ठाणे : ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व माध्यम सल्लागार मकरंद मुळे यांना यंदाचा 'ठाणे गुणीजन' पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी मुळे यांना गडकरी रंगायतन येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. राजकिय विश्लेषक असलेले मकरंद मुळे यांनी मुंबई तरुण भारतचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले असून विश्वसंवाद केंद्राचे समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. विविध चळवळींचे अभ्यासक व माध्यम सल्लागार म्हणून ते काम पाहात आहेत. संवाद माध्यम सेवेचे संपादकीय काम व साप्ताहिक 'विवेक'चे सहसंपादक पदही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले आहे. अनेक वृत्तवाहिन्यांच्या चर्चेत सहभाग, दिवाळी अंकांचे संपादन व आकाशवाणी मुंबईकरिता त्यांनी विपुल लिखाण व मुलाखती घेतल्या आहेत.