बायडन, मिशॅम आणि अमेरिकेचा आत्मा

Total Views |

बायडन आणि मिशॅम  
 
२०१८ साली ‘रॅन्डम हाऊस’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक ‘न्यूयार्क टाईम्स’च्या सर्वाधिक खपाच्या यादीत अग्रक्रमांकावर होतं. २०२० साली त्या पुस्तकावर एक अनुबोधपट निघाला, तो अजूनही पाहिला जात असतो. जसे बायडन यांना हे पुस्तक इतकं आवडलं की, त्यांनी जॉन मिशॅम यांना आपल्या सल्लागार समितीत घेतलं आहे. 
 
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलीकडेच एक पुस्तक वाचलं. त्याचं नाव आहे - ‘दि सोल ऑफ अमेरिका.’ खरं तर एवढं नाव ठेवून भागलं असतं. पण, गेली काही वर्ष अमेरिकन साहित्यसृष्टीत अशी फॅशन आहे की, पुस्तकाला एक मुख्य नाव आणि आणखी एक उपमथळा द्यायचाच. त्यानुसार या पुस्तकाचा उपमथळा आहे, ‘दि बॅटल फॉर अवर बेटर एंजल्स.’ जॉन मिशॅम या इतिहासाच्या प्राध्यापकाने या पुस्तकात अमेरिकन राष्ट्राच्या प्रारंभापासून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंतच्या काळाचा इतिहास त्यात ग्रथित केला आहे.
 
आता तुम्ही म्हणाल, यात विशेष काय आहे? अशी आत्तापर्यंत शेकडो पुस्तकं निघालेली आहेत. यात ट्रम्प यांच्या कारकिर्दीपर्यंत म्हणजे अगदी अद्ययावत इतिहास आहे, एवढंच!
 
नव्हे, एवढंच नव्हे. या ताज्या पुस्तकात नुसताच राजकीय आणि राज्यक्रांती, यादवी अशा युद्धांचा इतिहास नसून सामाजिक इतिहास जास्त प्रमाणात आहे. त्यात अमेरिकन राष्ट्रातले विविध वांशिक गट, त्यांचे संघर्ष, नागरी अधिकार, जगभरातून येणारे स्थलांतरित, महिला आणि त्यांच्या समान हक्कांच्या चळवळी, कू-क्लक्स-क्लॅन उर्फ ‘के.के. के.’ या नावाची एक दहशतवादी चळवळ, साम्यवादाचं आव्हान आणि या सर्व घटनांमधून अमेरिकन लोकशाही व्यवस्थेसमोर वेळोवेळी उभी टाकलेली अंतर्गत आणि बाह्य आव्हानं यांचा विस्तृत आढावा लेखकाने घेतलेला आहे.
 
२०१८ साली ‘रॅन्डम हाऊस’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक ‘न्यूयार्क टाईम्स’च्या सर्वाधिक खपाच्या यादीत अग्रक्रमांकावर होतं. 2020 साली त्या पुस्तकावर एक अनुबोधपट निघाला, तो अजूनही पाहिला जात असतो. जसे बायडन यांना हे पुस्तक इतकं आवडलं की, त्यांनी जॉन मिशॅम यांना आपल्या सल्लागार समितीत घेतलं आहे.
 
पुस्तकात लेखकाने मांडलेला इतिहास योग्य आहे किंवा नाही, तसंच जो बायडन यांची एकंदर धोरणं योग्य आहेत वा नाहीत, हा स्वतंत्र विषय आहे. परंतु, एका इतिहास अभ्यासकाला राष्ट्राध्यक्षाने आपल्या सल्लगार समितीत घेणं हा एक चांगला निर्णय आहे. राष्ट्रध्यक्ष म्हणजेच शासन इतिहासापासून काही धडा घेऊ पाहात आहे, हे चांगलं लक्षण आहे. अर्थात, अमेरिकेत हे पहिलंच उदाहरण आहे असं नव्हे. २००८ साली बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी जोनाथन आल्टर या लेखकांचं ‘दि डिफाइनिंग मोमेंट’ हे पुस्तक वाचलं होतं आणि ते भलतेच प्रभावित झाले होते. १९३३ साली फर्डिनंड रुझवेल्ट हे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा जगभर आर्थिक मंदी होती. रुझवेल्ट यांनी ‘न्यू डील’ नावाचं नवं आर्थिक धोरण आखलं आणि आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी दमदार पावलं टाकली होती. तो सगळा इतिहास जोनाथन आल्टर यांनी मांडला होता. ते पुस्तक वाचून प्रभावित झालेल्या ओबामांनी तशीच दमदार आर्थिक धोरणं आखण्याचा प्रयत्न केला. कारण,२००८ साली पुन्हा एकदा आर्थिक मंदीचं सावट घेऊन आले होते. ओबामा बर्‍यापैकी यशस्वी झाले, असं म्हणता येईल. किमान त्यांनी अगोदरच्या धोरणातल्या चुका टाळण्याचा तरी तरी नक्कीच प्रयत्न केला.
 
बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना आग्नेय युरोपमधल्या युगोस्लाव्हिया, बोस्निया, हर्जेगोविना, सर्बिया वगैरे छोट्या-छोट्या राष्ट्रांमध्ये एकदम प्रचंड यादवी युद्धं पेटली. जगात इतरत्र मुसलमान अतिरेकी निरपराध ख्रिश्चन, ज्यू, हिंदू सर्वसामान्यांची वांशिक कत्तल उडवत असताना, बोस्नियात तेच भाग्य सर्वसामान्य मुसलमानांच्या नशिबी आलं होतं. कुणाला समजेना की, या बाल्कन राष्ट्रांची समस्या मुळात आहे तरी काय?त्यावेळी बिल क्लिंटनना कुणीतरी सुचवलं की, रॉबर्ट कापलान या लेखकाचं ’दि बाल्कन घोस्टस्’ हे पुस्तक वाचा. क्लिंटन ते पुस्तक वाचून इतके खूश झाले की, त्यांच्या शिफारसीने अमेरिकन परराष्ट्र खात्यातल्या अनेक उच्चपदस्थांनी ते वाचलं. तेव्हा बाल्कन राष्ट्रांमधल्या हाडवैराच्या तीव्रतेची त्यांना जाणीव झाली. या परंपरेमध्ये सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे ‘दि गन्स ऑफ ऑगस्ट’. राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी हे पुस्तक वाचलं म्हणून तिसरं महायुद्ध टळलं, असं म्हटलं जातं. त्यात खूपच तथ्य आहे. म्हणजे काय?
 
आपल्याला वेस्ट इंडीज बेटं माहितीच आहेत. जमैका भाषण पोर्ट ऑफ स्पेनच्या उत्तरेला क्यूबा नावाचा चिमुकला बेट किंवा देश आहे. क्यूबाच्या उत्तरेला फक्त ७८० किमीवरअमेरिकेच्या फ्लेरिडा या प्रातांचं शेवटचं टोक आहे. मध्ये मेक्सिकोचं आखात किंवा असंसुद्धा म्हणता येईल की, अमेरिकेच्या अगदी दक्षिणेकडच्या फ्लोरिडा या सर्वात श्रीमंत प्रांताच्या अंगणातल्या समुद्रात क्यूबा हे एक चिमुकलं बेट आहे. तर या चिमुकल्या बेटात फिडेल कॅस्ट्रो, अर्नेस्टो चे गव्हेरा वगैरे साम्यवादी युवकांनी राज्यक्रांती घडवून आणली आणि सत्ता हडपली. १९५९ साली फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचा पंतप्रधान झाला. साम्यवादाची कट्टर विरोधक असलेल्या अमेरिकेच्या अंगणात चक्क साम्यवादी राजवट मिरवू लागली. खरं म्हणजे अमेरिकेच्या प्रचंड नाविक सामर्थ्यासमोर क्यूबा गवताची काडीसुद्धानव्हती. पण, साम्यवाद्यांच्या जन्मजात उर्मट स्वभावानुसार कॅस्ट्रो अमेरिकेला आव्हान वगैरे देण्याची भाषा करू लागला. हे म्हणजे झुरळाने डायनासोरला मल्लयुद्धाचं आव्हान देण्यासारखंच होतं. पण, या झुरळाच्या पाठीशी दुसरा एक महाकाय डायनासोर उभा होता - सोव्हिएत रशिया. त्याच्या जीवावर याच्या वल्गना सुरू होत्या. १९६२ साली सोव्हिएत रशियाने क्यूबाच्या भूमीवर क्षेपणास्त्रांचे तळ उभारायला सुरुवात केली. हे म्हणजे फारच झालं. अमेरिकन सेनाश्रेष्ठी संतापले. त्यानी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांना अशा आशयाची विनंती केली की, ‘तुम्ही फक्त इशारा करा. क्षेपणास्त्रांसकट अख्ख्या क्यूबालाच अटलांटिक समुद्राच्या तळाशी पाठवून देतो आणि त्याची ही पाठराखण करायला सोव्हिएत रशिया धावला, तर त्यालाही पाहून घेऊ.’ ही सगळी लक्षणं तिसर्‍या महायुद्धाची होती.
 
जॉन केनेडी जानेवारी १९६१ मध्ये राष्ट्राध्यक्षपदावर आलेले होते. त्यांच्यासमोर एक फार मोठं संकट उभं होतं. योग्य तोच निर्णय घ्यायला हवा होता. कारण, प्रश्न केवळ अमेरिकेचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा किंबहुना संपूर्ण मानवजातीचा भवितव्याचा होता. क्युबावरून जर युद्ध पेटलं, तर त्याला तिसर्‍या महायुद्धाचं स्वरूप येणार; आणि अमेरिका गट नि सोव्हिएत गट अण्वस्त्रांनी एकमेकांची राखरांगोळी करताना संपूर्ण जग त्या वणव्यात खाक होणार, हे नक्की होतं.
 
अशा स्थितीत जॉन कॅनेडींच्या हाती बार्बारा टकमन या विदुषीने लिहिलेला पहिल्या महायुद्धावरचा ग्रंथ पडला. त्याचं नाव होतं ‘गन्स ऑफ ऑगस्ट.’ दि. २८ जुलै, १९१४ या दिवशी ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याने सर्बिया या देशाविरूद्ध युद्धाची घोषणा केली. जुलै महिन्याचे शेवटचे चार दिवस आणि ऑगस्टचा पहिला आठवडा या काळात संपूर्ण युरोपात अत्यंत गतिमान हालचाली होऊन प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. ऑस्ट्रिया-हंगेरीचे मित्र देश आणि सर्बियाचे मित्र देश यांनी आपापल्या मित्र देशाच्या बाजूने युद्ध घोषणा केली आणि तोफांचा प्रचंड धडधडाट सुरू झाला. म्हणून ‘गन्स ऑफ ऑगस्ट.’ अशा प्रकारे ऑगस्ट १९१४ पासून घमासान युद्धाला तोंड लागलं आणि ते चार वर्षांनी जगभरच्या किमान दोन कोटी लोकांचा बळी घेऊन थांबलं. इसवी सनाच्या २०व्या शतकाच्या सुरुवातीलाच झालेल्या या भीषण संहारक युद्धाने जगाची सगळी ओळखच बदलून टाकली.
 
बार्बास टकसन या विदुषीचं म्हणणं असं की, राजनैतिक मुत्सद्देगिरीने हे युद्ध टाळता आलं असतं. साधारणपणे इतिहासकार जर्मनीचा सम्राट विल्हेल्म कैसर याला दोषी ठरवतात. पण बार्बारा म्हणते की, कैसरसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत दोलायमान मनःस्थितीतहोता. फ्रान्स, ब्रिटन, रशिया या सर्वांनीच थोडं धीराने, मुत्सद्देगिरीने कैसरला चुचकारुन घ्यायला हवं होतं. पण, जर्मनीसकट सर्वच युरोपीय देशांच्या प्रमुखांना आपल्या अतिरेकी राष्ट्रवादाचा इतका अंहकार झाला होता की, जुन्या सरंजामशाही काळाप्रमाणे ‘श्रेष्ठ कोण’ या प्रश्नाचा निकाल रणांगणावरच लावावा असं त्यांना वाटलं. यामुळे हा प्रश्न राजनैतिक मुत्सद्यांच्या कक्षेतून निसटला आणि सेनापतींच्या कक्षेत जाऊन पडला. ते तर युद्धासाठी उत्सुकच होते. हे युद्ध १७व्या शतकातल्यासारखं मर्यादित राहाणार नसून, सर्वंकष व्यापक होणार याची कल्पना जर्मन सरसेनापती जनरल मोल्टके याला युद्धाच्या पहिल्या काही महिन्यांतच आली. पण, तोपर्यंत थांबण्याची वेळ निघून गेली होती. मोल्टके सरळ निवृत्त झाला. त्यामुळे काहीही फरक पडला नाही. भीषण विद्ध्वंस होतच राहिला.
 
जॉन केनेडी स्वतः दुसर्‍या महायुद्धात अमेरिकन नौदलात लेफ्टनंटच्या पदावर होते. पॅसिफिक महासागरातल्या जपानी आणि अमेरिकन नौदलाच्या लढाया त्यांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यात बार्बारा टकमनच्या प्रतिपादनाने प्रभावित होऊन त्यांनी क्यूबा युद्ध टाळण्याचे अथक प्रयत्न केले. जगाच्या सुदैवाने सोव्हिएत अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. क्यूबाच्या भूमीवरुन रशियन क्षेपणास्त्रं हटवण्यात आली.
 
....आणि जगभरच्या शहाण्या-जाणत्या माणसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.