‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’बद्दल छापलेल्या खोट्यारड्या लेखांवरून ‘द वायर’च्या ‘लायर’पणावर शिक्कामोर्तब केलेय ते तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने! निर्लज्जपणाचा आणि खोटारडेपणाचा कळस गाठणार्या पत्रकारितेबद्दल ‘द वायर’ला तेलंगणमधील जिल्हा न्यायालयाने केवळ लाथाडलेच नाही, तर तिची औकात दाखवून देत खोटारडे लेख हटवण्याचे निर्देशही दिले.
खोटे बोलणे, वारंवार खोटे बोलणे...
सकाळी खोटे बोलणे, दुपारी खोटे बोलणे, संध्याकाळी खोटे बोलणे...
खोटे लिहिणे, वारंवार खोटे लिहिणे...
सकाळी खोटे लिहिणे, दुपारी खोटे लिहिणे, संध्याकाळी खोटे लिहिणे...
इतके खोटे बोलणे, इतके खोटे लिहिणे की,
खोटारड्यांच्या नसानसांतही खोटे आणि खोट्याचेच वाहणे...!
डाव्या गोटात पसंत केल्या जाणार्या ‘द वायर’ची वस्तुस्थिती याहून निराळ्या शब्दांत मांडता येणार नाही. मात्र, हे आमचे म्हणणे नाही, तर ‘द वायर’च्या ‘लायर’पणावर शिक्कामोर्तब केलेय ते तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने! निर्लज्जपणाचा आणि खोटारडेपणाचा कळस गाठणार्या पत्रकारितेबद्दल ‘द वायर’ला तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने केवळ लाथाडलेच नाही, तर तिची औकात दाखवून देत खोटारडे लेख हटवण्याचे निर्देशही दिले. हैदराबादस्थित ‘भारत बायोटेक’ने ‘द वायर’, ‘फाऊंडेशन फॉर इंडिपेन्डन्ट जर्नालिझम’, प्रकाशक आणि संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ रोशनलाल भाटिया, एम. के. वेणु यांच्यासह नीता संघी, वसुदेव मुकुंठ, शोभना सक्सेना, फ्लोरेन्सिया कोस्टा, प्रेम आनंद मुरुगन, बंजोत कौर, प्रियंका पुल्ला, सेराज अली आणि जम्मी नागराज राव यांच्यावर १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला होता. कारण, ‘द वायर’ने भारतात कोरोना महामारीने धुमाकूळ घातलेला असताना ‘भारत बायोटेक’ आणि ‘कोव्हॅक्सिन’च्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे लेख लिहिले, प्रकाशित केले. इतकेच नव्हे, तर ‘भारत बायोटेक’ व ‘कोव्हॅक्सिन’वर खोटारडे आरोप करत जनतेच्या मनात लसीबद्दल घबराट आणि असंतोषाला जन्माला घालण्याचे प्रयत्न केले. खरे म्हणजे, त्याआधी ‘भारत बायोटेक’ने क्षयरोग, झिका विषाणू, चिकनगुनिया आणि टायफॉईडप्रतिबंधक लस विकसित केली होती. त्या लसींना जागतिक मान्यता प्राप्त करुन घेत ‘भारत बायोटेक’ने जागतिक पटलावरही भारताची कीर्ती वाढवली होती. सोबतच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर जनतेला वाचवण्यासाठी ‘भारत बायोटेक’ने सरकारच्या प्रमुख संस्थांबरोबर सहकार्यदेखील केले होते. कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीचे कामही ‘भारत बायोटेक’नेच केले होते. ‘भारत बायोटेक’ची ‘कोव्हॅक्सिन’ देशाची पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस होती. पण, ‘द वायर’ला ते पाहवले नाही आणि या माध्यमाने त्याविरोधात प्रचार चालवला. तथ्यांची तपासणी न करता लसीच्या प्राधिकार आणि अनुमोदनावर खोटेनाटे आरोप लावत अनेक लेख लिहिले. परिणामी, जनतेच्या मनात लसीबद्दल संशय, भीती निर्माण झाली, त्यातून अनेकांनी लसीकरणाला नकार दिला. त्यावरुनच तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने ‘द वायर’च्या एकूणच कार्यशैलीबद्दल मतप्रदर्शन केले.
भारत सरकारने ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला मंजुरी दिल्यानंतरही ‘द वायर’ने त्याविरोधातील लेख लिहिल्याचे, प्रकाशित केल्याचे सांगतानाच १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीनांच्या लसनिर्मितीसाठी ‘भारत बायोटेक’ला अधिकृत केलेले आहे. पण, ‘द वायर’च्या संकेतस्थळावर प्रकाशित होणार्या बदनामीकारक आणि लांच्छनास्पद लेखांमुळे लोक लसमात्रा घेण्याबाबत कानकूच करु शकतात, असे तेलंगणाच्या जिल्हा न्यायालयाने म्हटले. म्हणूनच न्यायालयाने ४८ तासांच्या आत ‘द वायर’च्या संकेतस्थळावरील लेख हटवण्याचे निर्देश दिले. तसेच ‘द वायर’ला ‘भारत बायोटेक’ व ‘कोव्हॅक्सिन’बद्दल मानहानिकारक लेख प्रकाशित करण्यावर निर्बंध घातले. तथापि, ‘गिरे तो भी टांग ऊपर’ छाप स्वभाव असलेल्या सिद्धार्थ वरदराजन यांनी न्यायालयाच्या निकालानंतरही चूक मान्य केली नाही वा माफीही मागितली नाही. “एका वर्षभरात प्रकाशित १४ लेखांना एका स्थानिक न्यायालयाने ‘द वायर’ला कोणत्याही नोटिसीशिवाय हटवण्याचे निर्देश दिले. ‘भारत बायोटेक’ने आमच्याविरोधात केलेल्या खोटारड्या दाव्यांचे खंडन करण्याची आम्हाला कोणतीही संधी दिली नाही. ‘भारत बायोटेक’च्या बदमाशपणाला यश येणार नाही,” अशा भाषेत सिद्धार्थ वरदराजन यांनी ट्विट केले. मात्र, बदमाशपणा ‘भारत बायोटेक’ने नव्हे, तर ‘द वायर’नेच केला होता. ‘द वायर’ने वेल्लोरस्थित ‘ख्रिश्चन मेडिकल कॉलेज’च्या ‘गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल सायन्सेस’ विभागाचे प्राध्यापक गगनदीप कांग यांच्या साथीने ‘कोव्हॅक्सिन’ला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे निर्माण होणार्या प्रतिरक्षा प्रतिक्रियेविषयीचा कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे ‘द वायर’ने म्हटले. तथापि, ‘भारत बायोटेक’ने ‘द वायर’ आणि प्राध्यापक गगनदीप कांग यांचा दावा खोडून काढला. ‘कोव्हॅक्सिन’ची प्रतिरक्षा प्रतिक्रिया अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाली असून नियामक अधिकार्यांसमोरही सादर केलेली आहे, असे ‘भारत बायोटेक’ने सांगितले होते. पण, ‘द वायर’ने त्याकडे लक्षच दिले नव्हते. कारण, ‘भारत बायोटेक’ने भारत सरकारकडून ‘कोव्हॅक्सिन’ लसनिर्मिती व लसवापराचे अधिकार मिळवले तेव्हापासून दिग्गज अमेरिकन औषधनिर्माण कंपन्यांच्यावतीने ‘न्यूयॉर्क टाईम्स’, ‘ब्लूमबर्ग’, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘रॉयटर्स’सारख्या बड्या परकीय माध्यमसंस्थांनी विरोधी मोहीम सुरु केली, बदनामी केली आणि ‘द वायर’देखील त्या माध्यमसंस्थांचे देशी स्वरुप आहे.
समाज आणि शासनाला आरसा दाखवणे पत्रकारितेचे कर्तव्यकर्म असून लोकशाहीचा चौथा स्तंभही म्हटले जाते. पत्रकारितेमध्ये सत्य आणि सदाचाराची आवश्यकता असते. पण तत्काळ यशाच्या हावरटपणातून निवडक लोक पत्रकारितेचे रुपांतर चाटुगिरीत, बेशरमपणात करतात. असे लोक पत्रकारितेचा वापर देशाचे तुकडे तुकडे करण्यासाठी, देशात अराजक पसरवण्यासाठी, जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्यासाठी जनतेमध्ये घबराट पसरवण्यासाठी करतात. अर्थातच, या सगळ्यासाठी ही मंडळी परदेशात बसलेल्या आपल्या मालकांकडून रग्गड पैसा मिळवतात, पद-सन्मान-पुरस्कार मिळवतात, रंगेबेरंगी पेयांच्या पार्ट्या ‘एन्जॉय’ करतात. ‘द वायर’ची पत्रकारिता अशीच आहे, म्हणूनच त्यांनी ‘भारत बायोटेक’ आणि ‘कोव्हॅक्सिन’विरोधी खोटे पसरवण्याचा डाव आखला. खरे म्हणजे ‘द वायर’चे शत्रुत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपशी आहे. सोबतच पाश्चात्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय असल्याने कोरोनाप्रतिबंधक लसीची निर्मिती भारत नव्हे तर अमेरिका वा युरोपसारख्या ‘श्रेष्ठ’ प्रदेशांतच होऊ शकते, यावर त्यांची श्रद्धा होती. पण, ते काम भारताने, ‘भारत बायोटेक’ने केले आणि ते ‘द वायर’ला पचले नाही. भारताने इतक्या कमी कालावधीत कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती कशी केली? आपल्या नागरिकांना लसमात्रा कशा दिल्या? एक लसशक्ती म्हणून ओळख कशी मिळवली? हा विचार करुनच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यांनी ‘भारत बायोटेक’ व ‘कोव्हॅक्सिन’विरोधात आघाडी उघडली, त्यावरुन जनतेची दिशाभूल सुरु केली. पण, ‘द वायर’ला त्यांच्या या कुकृत्यासाठी लेख हटवण्याची शिक्षा पुरेशी ठरणार नाही, तर त्यांच्यासारख्या कुजक्यांपासून जनतेनेही अंतर राखल्यास उत्तम...