने आनंद होत असल्याची भावना पुस्तकाच्या लेखिका दीपा मंडलिक यांनी व्यक्त केली. पद्मनाभ स्वामी मंदिर, बृहदीश्वराचे मंदिर, चेन्नकेशव मंदिर, वेरूळ येथील मंदिरे आदी अद्भुत रचना पाहिल्यावर त्यांच्या इतिहासाची माहिती देणारे पुस्तक लिहिण्याची गरज वाटल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांचे स्थापत्यशास्त्र अद्भुत आहे. परंतु, या सर्व गोष्टींना आपल्याकडे इतिहासात त्रोटक स्थान मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काळाच्या ओघातही आपली मूल्ये टिकवून ठेवली, असे त्यांनी नमूद केले.
 
पुरातत्त्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर म्हणाले की, “मंदिरे, मूर्ती, इ. ची निर्मिती करणार्‍या कलाकारांच्या बाबतीत आपल्याकडे मौन पाळले जाते. परंतु, मूर्ती-मंदिरे ही खरेतर भारतीय संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. या विषयांचा अभ्यास करणार्‍यांना ’सनातनी’ विचारांचे म्हटले जाते. ‘सनातन’ शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे असे बोलले जाते. ’सनातन’ म्हणजे खरेतर ’नित्यनूतन’ असल्याचे सांगत शब्द जपून वापरायला हवेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले. “ ’पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ हे पुस्तक दीपा मंडलिक यांनी अत्यंत बारकाव्यांसहित आणि अचूक लिहिले आहे, तसेच हे पुस्तक म्हणजे मंदिरावरील एक आदर्श पुस्तक आहे,” असे देगलूरकर यांनी सांगितले. “ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता, इ. ग्रंथांचा संदर्भ देत त्यांनी सगुणोपासनेचे महत्त्व विशद केले आणि मंदिरांचा अभ्यास करताना अध्यात्म कळायला हवे,” असा विचार मांडला. याप्रसंगी नीलिमा कुळकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.
 
नीलिमा कुळकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साहाय्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, पुस्तकाची सजावट, मुखपृष्ठ रचना, इ. पाहणारे सतीश कुळकर्णी, पुस्तकासाठी नकाशे तयार करणारे अनिश दाते, फोटोग्राफर नितीन चंदे, आदींचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121