ठाणे: गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. कित्येक दशके भारतीयांच्या मनावर राज्य करणारा आवाज हरपला अशीच भावना सर्वच क्षेत्रांतून व्यक्त होते आहे. ठाण्यातील चित्रकार सुमन दाभोलकर त्यांनी स्टोन आर्ट चितारून लता दीदींना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. अखंड दगडात जिवंत वाटावे असे हुबेहूब चित्र सुमन यांनी चितारले आहे. या अनोख्या पद्धतीने त्यांनी लता दीदींसारख्या महान कलाकाराला अभिवादन केले आहे.
मूळचे कणकवलीचे असलेले दाखोलकर नदीत सापडणाऱ्या निरनिराळ्या आकाराच्या दगडांवर चित्र रेखाटतात, त्यांची चित्रं बघितली की त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तींच्या सजीवपणाचा भास होतो. एका दिवसात अश्या प्रकारे चित्र रेखाटणे आव्हानच होते पण त्यांनी ते पेलून दिवसभरात लता दीदींवरील ही कलाकृती पूर्ण केली. याआधी सुमन यांनी, छत्रपती शिवाजी महाराज , पंतप्रधान नरेंद्र मोदी , बिग बी अमिताभ बच्चन, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम,महात्मा जोतिबा फुले अशा अनेक मान्यवरांची स्टोन आर्ट साकारली आहेत. सर्वाधिक स्टोन आर्टस् साकल्याबद्दल सुमन दाभोलकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद करण्यात आली आहे.