भारतात दोन तरुणांनी ‘मोमो’ या नेपाळी खाद्यपदार्थास आपलंसं केलं आणि स्वत:चं ‘मोमो’ साम्राज्यच उभारलं. निव्वळ ३० हजार रुपयांनी ‘मोमोज्’च्या स्टॉलची सुरुवात केली आणि या नेपाळी खाद्यपदार्थानेसुद्धा बहाद्दूरसारखी सोबत करत या दोन्ही भारतीय तरुणांना 860 कोटी रुपयांचं उद्योजकीय साम्राज्य उभारण्यास मदत केली. ही कथा आहे, सागर दर्यानी आणि विनोद कुमार होमगाई यांच्या ‘वॉव मोमो’ची.
भारतात दोन तरुणांनी ‘मोमो’ या नेपाळी खाद्यपदार्थास आपलंसं केलं आणि स्वत:चं ‘मोमो’ साम्राज्यच उभारलं. निव्वळ 30 हजार रुपयांनी ‘मोमोज्’च्या स्टॉलची सुरुवात केली आणि या नेपाळी खाद्यपदार्थानेसुद्धा बहाद्दूरसारखी सोबत करत या दोन्ही भारतीय तरुणांना ८६० कोटी रुपयांचं उद्योजकीय साम्राज्य उभारण्यास मदत केली. ही कथा आहे, सागर दर्यानी आणि विनोद कुमार होमगाई यांच्या ‘वॉव मोमो’ची.
कोलकाता येथे जन्मलेला आणि वाढलेला सागर दर्यानी हा व्यापारी कुटुंबातील मुलगा. अवघ्या सातवीत असताना तो एक मुरलेला ‘सेल्समन’ बनला होता. त्याच्या या ज्ञानाचा पुढे त्याला व्यवसायात प्रचंड फायदा झाला.
बिनोद कुमार जो सागरचा वर्गमित्र होता, तो अनेकदा मित्रांना भूक लागली की मध्यरात्री ‘मोमोज’ तयार करायचा. याचवेळी सागर आणि विनोदच्या मनात अन्नाशी संबंधित व्यवसाय करण्याची कल्पना आली. खरंतर आयुष्यात पुढे काय करायचं, याविषयी नेहमीच त्यांच्या डोक्यात चक्र चालायचं. पण, यावेळी त्यांचा मनाशी निश्चय पक्का झाला होता. जर पिझ्झा, बर्गर हे विकले जात असतील, तर ‘मोमोज्’ला ब्रॅण्ड तयार करुन, चांगल्या पद्धतीने ‘पॅक’ करुन विकले, तर तेदेखील विकले जातील, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला.
फक्त ३० हजार रुपयांपासून त्या दोघांनी व्यवसाय सुरू केला. जाहिरात करण्यासाठी किंवा ‘फॅन्सी पॅम्प्लेट’ छापण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. सागर आणि विनोद त्यांच्या ब्रॅण्डसाठी चालतं-बोलतं ‘होर्डिंग’ बनले. त्यांना पहिला ‘ब्रेक’ मिळाला जेव्हा त्यांना कोलकाता येथील ‘स्पेन्सर्स’ या ‘सुपर मार्केट’मध्ये सहा बाय सहा फूट उंचीची जागा मिळाली. सर्व ‘मोमो’ सागरच्या घरच्या स्वयंपाकघरात बनवले जात आणि त्याच्या वडिलांच्या गॅरेजमध्ये ठेवले जात. अल्पावधीत ‘वॉव मोमो’ लोकप्रिय झाले. कालांतराने ‘स्पेन्सर्स’च्या छोट्या स्टॉलमधून कोलकात्याच्या सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणार्या ‘साऊथ सिटी मॉल’मध्ये ते स्थलांतरित झाले. त्या ९० चौरस फुटांच्या दुकानातून सागर, विनोदला महिन्याला जवळपास 2 लाख रुपये कमाई होऊ लागली. अखेरीस, काही दिवसांतच हा आकडा ११ लाख रुपयांपर्यंत पोहोचला. कोलकाता येथील दोन ‘आऊटलेट’मधून साठवलेल्या पैशांचा ब्रॅण्डच्या विस्तारात मदत झाली. ‘वॉव मोमो’ नफा कमावू लागली. २०११ मध्ये, ‘वॉव मोमोज्’ने बंगळुरूच्या ‘फिनिक्स मार्केट मॉल’मध्ये पहिले ‘आऊटलेट’ उघडले. या ‘आऊटलेट’मुळे चेन्नई आणि पुण्यात ते प्रस्थापित होऊ शकले. २००८ ते २०१५ या फक्त सात वर्षांत ‘वॉव मोमो’ ४३ पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये विकले जाऊ लागले. महत्त्वाचं म्हणजे त्यात कोणतेही कर्ज किंवा उद्यम भांडवल निधी नव्हता.
व्यवसायवाढीसाठी ‘वॉव मोमो’ने २०१५ मध्ये ‘एंजेल इन्व्हेस्टमेंट नेटवर्क’मधून दहा कोटी रुपये उभे केले. या निधीवर ‘पिगी-बँकिंग’ करून ब्रॅण्डने दिल्ली/एनसीआरमध्ये प्रवेश केला. राजधानीत आल्याने ‘वॉव मोमो’ला व्यापक ब्रॅण्ड दृश्यमानता मिळाली आणि ‘वॉव मोमो’ हे लवकरच घरोघरी नाव झाले. २०१७ मध्ये नोटाबंदीनंतर त्यांनी ‘लाईटहाऊस फंड’मधून भांडवलाची दुसरी फेरी उभारली. अमेरिकेतील ‘डॉमिनोज’ आणि ‘बर्गर किंग’सारख्या ब्रॅण्डमध्ये गुंतवणूक केलेली ‘टायगर ग्लोब’ ही संस्था २०१९ मध्ये ‘वॉव मोमो’च्या बोर्डवर आली. जागतिक दर्जाचा गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी ‘ऑन-बोर्ड’ आल्याने सागर आणि विनोदचा आत्मविश्वास वाढला.
नोटाबंदीचा फटका बसला म्हणून अनेक कंपन्या गळे काढत असताना ‘वॉव मोमो’ आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेने नफा कमावत होती. कोरोना काळात मात्र कंपनीला फार मोठा फटका बसला. साडेअकरा वर्षे नफ्यात चालणार्या ‘वॉव मोमो’ला सहा कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
‘वॉव मोमो’चा विस्तार भारतातील १८ शहरांमध्ये ‘मोमो’चे ८१२ हून अधिक ‘आऊटलेट्स’ आहेत. ‘पॅन-फ्राईड मोमोज्’ त्यांचा ‘युएसपी’ बनला आहे. ते शाकाहारी आणि मांसाहारींसाठी १६ विविध प्रकारचे मोमोज् देतात. ‘सिझलर मोमो’, ‘मोमो बर्गर’, ‘मोमो चाट’, ‘तंदूरी मोमो’ इतकंच नव्हे, तर ‘चॉकलेट मोमो’सुद्धा मिळतात. दिवसाला साधारणत: दोन लाखांपेक्षा जास्त ‘मोमोज्’ विकले जातात. या फूड कंपनीमध्ये ९०० लोक ‘स्टोअरफ्रंट्स’चे व्यवस्थापन करतात आणि ‘बॅकएंड’ उत्पादनांमध्ये ७०० हून अधिक लोक कार्यरत आहेत. सर्व ‘वॉव मोमो’ ‘आऊटलेट्स’ कंपनीच्या मालकीचे आहेत. कंपनीचे मुख्यालय कोलकाता, पश्चिम बंगाल येथे आहे.
‘वॉव मोमो फास्ट-फूड रेस्टॉरंट्स’ची भारतीय शृंखला ३० हजारांच्या अल्प गुंतवणुकीने सुरू झाली आणि आता ती ८६० कोटी रुपयांच्या संपत्तीवर उभी आहे. ‘फूड बिझनेस’मध्ये येऊ इच्छिणार्या तरुणांना सागर दर्याणी मोलाचा संदेश देतात की, “ग्राहक हा राजा आहे. त्याला पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तो जे सांगतो ते ऐकण्यासाठी नेहमी हजर राहा.”
कदाचित ‘वॉव मोमो’च्या यशाचं हेच गमक असावं.