नवी दिल्ली : कार-उत्पादक ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील कार्यलयाने जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ट्विटमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला गेला. शेअर मार्केटमध्येही यांचे शेअर तोंडावर आपटले. या सगळ्या घडलेल्या घटनेवर दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री यांना फोन केला आणि झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
भारत सरकारने ह्युंदाईच्या काश्मीरवरील वादग्रस्त वक्तव्यावर मंगळवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती . भारत सरकारने याबाबत दक्षिण कोरियाच्या राजदूताला प्रश्नही विचारले होते आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल आपली नाराजीही दर्शविली होती. सेऊलमधील भारतीय राजदूतानेही हाच संदेश दक्षिण कोरिया सरकारला दिला होता.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून कळविले की त्यांना दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांचा फोन आला आणि त्यांनी "ह्युंदाई प्रकरण" बद्दल चर्चा केली.जयशंकर यांनी ट्विट केले, “आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांचा कॉल आला. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर तसेच ह्युंदाई प्रकरणावरही त्यांनी चर्चा केली होती.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “आम्ही ह्युंदाई पाकिस्तानने तथाकथित काश्मीर एकता दिवसावर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट पाहिली होती. रविवार, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी या सोशल मीडिया पोस्टनंतर लगेच, सेऊलमधील आमच्या राजदूताने ह्युंदाई मुख्यालयाशी संपर्क साधला आणि स्पष्टीकरण मागितले. पोस्ट नंतर काढून टाकण्यात आली. कोरिया प्रजासत्ताकच्या राजदूताला परराष्ट्र मंत्रालयाने काल ७ फेब्रुवारी २०२२ रोजी बोलावले होते.”
“ह्युंदाई पाकिस्तानच्या अस्वीकार्य सोशल मीडिया पोस्टवर सरकारची तीव्र नाराजी त्यांना कळवण्यात आली. हे अधोरेखित करण्यात आले की ही बाब भारताच्या प्रादेशिक अखंडतेशी संबंधित आहे ज्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. या समस्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी कंपनीने योग्य ती कारवाई करावी अशी आम्हाला अपेक्षा होती,” बागची पुढे म्हणाले.
“दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी आज (मंगळवारी) सकाळी परराष्ट्र मंत्र्यांना फोन केला. त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना, दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील सांगितले की सोशल मीडिया पोस्टमुळे लोकांना आणि भारत सरकारला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद वाटतो,” 'ह्युंदाई मोटर्स'द्वारे भारतातील लोकांपर्यंत "खोल खेद" व्यक्त करणारे आणि राजकीय किंवा धार्मिक मुद्द्यांवर भाष्य करत नसल्याचे स्पष्ट करून एक निवेदन जारी करण्यात आले, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भारत विविध क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे स्वागत करतो. परंतु, ते म्हणाले, "अशा कंपन्या किंवा त्यांचे सहयोगी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या बाबतीत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या टिप्पण्यांपासून परावृत्त होतील अशी अपेक्षा आहे."
५ फेब्रुवारी रोजी, ह्युंदाई पाकिस्तान ऑफिशियल नावाच्या हँडलने एक ट्विट पाठवले ज्यामध्ये काश्मीरमधील लोकांच्या "बलिदानांचे स्मरण" करण्याचे आवाहन केले गेले आणि हे लोक "स्वातंत्र्यासाठी संघर्ष" सुरू ठेवत असताना लोकांना समर्थनासाठी उभे राहण्यास सांगितले. हीच पोस्ट फेसबुकवरही शेअर केली होती.केंद्रशासित प्रदेशातील फुटीरतावादी चळवळीला आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाकिस्तान ५ फेब्रुवारी हा ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून पाळतो.
या आठवड्याच्या सुरुवातीला, ह्युंदाई इंडियानंतर, तिची मूळ कंपनी ह्युंदाई मोटर्स यांनी मंगळवारी एक निवेदन जारी केले आहे की ते "कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील राजकीय किंवा धार्मिक समस्यांवर" भाष्य करत नाही आणि भारतीयांना झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल आणि घडलेल्या चुकीबद्दल " आम्ही खूप खेद व्यक्त करतो".