भारतच सहस्रेषु!

    07-Feb-2022
Total Views |

India's 1000th ODI match
 
 
 
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरूद्ध एक हजारावा एकदिवसीय सामना खेळल्याने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. क्रिकेटविश्वात एक हजारावा एकदिवसीय सामना खेळणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. एक हजार सामने खेळणे हे क्रिकेटविश्वात आतापर्यंत केवळ भारतालाच शक्य झाले आहे. हे केवळ भारतालाच का जमले, याचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे क्रिकेट वर्तुळातील सर्वात श्रीमंत ‘क्रिकेट बोर्ड’ म्हणून ओळखले जाते. सर्वात श्रीमंत ‘क्रिकेट बोर्ड’ म्हणून ख्याती असली तरी अचूक ‘टायमिंग’ साधत ‘लीग’ स्पर्धा, विविध देशांसोबत मालिका, दौरे तसेच अन्य महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात ‘बीसीसीआय’ हे इतर सर्व बोर्डापेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहिले आहे. ‘बीसीसीआय’कडून आयोजित ‘लीग’ स्पर्धा, मालिका, दौरे तसेच अन्य महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा या सर्व आतापर्यंत फायद्यामध्ये असल्याचा इतिहास आहे. ‘बीसीसीआय’चे नियोजन याबाबतीत कधीच चुकल्याचे ऐकिवात नाही. दोन देशांमधील संबंध बिघडल्याचा परिणाम अनेकदा खेळावरही होत असतो. यादरम्यान मालिका, दौरे आणि इतर महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांचे करार रद्द होतात किंवा संपुष्टात येतात. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान क्रिकेट मंडळांना सहन करावे लागते. परिणामी, मंडळांची आर्थिक स्थिती ढासळते. आर्थिक चणचणीमुळे इतर स्पर्धांचे आयोजन करणे मंडळांना शक्य होत नाही. मालिका, दौरे तसेच महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होत नसल्याने सामने खेळले जात नाहीत. परिणामी, त्यांची संख्या घटते. परंतु, अशा परिस्थितीतही त्याजागी इतर पर्याय शोधून ती पोकळी भरून काढण्याचे कौशल्य ‘बीसीसीआय’कडे आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान जवळपास गेल्या नऊ वर्षांपासून मालिकांचे आयोजन करण्यात आलेले नाही. परंतु, त्याजागी इतर देशांसोबत महत्त्वाच्या मालिका आणि दौर्‍यांचे आयोजन करत भारताने आपले क्रिकेट खेळणे सुरुच ठेवले. केवळ पाकिस्तानविरूद्धच नाही, तर जेथे अडचणी आल्या त्या सर्व अडचणींवर मात करत भारत पुढे जात राहिला. त्याचे फलित आज भारतच केवळ एक हजार एकदिवसीय सामने खेळणारा पहिला देश ठरला आहे.
 
 
 
...तर नवल वाटू नये
 
क्रिकेटविश्वात एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार सामने खेळण्याच्या विक्रमाची नोंद करणे केवळ भारतालाच शक्य झाले. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारताने एक हजारांपैकी ५१९ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे, तर ४३१ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याची नोंद असून नऊ सामने हे बरोबरीत (टाय) सुटले आहेत, तर ४१ सामने हे अनिर्णित राहिले असून सामने जिंकण्याचे प्रमाण भारताचे ५३.५८ टक्के इतके आहे, तर भारतानंतर ऑस्ट्रेलिया या क्रमवारीत दुसर्‍या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत जवळपास ९५८ सामने खेळल्याची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाने ९५८ पैकी ५८१ सामने जिंकले असून ३३४ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागल्याची नोंद आहे, तर ऑस्ट्रेलियाचेही नऊ सामने बरोबरीत सुटले असून ३४ सामने अनिर्णित राहिले आहेत. सामने जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रमाण हे ६३.३६ टक्के इतके आहे. ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तानने आतापर्यंत ९३६, श्रीलंकेने ८७०, वेस्ट इंडिजने ८३५, न्यूझीलंडने ७७५, इंग्लडने ७६१, दक्षिण आफ्रिकेने ६३८, झिम्बॉब्वेने ५४१ आणि बांगलादेशने ३८८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्याची नोंद आहे. सर्वाधिक सामने खेळण्यात भारतापासून इतर देश आकडेवारीत बरेच दूर असल्याचे पाहायला मिळते. आकडेवारीतील फरक पाहता, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला एक हजारावा सामना खेळण्यासाठी जवळपास किमान आणखीन दोन वर्षांचा तरी अवधी लागणार असल्याचे मत क्रिकेट समीक्षक नोंदवतात. विशेष म्हणजे, क्रिकेट खेळण्याची सुरुवात पाश्चिमात्त्य देशांकडून झाली. दि. ५ जानेवारी, १९७१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. भारताने दि. १३ जुलै, १९७४ रोजी इंग्लंडविरूद्ध ‘लीड्स’ येथे आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. उशिराने सुरुवात करूनही भारत आज सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्यामध्ये अव्वल आहे. आगामी काळात सामने जिंकण्याच्या प्रमाणामध्येही भारत ऑस्ट्रेलियाच्या पुढे असेल, अशी शक्यता क्रिकेट समीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारताची वाटचाल पाहता, असे झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही, हे देखील सांगण्यास समीक्षक विसरलेले नाहीत.
 
 
- रामचंद्र नाईक